गाभार्‍यातील समई : मंदाताई

0
221

– सौ. शरयु जोग
मनात शांती, तृप्ती, आनंद व श्रेय असताना आणि ओठात हसू असताना मृत्यू आला तर स्वर्गप्राप्ती होते असं म्हणतात. स्व. मंदाताई यांच्या बाबतीत असं निश्‍चितच झालं आहे. त्यांचा शांत, समाधानी चेहरा बघितला आणि मनातलं सर्व कुठेतरी बोलावं असं वाटलं कारण शब्द हेच जीवन!शब्दांचं सामर्थ्य अपरंपार आहे. शब्द हे आपल्या जवळील धन आहे जे कोणीही कधीही चोरून आणि हिरावून घेऊ शकत नाही. एखाद्याचे अभिनंदन करायचे असेल तरी शब्दच, सांत्वन करायचे असेल तरी शब्दच.

अजूनही भास होतो की मंदाताई आपल्याशी फोनवर बोलताहेत- ‘शरयुताई कशा आहात? कामात तर नाही…’. अशी फोनवरून हळुवार ममतेची हाक ऐकली की खूप भरून यायचं आणि कितीतरी वेळ आम्ही बोलत बसायचो. अगदी आत्ताचीच १४, १५ डिसेंबरची गोष्ट. अचानक सकाळी मी त्यांना फोन केला, ‘‘मंदाताई १९ डिसेंबरला कार्यक्रम निश्‍चित झाला आहे. तुम्ही नक्की येणार ना? तुमची तब्येत आता बरी आहे ना’’ आणि त्या अगदी उत्साहात… ‘हो मी नक्की येणार. आता मी बरी आहे. सध्या मला बरं वाटतंय. मी १९ ला संध्याकाळी नक्की येते. त्या दिवशी सर्वांना सुट्टीपण आहे’. मी पण लवकरच भेटण्याच्या उत्साहात होती. माझ्या पुस्तक प्रकाशनापेक्षा मला प्रोत्साहित करणार्‍या मोठ्या बहिणीप्रमाणे मंदाताईंच्या भेटीचा जास्त आनंद होता. कारण प्रत्येक वेळी, ‘‘मी तुमच्या कथा नियमित वाचते. हे तुमचं पुस्तक लवकर झालेलं मला बघायचं आहे’’, असं त्या नेहमी म्हणायच्या.
महिलाश्रमाबद्दल त्यांना वेगळीच आत्मीयता होती. खूप जीव लावला होता त्यांनी सर्वांना. मला आठवतं की तीन वर्षांपूर्वी दीक्षित सरांनी वास्कोतील एक मोठे उद्योगपती नानासाहेब बांदेकर आणि सौ. मंदाताई बांदेकर यांची परिवारासहित आश्रमात भेट घडवून आणली. माझ्या मनात कल्पना हीच की एवढे मोठे लोक आपल्याकडे येणार! मोठ्या लोकांबद्दल आपली कल्पना अशीच की मोठे लोक सर्वसामान्यांपेक्षा खूप वेगळे! त्यांचा रुबाब, त्यांचा थाट काही वेगळाच असतो. पण मंदाताईंची भेट वेगळीच, लक्षात राहण्यासारखी. प्रथम भेटीतच माझी त्यांच्याबद्दलची कल्पनाच बदलली. एवढी मोठी प्रतिष्ठित व्यक्ती पण साधेपणा किती, नम्रता त्यांच्या बोलण्यातून दिसत होती. त्यांचं सर्वांशी हसत-खेळत बोलणं, वागणं! त्यामुळे प्रथम दर्शनीच माझ्या हृदयात त्यांची प्रतिमा बसली आणि नंतर तर नियमित फोनवर बोलणं सुरू झालं. त्यांचं कार्यक्रमास येणं, भरभरून कौतुक करणं हवंहवंसं वाटू लागलं. कुणीतरी मायेचंच माणूस आपल्या सतत जवळ आहे याची जाणीव होत असे. त्या प्रपंचात अगदी तृप्त, समाधानी होत्या, हे तर अगदी जवळून मला बघायला मिळालं. एकदा त्यांच्या घरी त्यांनी मला आग्रहानं निमंत्रण दिलं आणि आश्रमातील एका महिलेला त्यांच्याकडे कामाकरता घेऊन जाण्याच्या निमित्तानं त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. ‘जेवायला या’, असं आग्रहाचं निमंत्रण होतंच. मंदाताईंनी न्यायला गाडी पाठवली होती. त्यांच्या प्रशस्त अशा घरात पाऊल ठेवताच एखाद्या मंदिरात प्रवेश केल्याचा भास झाला. दरवाजातच मंदाताईंनी हसून स्वागत केले. त्यांचा प्रसन्न चेहरा बघताच एवढ्या मोठ्या लोकांच्या घरी जेवायला आल्याचं दडपण म नाहीसं झालं. त्या दिवशी मुद्दामच त्या ऑफिसमध्ये गेल्या नाहीत. ‘आज आपण खूप गप्पा मारू, शरयुताई’, असं म्हटलं आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांच्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न होतं. आम्ही दोघींनीही खूप मोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यांनी मला त्यांचं पूर्ण घर दाखवलं आणि देवघर बघितल्यावर खरंच तेथे स्वर्गाचं नंदनवन असल्याचं जाणवत होतं. फुलांनी सुशोभित केलेल्या अशा सर्व देवांच्या मूर्त्या बघून थक्क झाले. बरोबर दोन वाजता नानासाहेब व त्यांची मुले आलीत. त्यांच्या प्रशस्त डायनिंग हॉलमध्ये सर्व मिळून आम्ही जेवायला बसलो. सर्वजण जेवताना मोकळेपणाने बोलत होते.
