गावरान गोष्टी

0
238

– दत्ताराम प्रभू-साळगावकर

…अशा गोष्टींच्या जोरावरच अजूनही गावात गावपण टिकून आहे; लाल मातीचा तो गुणच आहे. शहरी जीवनाच्या धकाधकीनं वैतागलेलं मन शांत व सुंदर गावात, रम्य वातावरणात निश्‍चितच रमेल! ‘जिथं-तिथं भेटेल, अवघा आनंदी-आनंद!’

‘खरा भारतदेश खेडेगावात राहतो’ असं कोणीतरी म्हटलेलं ऐकलं आहे. हे उद्गार तंतोतंत खरे आहेत. आता खेडीपाडी बरीचशी सुधारली आहेत, लोकांचं राहणीमान काहीसं उंचावलं आहे.

साधनसुविधा खेड्यापर्यंत पोहोचत आहेत. एक काळ असा होता की खेडेगाव हे अतिशय मागासलेले प्रदेश होते. चांगले रस्ते नव्हते, वाहतूक व्यवस्था नव्हती, शिक्षणाची सोय नव्हती, औषधोपचारांची गैरसोय होती. या अतिमहत्त्वाच्या गोष्टीच ज्या ठिकाणी नव्हत्या, त्या ठिकाणी आधुनिकतेचे वारे कुठून वाहणार? लोकांचं जीणं अतिशय खडतर होतं. जास्तसे लोक अपार कष्ट करूनच उपजीविका करणारे. गावात गरिबी होती. जे काही पिकायचं ते विकायचं कुठे? असे यक्षप्रश्‍न असायचे. मालाला उठाव नाही म्हणून भाव नाही असेच एकंदरीत चक्र! ज्यांची आर्थिक स्थिती थोडी चांगली ते तग धरून राहायचे, काहीवेळा गावाकडे पाठ फिरवून शहराकडे धाव घ्यायचे. राब राब राबायचे, मिळेल ते खायचे, अर्धपोटी तर अर्धपोटी, मिळेल त्यात समाधान मानण्याशिवाय गत्यंतरच नसायचं. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ हाच जगण्याचा महामंत्र! प्राण कंठाशी येईपर्यंत कष्ट करायचे व असंच जीवन कंठायचं. ‘अच्छे दिन’ नव्हतेच मुळी! जगण्याला वाली नाही, प्रगतीला गती नाही. ‘गत आयुष्य ओघळुनी रिक्त हस्त’ अशीच!
पण एक खरे, निसर्गाशी मैत्री, त्याला हानी पोचवायची नाही इतके निसर्गाशी प्रामाणिक. शिक्षणाने नसतील पण अनुभवाने शहाणे! सगळे सण भक्तिभावाने साजरे करायचे. उपयोग नैसर्गिक साधनांचा… शिगमा, दसरा, गावची जत्रा, नाटकं हेच करमणुकीचे व मनोरंजनाचे क्षण. कधीकधी गावातल्या देवळात होणारं कीर्तन, भजन, पुराण एवढंच. अशीच एक गोष्ट…

गावात एक शास्त्रीबुवा यायचे. देवळाच्या अंगणात पुराण वाचायचे, कथा सांगायचे. लोकही भक्तिभावात रंगून जायचे. शास्त्रीबुवा गावात आले की लोकांना कळायचं, जो-तो एकमेकांना सांगायचा. कोणाला आमंत्रण वगैरे द्यायची गरजच नसायची. असेच ते एके दिवशी गावात आले. त्या दिवशी लोकांची जास्त उपस्थिती नव्हती. असं असलं तरी त्यानी जे कोणी उपस्थित होते त्यांच्यासमोर पुराण वाचायला, सांगायला सुरुवात केली. कोणाला तरी वाटलं की आणखी चार लोकांना सांगणं पाठवावं. पुराण ऐकायला एक म्हातारा, अशिक्षित खेडूत बसला होता. त्याला त्यानी उठवले व सांगितले, ‘‘चल रे, वाड्याच्या नाक्यावर जरा आवाज दे. ‘शास्त्रीबुवांनी पुराण सोडलंय, श्रवण करायला चला’ म्हणून सांग.’’ खेडूतच तो, त्याची भाषा काहीशी अशुद्ध व अपभ्रंशयुक्त अशी. तो गेला. वाड्याच्या नाक्यावर लोकांसाठी मोठा आवाज दिला- ‘‘शास्त्रीबुवानी पराण सोडला, सरण करायला चला!’’ लोकांनी ते ऐकलं व चकित झाले. शास्त्रीबुवांना अचानक झालं तरी काय प्राण सोडण्यासारखं? शहानिशा न करताच कोण अगरबत्ती, कोण चंदन, कोण लाकडाची मोळी, कोण फुलं घेऊन देवळाकडे धावले. बघतात तर काय? शास्त्रीबुवा तर जिवंत व पुराण सांगताहेत! खेडुताच्या अशुद्ध शब्दांनी घात केला. आवाज द्यायला सांगणार्‍यानं सारखंच सांगितलं होतं, पण त्या खेडुतानं आवाज देताना पुराणाचं पराण केलं (‘पराण’ हा ‘प्राण’ या शब्दाचा अपभ्रंश) व श्रवणचं ‘सरण’ केलं! अर्थ झाला शास्त्रीबुवा इहलोक सोडून गेले! लोकांनी शास्त्रीबुवांचे पाय धरले व क्षमा मागितली. समजुतीचा घोटाळा होतो तो असा!

