‘गाढवावरचा’ शहाणा…!

0
123

– राजेंद्र रामचंद्र साखरदांडे
दोन बाया नेहमीप्रमाणे मोठ्याने बोलत होत्या. बाया बोलताना मोठ्यानेच कां बोलतात…(?) कारण त्यांचे बोलणे दुसर्‍यांनी ऐकावे म्हणून..! कारण त्यांचे ते बोलणे त्यांच्यासाठी नसतेच, ते दुसर्‍याकरिता असते.. व दुसर्‍यांनी ते मुद्दामच ऐकावे असे त्यांना वाटते.
‘‘काय गं बाई, आमचे हे, दिवसभर मोबायलवरच असतात. मी जवळ गेले तर जे ते बघत असतात ते बंदच करतात. काय बाई बघत असतात ही लोकं!’’
माझी उत्सुकता ताणली गेली होती. नवरा दिवसभर मोबाईलवर असतो म्हणजे… कामावर जात नाही का? कामावर जात असेल तर ही बया कुठे गेली होती त्याला बघायला… त्याच्या ऑफिसात? नवरा रिटायर्ड झाला आहे का? रिटायर्ड झाला असेल तर त्याला अजून डोळ्यांनी दिसते का! कानांनी ऐकू येतेय का? नाही.. नाही! तिचे म्हणणे एवढेच की घरी परतल्यावर आपल्याकडे लक्ष न देता स्वारी व्हॉट्‌सऍपवर, फेसबुकवर नाहीतर मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर नुसते खेळत असतात. काही दाखवा म्हणले तर त्यांना वेळच नसतो. मागल्याच डिसेंबर महिन्यात मुलगा युएसवरून आला होता. त्याला वाटले ‘‘वडिलांकडे’’ चांगला मोबाईल असायला हवा. माझ्याजवळ पूर्वीचा चांगला मोबाईल होताच, तरीदेखील मुला-सुनेच्या आग्रहाखातर नोट-२ घेतला- खिशापेक्षाही भारी मोठा. आता याला कसे जपावे हा एक गहन प्रश्‍न होता. त्याला कव्हर, स्क्रीन घातले गेले. सगळे खेळ फीड केले. नेटची सेवाही मिळाली. माझ्यावरही ‘सौ’चा तसा रोष होताच. त्या बायांपैकी एकीच्या मताशी ‘ही’ नक्कीच सहमत असायला हवीच- रात्रंदिवस हे ही मोबाईलवर बसलेले असतात.
मी पेशाने डॉक्टर… तेव्हा पहिल्यांदा सवड आहे कुणाला… व्हॉट्‌सअप बघायला… व मग झोपण्यापूर्वी … असे हे वेळापत्रक चालूच असते. केव्हा केव्हा वाजला तर बघावाच लागतो… महत्त्वाची बातमी असली म्हणजे! टीव्हीवर काही पहावे… तर नाही, पेशंट चालूच. चांगला पिक्चर लावला तर… ते काही शक्य नाही. मला रोमांचकारक, हाणामारीची पिक्चरे बघायला आवडतात. एकाचा मी पूर्वार्ध बघितलाय तर दुसर्‍याचा उत्तरार्ध! संपूर्ण पिक्चर बघणे… छे शक्यच नाही. किंचित विरंगुळा म्हणजे व्हॉट्‌सअप. त्यात माझा समावेश वीर पाच ग्रुपमध्ये झालेला व एका ग्रुपमध्ये मेंबरची संख्या ५०. एकात नातेवाईक भरलेले.. दुसर्‍यांत दोस्त लोक.. तिसर्‍यात डॉक्टर वर्ग .. चौथ्यांत वार्ताहर भरलेले तर शेवटच्यात सगळे राजकारणी व समाजसेवक! मी कोण हे मला तर माहीतच नाही पण मी इतरांना हवा आहे. खरेंच त्यांचा मी ऋणी आहे… कारण त्यांच्याचमुळे माझा मोबाईल वेळीअवेळी बोंबलत असतो. एकात जेवणाविषयीचे बोलणे चालू तर दुसर्‍यात वार्तालाप… आज कुठे जाणार… मी ना फिरायला चालले… मला बाई कंटाळा आलाय… रोज जेवण करायचे म्हणजे! आज की नाही आम्ही दिवसभर बाहेरच…! मजा की नाही!!
