गुजरातचा सामना

0
127

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात आज मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात ८९ आणि आजच्या दुसर्‍या टप्प्यात ९३ मिळून एकूण १८२ जागांसाठी ही निवडणूक अटीतटीने लढली गेली आहे. भारतीय जनता पक्षाची राज्यातील बावीस वर्षांची सत्ता उलथवून लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा संपुष्टात आल्याचे सिद्ध करण्याची भाषा करीत कॉंग्रेसने सर्वशक्तिनिशी या निवडणुकीत उडी घेतली असल्याने विजयश्री भाजपच्या पारड्यात एकतर्फी पडणार की तुंबळ संघर्ष होणार याबाबत मते – मतांतरे व्यक्त होत आली. त्यामुळे अर्थातच निवडणुकीची चुरस प्रचंड वाढली आणि अवघ्या जगाचे लक्ष तिने वेधून घेतले आहे. तेरा वर्षांच्या पलायनानंतर कॉंग्रेस अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतलेले राहुल गांधी पूर्ण जोमाने या निवडणुकीच्या प्रचारात उतरले, त्यामुळेच खरे तर ही चुरस निर्माण झाली. दोन प्रमुख राजकीय पक्षांचे शीर्षनेते अनेक वर्षांनंतर प्रथमच असे आमनेसामने आले आहेत. भाजपने राज्यातील प्रचाराचा बिगुल वाजवताना विकास विरुद्ध घराणेशाही असा मुद्दा उपस्थित केला होता. कॉंग्रेसने या विकासाच्या दाव्यांनाच आव्हान दिले, जीएसटी आणि नोटबंदीसारखे गुजराती व्यापार्‍यांना तापदायक ठरलेले विषय ऐरणीवर आणले आणि ‘विकासा’चा संबंध बड्या भांडवलदारांच्या हिताशी लावून सामान्यांचा कैवार घेतला. एक गोष्ट मात्र लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे या संपूर्ण प्रचारादरम्यान राहुल यांनी एकदाही गुजरातच्या दंगलींचा विषय काढला नाही. भाजपचा भर ‘गुजराती अस्मिते’वर असल्याचे अचूक हेरून आणि गुजराती जनतेची धार्मिक मनोवृत्ती जाणून कॉंग्रेसने आपली रणनीती या निवडणुकीत चातुर्याने बदललेली पाहायला मिळाली. राहुल यांनी स्वतःच्या शिवभक्तीचे प्रदर्शन मांडत मंदिरांना भेटी देण्याचा जो सपाटा लावला, त्यातून पक्षाने पूर्वेतिहासात नेहमीच वापरलेले अल्पसंख्यक धार्जिणे धोरण या निवडणुकीत गुंडाळून ठेवल्याचे स्पष्ट झाले. गुजराती अस्मितेशी संबंध जोडण्याचा मोह राहुल गांधींनाही आवरल्याचे दिसत नाही. नुकत्याच त्यांनी गुजरातमधील एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या घराण्याला असलेला नम्रतेचा वारसा सांगताना तो ‘गुजरातचे सुपुत्र’ असलेल्या महात्मा गांधींच्या शिकवणीतून आला असल्याचे आवर्जून सांगितले ते यासाठीच. आपले सरकार हे बोलणारे सरकार नसेल तर ऐकणारे सरकार असेल असा टोला राहुल यांनी ताज्या मुलाखतीत लगावलेला दिसतो. या निवडणुकीतील अटीतटीतून या निवडणुकीत प्रचाराची पातळी मात्र खालावलेली दिसली. त्यात कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी केलेले स्वयंगोल पक्षाला महाग पडले. मोदींवर ‘तू चाय बेच’ अशी शेलकी शेरेबाजी करणारे युवा कॉंग्रेसच्या नियतकालिकातील व्यंगचित्र, राहुल यांच्या निवडणुकीची तुलना औरंगजेबाच्या वारशाशी करणारे, मोदींना ‘नीच किसमका आदमी’ म्हणणारे आणि पाकिस्तान्यांना मेजवानी देणारे आणि शेवटी पक्षातून हाकलले गेलेले मणिशंकर अय्यर, अयोध्या खटल्यात अल्पसंख्यकांची बाजू मांडणारे कपिल सिब्बल भाजपच्या पथ्थ्यावर पडल्याचे दिसून आले. दुसरीकडे कॉंग्रेसने हातमिळवणी केलेल्या हार्दिक पटेल यांच्या विरुद्ध अश्लील सीडी प्रसृत करण्यात आल्या खर्‍या, परंतु अत्यंत निधडेपणाने हार्दिकने त्याला सामोरे जात तो प्रयत्न पार हाणून पाडला. भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी या निवडणुकीत वेळ, पैसा आणि सर्व शक्ती ओतली आहे. स्वतः पंतप्रधान मोदींनी या निवडणुकीत तब्बल २८ हजार किलोमीटरचा प्रवास करीत गुजरात पिंजून काढला, तर राहुल गांधींनीही वीस हजार किलोमीटर प्रवास करीत हमभी कुछ कम नही हे दाखवून दिले आहे. कॉंग्रेसने या निवडणुकीत विचारपूर्वक आणि शास्त्रशुद्धरीत्या रणनीती आखली आहे. त्यासाठी सॅम पित्रोदांसारख्यांची मदत घेतली आहे. कॉंग्रेसने या निवडणुकीत गुजरातने प्रायोगिक तत्त्वावर स्वीकारलेले ‘सॉफ्ट हिंदुत्व’ त्यांना राजकीयदृष्ट्या कितपत लाभदायक ठरते त्यावर पुढील विचार होऊ शकतो. कॉंग्रेसने या निवडणुकीत आपली रणनीती समूळ बदलली आहे. तिचा कितपत फायदा त्यांना या निवडणुकीत मिळतो हे मात्र स्पष्ट नाही. मोदींचे गुजरात मॉडेल, गेल्या बावीस वर्षांत केलेली विकासकामे आणि केंद्रीय स्तरावर केलेल्या सुधारणा यांचा प्रभाव पुसून टाकणे कॉंग्रेसची धुरा स्वीकारलेल्या राहुल गांधींना शक्य होते की चुरशीचा हा फुगा पार फुटून जातो हे येत्या सोमवारी निवडणूक निकालातून कळेलच, परंतु राहुल गांधींच्या नेतृत्वसामर्थ्याची आणि स्वीकारार्हतेची मदारही या निवडणूक निकालावर बेतलेली आहे. मोदींच्या अजस्त्र प्रतिमेसमोर फिके फिके वाटणारे राहुल गांधी गुजरातच्या या प्रचारादरम्यान नव्या अवतारात परिपक्वतेने समोर उभे ठाकले एवढे मात्र खरे.