ही झाली कपोलकल्पित गोष्ट. पण मी स्वतः लहानपणी अनुभवलेली ही गोष्ट आहे. खेड्यातले लोक किती भावनाप्रधान व भाबडे असतात त्याची. गावात दशावतारी नाटक होतं. आख्यान होतं दानशूर राजाचं. हे आख्यान म्हणजे गोष्ट राजा हरिश्‍चंद्राची असावी असं मला आठवतं. नाटक उत्तम लागलं, रंगलं. लोकही तल्लीन झाले होते. नाटकाच्या शेवटच्या प्रवेशात त्या दानशूर राजाकडे एक याचक येतो व दान मागतो. दानशूर राजाच तो, विचारतो, ‘‘स्वामी, आपल्याला काय दान देऊ?’’ तो याचक चक्क त्याच्या राज्याचंच दान मागतो. राजा ती आज्ञा प्रमाण मानतो, राज्याचं दानपत्र तयार करतो व ते दानपत्र एका तबकातून याचकाला अर्पण करतो म्हणजेच राज्याचं दान करून टाकतो. तो याचक म्हणतो, ‘‘दान दिलंस, त्यावर दक्षिणा दे. कारण दानावर दक्षिणा दिल्याशिवाय दान पूर्ण होत नसतं.’’ राजा म्हणतो, ‘‘स्वामी, मी तुम्हाला सर्वकाही दानात दिलं, आता माझ्याकडे माझ्या हातातल्या या तबकाव्यतिरिक्त काहीही शिल्लक राहिलेलं नाही.’’ हे सांगताना नाटकातल्या त्या नटाने इतका सुंदर व भावनाप्रदान अभिनय केला की लाजवाब! आवाज, बोल सद्गदित, डोळ्यांतून अश्रूच्या धारा, मान खाली व हातात रिकामं तबक! काय आश्‍चर्य! उपस्थित लोक त्या प्रसंगाने इतके गहिवरले की जाग्यावरून उठले. कोणी चार आणे, कोणी आठ आणे, कोणी रुपया, ज्याला जेवढे शक्य होते तेवढे पैसे त्यांनी राजाच्या हातातल्या तबकात टाकले. कशाला? तर दक्षिणा द्यायला राजाकडे काहीही नव्हते म्हणून!
मीही त्याक्षणी गहिवरलो असेन, माझ्याही डोळ्यांत अश्रू उभे राहिले असावेत, एवढा तो प्रवेश मनाला चटका लावणारा, भावनिक आवाहन उभं करणारा होता! ते नाटक आहे हेच लोक विसरले. भाबडेपणा काय असतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण मी पाहिलं, अनुभवलं.
म्हणून म्हणतो, गाव तो गाव व तेथील लोकं ती लोकं! लबाडी नव्हती, कोणी केलीच तर सत्य वदवून घेण्यासाठी देवळातल्या घंटेखालची पवित्र जागा किंवा नारळावर हात ठेवून सांगण्याची पद्धती.

गावातले लोक नात्याने नसतील पण भावनेने बांधलेले. घराची दारं दिवसा सताड उघडी. शहरातल्याप्रमाणे दारात आलेल्या माणसाला पाहण्यासाठी असतं तसलं छिद्र दाराला नाही!
अशा गोष्टींच्या जोरावरच अजूनही गावात गावपण टिकून आहे; लाल मातीचा तो गुणच आहे. शहरी जीवनाच्या धकाधकीनं वैतागलेलं मन शांत व सुंदर गावात, रम्य वातावरणात निश्‍चितच रमेल! ‘जिथं-तिथं भेटेल, अवघा आनंदी-आनंद!’
अनुभव घ्यायलाच हवा!