गुजरातचा कौल

0
101

भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेले गुजरात स्वतःपाशी राखण्यात यश मिळवले असले तरी गुजरातमधील हे यश हिमाचल प्रदेशप्रमाणे नेत्रदीपक नाही. हे राज्य स्वतःपाशी राखण्यासाठी भाजपाला बरेच झुंजावे लागले आहे. त्यामुळे त्यातून मिळत असलेल्या संकेतांचा आणि पूर्वसूचनांचा गांभीर्याने विचार आता त्या पक्षाने करण्याची खरी गरज आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसला गुजरातमध्ये भाजपच्या खालोखाल यश मिळाले आहे. अनेक भागांत त्यांची मतांची टक्केवारी वाढली आहे. गुजरातमध्ये सातत्याने चाललेली घसरण थांबून जागाही वाढल्या आहेत. हे कशामुळे घडले याविषयी आत्मचिंतन भाजपाने भविष्याचा विचार करून करावे लागेल. कॉंग्रेसचे संघटन गुजरातमध्ये मजबूत नाही. गेल्या बावीस वर्षांच्या भाजपच्या सत्ताकाळात ते पूर्ण खिळखिळे झालेले आहे. त्यात बंडखोरीने आणखी खिंडार पाडले आहे, कॉंग्रेसपाशी मतदारांपुढे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रस्तुत करण्यासाठी दमदार स्थानिक नेतृत्वही नव्हते. कॉंग्रेसची सारी मदार राहुल गांधी यांच्यावर आणि त्यांनी ऐन निवडणुकीच्या वेळी हातमिळवणी केलेल्या तरुण तुर्कांवर राहिली. पटिदारांचे नेते हार्दिक पटेल, ओबीसींचे नेते अल्पेश ठाकूर, दलितांचे नेते जिग्नेश मेवानी आदींशी राहुल गांधी यांनी भले हातमिळवणी केली, परंतु ती शेवटच्या क्षणी केली गेली. त्यातही आरक्षणाच्या मुद्द्यावर हार्दिक यांना झुलवत ठेवण्यात आले. प्रचारकाळात कॉंग्रेसच्या नेत्यांनी वारंवार केलेले स्वयंगोल तर सर्वविदित आहेत. त्यामुळे एवढ्या सगळ्या मर्यादा असूनही कॉंग्रेसची कामगिरी या निवडणुकीत का सुधारली हे भाजपा नेत्यांनी आता तपासायलाच हवे. त्यामागे कॉंग्रेसच्या कामगिरीपेक्षा भाजपाप्रतीच्या नाराजीचे योगदान अधिक दिसते. भारतीय जनता पक्षाने गुजरातमध्ये आपली पत राखली आहे ती केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर. मुख्यमंत्री विजय रुपानी किंवा त्यांच्या सरकारच्या कामगिरीचे त्यात विशेष योगदान दिसत नाही. योगदान असेल तर ते भाजपच्या शिस्तबद्ध पक्षसंघटनेचे आहे. मतदारयादीतील प्रत्येक पानासाठी प्रमुख नेमण्यापर्यंत ही अत्यंत बळकट संघटनात्मक बांधणी होती. राज्याच्या सर्व भागांमध्ये अशा प्रकारची मजबूत संघटनात्मक बांधणी असूनदेखील कच्छ किंवा सौराष्ट्रात अथवा ग्रामीण गुजरातमध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान झालेले दिसते. भाजपला मिळालेले यश हे मुख्यतः शहरी भागांमध्ये मिळाले आहे. मध्य गुजरात वगळता अन्यत्र जागा अथवा मतांची टक्केवारी पाहिली तरीही भाजपच्या यशाच्या मर्यादा स्पष्ट दिसतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील पैकीच्या पैकी जागा भाजपाच्या पारड्यात गेल्या होत्या, ते दैदीप्यमान यश यावेळी दिसले नाही. जनमत बदलल्याचा हा संकेत आहे. स्पष्ट बहुमतामुळे भाजपला गुजरातेत सरकार स्थापन करता येणार असले तरीही राज्यातील पक्षाची तुलनात्मकदृष्ट्या असमाधानकारक कामगिरी, जागांची घटलेली संख्या, अनेक भागांनी कॉंग्रेसला दिलेला कौल, त्या पक्षाची वाढलेली मतांची टक्केवारी याचा विचार भाजपा नेत्यांना करावा लागणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये तेथील कॉंग्रेस सरकारप्रती जनतेमध्ये स्पष्ट नाराजी होती आणि ती मतपेटीतून व्यक्त झाली. कॉंग्रेसनेही सारे लक्ष गुजरातवर केंद्रित केल्याने हिमाचलकडे त्यांचे तेवढे लक्ष नव्हते. गुजरातमध्ये या निवडणुकीची सांगड मोदी आणि अमित शहांनी ‘गुजराती अस्मिते’शी घातल्यामुळे गुजराती जनतेने सरकराप्रतीची अस्वस्थता मनात ठेवून संयमाने मतदान करून मोदींची प्रतिष्ठा राखली. आगामी काळामध्ये ज्या राज्यांत निवडणुका होणार आहेत, तेथील कॉंग्रेसचे संघटन गुजरातच्या तुलनेत अधिक मजबूत आहे. तेथे कॉंग्रेसला स्थानिक नेत्यांची वानवा नाही. कर्नाटक असो अथवा राजस्थान; गुजरातमध्ये जर भाजपाशी राहुल गांधी एवढी झुंज घेऊ शकतात, तर आपली संघटनात्मक ताकद असलेल्या राज्यांमध्ये कॉंग्रेस अधिक प्रबळपणे झुंज देऊ शकते. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आपल्या यशाचा आलेख चढता ठेवण्याची आणि मोदी लाटेचा प्रभाव टिकवून ठेवण्याची शिकस्त भाजपाला करावी लागणार आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे हिमाचल प्रदेशमधून उच्चाटन झाले असल्याने आता केवळ पंजाब, कर्नाटक आणि ईशान्येतील छोट्या राज्यांपुरता तो सीमित उरला आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत तेथून त्याला हद्दपार करायचे असेल तर गुजरातच्या निवडणुकीत दिसून आलेल्या त्रुटी भाजपा नेतृत्वाला दूर साराव्या लागतील. चुका सुधाराव्या लागतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मोदी लाटेचा अहंकार आता गुंडाळून ठेवून आणि हवेत न वावरता प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तवाला भिडावे लागेल. गुजरातच्या निवडणुकीचा खरा संदेश हाच आहे.