एवढ्या मोठ्या लोकांमध्ये इतका साधेपणा असू शकतो, याचेच मला आश्‍चर्य वाटत होते. नानासाहेब कौतुकाने म्हणत, ‘‘आम्हाला मंदाने महाराष्ट्रीयन खाण्याची सवय लावली आणि आता तर आम्ही पोळीशिवाय जेवूच शकत नाही’’. त्यांच्याकरता त्यांचं आवडतं मिरची-लोणचं मी घेऊन गेले होते. त्यांनी सर्वांनी चवीने ते खाल्लं, खूप आनंद झाला. सर्वांशी मनमोकळेपणाने बोलले आणि त्यानंतर आश्रमात परत आले. पण तो दिवस माझ्या आयुष्यात लक्षात राहण्यासारखा होता. ती सर्वजण माझ्या कथा वाटतात हे ऐकून खूप आश्‍चर्य वाटलं. यांच्या एवढ्या व्यस्त व्यापातून इतक्या लहान लहान गोष्टीत रस घेऊन किती सहजतेने जगतात! नानासाहेब आणि त्यांची मुले यांच्यामधील खेळीमेळीचे वातावरण मला खूप काही सांगून गेले. खरेच त्या घरात साक्षात लक्ष्मीचे वास्तव्य आहे, याचा पूर्ण विश्‍वास वाटला. त्यांच्या मुलांनी माझ्या मुलांची केलेली चौकशी, नंतर त्यांच्या शिक्षणाबद्दल सगळ्यांनी केलेली चर्चा, अशा गप्पा खूप रंगल्या. या सर्वांतून त्या सर्वांची सामान्यांप्रमाणे असणारी वागणूक, आश्रमाबद्दल असलेली कळकळ लक्षात घेण्यासारखी होती. तो पूर्ण दिवस माझ्या कायम लक्षात राहील. नंतर तर मंदाताई आमच्या कमिटीतील सदस्य झाल्या आणि आश्रमातील प्रत्येक कार्यात उत्साहाने सामील झाल्या. एवढ्या लांब राहत असूनही त्या मिटिंगकरता किंवा कार्यक्रमास येण्यास अगदी उत्सुक असत. एक दिवस सकाळीच त्यांचा फोन आला- ‘शरयुताई, आज मी आश्रमात येणार!’ आनंदाने त्यांना किती वाजता येणार, जेवायलाच या, असे सांगितले. पण त्या बोलल्या, ४ पर्यंत येणार. आमची तयारी सुरू झाली. त्या येणार म्हटलं की आश्रमातील सगळ्यांना आनंद होत असे. कारण त्यांनी सर्वांनाच माया लावली होती. वाटलं होतं की त्यांच्याबरोबर त्यांच्या मैत्रिणी किंवा परिवारातील लोक असतील. कारण आश्रमाबद्दल सर्वांना माहिती देण्याचा त्यांचा हेतू असायचा आणि त्या निमित्ताने आपल्या मैत्रिणी व नातेवाइकांना आश्रमाबद्दल, त्याच्या कार्याबद्दल आवर्जून सांगायच्या. त्यांना भेटी देण्यास घेऊन यायच्या. यावेळी सुद्धा असंच वाटलं की मंदाताई नक्कीच कुणालातरी आश्रम दाखवण्याकरता घेऊन येणार. पण आश्‍चर्य की त्या एकट्याच आल्या. मी त्यांना त्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, ‘मला आज एकटीलाच यायचं होतं आणि मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्याय. आम्ही निवांत बोलत बसलो. त्यांचे – माझे असे सूर जुळले की दर दोन-तीन दिवसात त्यांच्याशी फोनवर बोलणे होऊ लागले. मला आठवतं की कैलास यात्रेवरून आल्यावर त्यांचा मला फोन आला, ‘शरयुताई