गिरीश, रॉयची उमेदवारी दाखल

0
126

गोवा विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी पणजी मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून अ. भा. कॉंग्रेस सचिव गिरीश चोडणकर तर वाळपई मतदारसंघातून आमदार रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. पणजीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विरुद्ध चोडणकर तर वाळपईत आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या विरुद्ध रॉय नाईक अशी लढत होणार आहे. पणजीतून गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर हेही एक उमेदवार रिंगणात आहेत. मात्र आम आदमी पक्षाने दोन्ही ठिकाणी उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे.
रॉय यांच्या विजयाचा कॉंग्रेसचा दावा
वाळपई मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसतर्फे काल रॉय रवी नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत कॉंग्रेस गोवा प्रभारी चेल्लाकुमार, गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, आमदार रवी नाईक, महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, स्वाती केरकर, सावित्री कवळेकर, आविश काणेकर, रोशन देसाई, रितेश नाईक, अशोक नाईक, विनोद पोकळे, विजय पै उपस्थित होते. उमेदवारी दाखल केल्यानंतर वाळपई शहरात रॅली काढली. यावेळी चेल्लाकुमार म्हणाले की, वाळपईत कॉंग्रेस उमेदवार रॉय नाईक यांचा विजय निश्‍चित आहे. विश्‍वजित राणे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कॉंग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. पण वाळपईतील जनता जागृत असून जनतेचा विश्‍वासघात करणार्‍या विश्‍वजित यांना चांगलाच धडा शिकवील.

म्हणून प्रतापसिंह राणे
यांचा सहभाग नसेल
कॉंग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे उमेदवारी अर्ज भरण्यावेळी अनुपस्थित राहण्यामागचे कारण त्यांच्या कौटुंबिक नात्याला तडा जाऊ नये असे सर्वांचे मत आहे. त्यासाठी त्यांचा निवडणुकीत सहभाग नसेल असे चेल्लाकुमार म्हणाले. शांताराम नाईक म्हणाले की, सत्तरीचा विकास हा रवी नाईक मुख्यमंत्री असताना झाला आहे. हे वाळपईतील जनतेला माहीत आहे.