त्या दिवशी उठलो तर व्हॉट्‌सऍप बंद. रात्रभर एकत्रित झालेले १४०-१५० मेसेजेस गुल झाले होते. फोनाफोनी केली. सकाळचा चहा चुकला तरी चालेल पण..! व्हॉट्‌सऍप पाहिजेच! कुणी म्हटले मोबाईल हँग झालाय.. ऑफ करा, मग परत ऑन करा. कसरत केली. व्हाट्‌सअप लागला. बघतो काय तर १५० मेसेजेस…! सकाळ झाल्यावर कोंबड्यांनी बांग भरली होती… गुड मॉर्निंग केले. नाहीतर हल्ली पोसलेले गावठी कोंबडे दिसतच नाहीत… बांग भरणारे कोंबडे मारून खाल्ले असावेत. ग्रुपमधल्या एकीचे कौतुक करावे तेवढे कमीच! सकाळ झाल्यावर गुडमॉर्निंग.. अगदी पहाटे.. सुर्योदय होण्यापूर्वीच.. तर रात्री झोपण्यापूर्वी.. साडेअकराच्या दरम्यान गुडनाईट. त्या दिवशी मी पावणेबाराला गुडनाईट केले तर कुणी लगेचच मेसेज केला ‘‘चल झोप आता!’’
त्या दिवशी तर कहरच झाला. रात्री बारानंतर मोबाईल वाजतच होता.. ग्रुपमधल्या दोघींचा वाढदिवस साजरा होत होता. ही म्हणाली कोण बोंबलतय. रात्री झोप येत नाही का? कोण सटवी तुम्हाला मेसेजेस करतो हो? मी मुकाटपणे उठलो. तर कुणी एकटा उद्याच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मला रात्री १ला पाठवत होता. हिचा संशय गडद होत चालला होता. मी मोबाईलचा आवाजच बंद केला. सकाळ झाली. मोबाईलवर दोनशे मेसेजेस. मला एकही नव्हती. त्या डिलीट करता करता अर्धा तास कधीचा संपला! राहिलेल्या वेगळ्या करून उलट्या दिशेने पाठवत राहिलो. हीच सकाळची कृती! रात्री मेसेजेस आल्यावर उघडल्याशिवाय गत्यंतर नव्हते. कुणी वारले तर मॅसेज, कुणी जन्माला आला तरीही मेसेज… सगळे काही मोबाईलवर.
त्या दिवशी मित्र म्हणाला, ‘मी गेलो दिल्लीला. बायकोला साडी द्यावीशी वाटली. दुकानावर गेलो. चार-पाच साड्यांचे फोटो घेतले. माहितीसह व्हॉट्‌सअपवर बायकोला दाखवले. साडी बघितल्यावर लगेचच होकार! केवढे सहज व सोपे. मंडळी, घेऊन चला बायकोला घेऊन खरेदीला म्हणजे कळेल… गुळाचा भाव! व्हाट्‌सअपवर सगळे सोपे व सुरळीत.. डोकेदुखी नाही. एका साडीकरता १०-१२ दुकाने फिरायला नको. एकाच दुकानात बसा… वेगवेगळ्या जागेत… निरनिराळ्या अँगलमध्ये खुपशा साड्यांचे फोटोसेशन करा! म्हणजे तुम्ही निरनिराळ्या दुकानात फिरताय हे प्रमाणशीर सिद्ध करा म्हणजे झाले.