मला सर्व वर्णन ऐकायचं आहे. म्हणजे मला कैलासाचं दर्शन होईल. कारण मला तेथे जाणे शक्य होणार नाही. तुमच्याकडून सगळं ऐकलं की मला कैलास यात्रेचं पुण्य मिळणार’’. मी त्यांना म्हटलं, ‘‘मंदाताई, तुम्हाला कैलासला जाण्याची गरजच नाही. साक्षात महादेव-पार्वती तुमच्या घरात बसले आहेत’’. त्यांचं समाजसेवेचं कार्य अफाट आहे. पण ‘सुखाचा वारा अंगावर आला म्हणून बेभान होऊन नाचू नये’, हे त्यांच्याकडूनच शिकावं. जे लोक संतोषरूपी अमृताने तृप्त असतात त्यांनाच शांती व सुख प्राप्त होते.
एके दिवशी, ‘‘शरयुताई, इच्छा असूनही मी कार्यक्रमास येऊ शकत नाही. मला जरा बरं वाटत नाही’’, असा त्यांचा एसएमएस बघितला आणि काळजी वाटली. मीपण त्यांना आग्रह केला नाही परंतु दोनच दिवसात त्यांना अपोलोमध्ये ऍडमिट केल्याचे कळले. आम्ही सर्वजण त्यांना भेटायला गेलो. परत येताना वाटेत देवीचे दर्शन घेऊन त्यांच्यासाठी प्रार्थना केली. खात्री हीच होती की मंदाताई हसून पुन्हा आश्रमात येतील नव्हे विश्‍वासच होता. त्या आम्हाला सोडून जाऊच शकत नाही.
पण नियतीच्या मनात काही वेगळेच असावे. त्या दिवशी त्यांचे शेवटचे दर्शन घेत असताना मंदाताईंना मी इतकं शांत निवांत पडलेलं बघणं अवघड होत होतं. पण शेवटी जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली मिळते. त्या नेहमी म्हणायच्या की ‘शून्यातून विश्‍व निर्माण करता येतं आणि मी ते केलंय’.
धैर्य, इच्छाशक्ती, चिकाटी आणि हुशारी एकत्र आले की नशीब बदलायला वेळ लागत नाही आणि माणसाचा सर्वांत मोठा सद्गुण म्हणजे माणुसकी. या सर्वांतून मंदाताईंनी आपला प्रपंच घडवला. समाज घडवला. आज कितीतरी संस्था, उद्योग त्यांच्या आधारावर आहेत. त्यांचे अथक प्रयत्न आणि त्यांचे संस्कारच त्या सर्वांना, त्यांच्या परिवारातील लोकांना ध्येयाचे स्फुरण देत आहेत. त्यांच्या स्वभाव दर्शनातून हेच जाणवत होतं की प्रपंचात समाधानी वृत्ती असावी आणि परमार्थात हाव असावी.
मंदाताई हे जग सोडून गेल्या, अर्थात सर्वांसाठीच पण मी मात्र एक मोठी बहीण नव्हे एक मैत्रीण गमावली. इतक्या कमी काळात मी आणि मंदाताई मनाने खूप जवळ आलो होतो. हे दुःख पचवणे खूप कठीण आहे.
आयुष्य हे उमललेले सुंदर फूल आहे. त्याचे मोहक रंग आहेत. अस्तित्वाचा सुगंध आहे. प्रेम करणे हा आयुष्याचा मूळ गाभा आहे. जी माणसे प्रेम अर्पण करतात ती खूप निराळी असतात. त्यांना कीर्तीचा सुगंध लाभतो. मंदाताई त्यातल्याच एक!!
‘‘आकाशाचा केला कागद
समुद्राची केली शाई
तरी मंदाताईंची थोरवी
लिहून संपणार नाही!
प्रिय ताई, तुम्ही गेलात तरी तुमच्या मौल्यवान स्मृती आमच्या मनात चिरकाल राहतील’’.