गुंडगिरी करणार्‍यांवर कडक कारवाई

0
114

>> मुख्यमंत्री : पोलीस मुख्यालयात अधिकार्‍यांशी संवाद

राज्यात गुंडगिरी, टोळीयुद्ध खपवून घेतली जाणार नाहीत. गुंडगिरी करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलीस मुख्यालयात आयोजित पोलीस अधिकार्‍यांशी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

पोलीस मुख्यालयात पोलीस महानिरीक्षक, वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्यासोबत बैठक घेऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे. राज्यात पोलिसांकडून चांगले कार्य केले जात असून त्यांना नागरिकांकडून योग्य सहकार्य मिळण्याची गरज आहे. सांताक्रुझ पणजी या भागात झालेल्या टोळीयुद्धाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या टोळीयुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरात गुंडांविरोधात कारवाईची मोहीम सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे. टोळीयुद्धात सहभागी झालेल्या प्रत्येकाला गजाआड करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

नियमावलीचे पालन व्हावे म्हणून पोलिसांना आवश्यक पाऊले उचलण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

गुंडगिरी विरोधात कडक पावले उचला : जसपाल सिंग
राज्यात पोलीस स्टेशनच्या प्रमुखांना गुंडगिरीच्या विरोधात कडक पाऊल उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुंडगिरीमध्ये सहभागी युवा, अल्पवयीन मुलांच्या पालकांशी चर्चा करून त्यांना सुधारण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी दिली. सांन्ताक्रुझ टोळीयुद्ध, खूनप्रकरणी आत्तापर्यंत २२ जणांना अटक करण्यात आली आहे, असेही सिंग यांनी सांगितले.