तर माझा मोबाईल एवढा मोठा होता की खिशात मावत नव्हता. मी शिंप्याला म्हटले, ‘खिसा थोडा मोठा कर. त्याला वेगळे बटन पण लाव. त्याने ते केलेच नाही. मग ते राहूनच गेले. आम्ही मेवाड-मारवाड सफरीला गेलो. चांगला कॅमेरा नेण्यापेक्षा मोबाईल बरा. पहिले आठ-दहा दिवस ‘ऑल वेल’ होते. शेवटी यायच्या दोन दिवस अगोदर आम्ही अजमेरला पोहोचलो. ख्वाज्या गरीब नवाजच्या दर्ग्याकडे.. खरे सांगतो.. ही गर्दी बघून आंत जायची इच्छाच झाली नाही. वर सकाळीच वाचन केले होते. ख्वाजा मोइनुद्दिन चिश्ती. महम्मद घोरीच्या बरोबर इस्लामच्या प्रचाराला भारतात आला होता व नंतर तो अजमेरला राहिला. बादशहा अकबर त्याच्या प्रेमात पडला. त्याच्या आशीर्वादाने जोधाबाईच्या पोटी जहांगीर जन्माला आला. आज त्या अजमेरला मन्नत मागायला हजारो लोक दर्ग्यात येतात.
मी देवीला हात जोडले – गणपतीचे स्तवन केले. माझा जप सुरू झाला. माझी कोणतीही मन्नत राहिली नव्हती. इस्लामचा प्रचार करणार्‍याकडे माझी काहीच मन्नत नव्हती. दर्ग्यास प्रदक्षिणा घालताना ही गर्दी! सगळे सांगत होते- ‘चोरांपासून सावध रहा’. माझ्या पायांत काहीतरी टोचले. सकाळी ही म्हणत होती गळ्यातील ती सोन्याची चेन काढा. मी नाही ऐकले. ती चेन गेली ४२ वर्षे अंगावरून काढली नव्हती. त्यामुळे ते जमले नाही. शेवटी सगळी मंडळी सुखरूपपणे बाहेर पडली. आमच्यातल्या एका बाईचा मोबाईल, पैसे व आयडी नाहिशी झाली होती. मी म्हटले, बाहेर त्या अरुंद रस्त्यावर कृत्रिम गर्दी झाली होती – तिथेच लंपास केले असावेत! माझा मोबाईल खालच्या खिश्यांत सुखरूप होता.
आम्ही परत फिरलो.. बाराही जण एकापाठोपाठ जात होतो… परत त्याच वळणावर पोहोचलो. ही गर्दी झाली. कसेबसे बाहेर पडलो. शरीर चांगले चेपून गेले होते. बाहेर पडताच लक्षात आले माझा खिसा रिकामा झाला होता. निघते वेळी मोबाईल नेहमीप्रमाणे वरच्याच खिश्यात राहिला होता. आता खिसा रिकामा होता. पुष्करला घोड्यावर, उंटावर बसतात, निघतेवेळी मी सर्वांना म्हटले होते ‘‘मी गाढवावर बसणार’’. आम्ही पुष्करला पोहोचलोच नव्हतो. पण गाढवावर बसण्याची माझी हौस पूर्ण झाली होती. उंटावरच्या शहाण्यापेक्षा गाढवावरचा शहाणा झालो होतो. ‘अति शहाण्याचा बैल रिकामा’ अशी स्थिती झाली होती. मनातल्या मनांत खजिल बनलो. हिची तर वाच्याच गेली. एवढ्या हजारांचा मोबाईल चोरीला गेला होता. ग्रुपच्या सर्वांचे चेहरे पडले होते.
चला बरे झाले! व्हॉट्‌स अपचे थेर संपले. रात्री मुलाचा फोन आला. पुढे वाईट होणारे एवढ्यावरच निभावले. म्हटलं विचार सोडा. घरी परतल्यावर ‘दुसरा चांगला घ्या’! ही मला बघतच राहिली- म्हणजे ही सवत परत घरी नांदायला येतेच म्हणायची!
हॉटेलवर पोहोचताना रिकामा खिसा मनाला अस्वस्थ करत होता. छातीवर… हृदयाजवळ वाजणारी रिंग बंद होती- खिश्याला व्हाट्‌सअपची हुरहुर लागली होती!!