गव्यारेड्याच्या हल्ल्यात गुळेलीत युवती ठार

0
258

>> शेळ-मेळावली येथील दुर्घटना

>> दीड महिन्यात सत्तरीत दुसरा बळी

गुळेली, सत्तरी पंचायत क्षेत्रात गव्यारेड्यांचा धुमाकूळ सुरूच असून काल शेळ – मेळावली येथे गव्यारेड्याने दुचाकीवर केलेल्या हल्ल्यात पूजन पुंडलिक मेळेकर (२५) ही दुचाकीस्वार युवतीचा मृत्यू झाला. ती उसगाव येथील नेस्ले या कंपनीची कंत्राटी कामगार आहे. सदर दुर्दैवी हल्ला सकाळी सातच्या सुमारास ती कामावर जातेवेळी झाला. गेल्या दीड महिन्यात गव्यारेड्याने गुळेली पंचायतीच्या कक्षेत घेतलेला हा दुसरा बळी आहे. त्यामुळे संतप्त स्थानिक लोक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमल्याने वातावरण तंग बनले. दरम्यान, स्थानिक आमदार आणि आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या उपस्थितीत उपवनपाल कुलदीप शर्मा यांनी गव्यारेड्यांचा बंदोबस्त करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर वातावरण निवळले.

पूजन काल सकाळी पावणेसात वाजता नेहमीप्रमाणे उसगाव येथील नेस्ले कंपनीत कामावर जाण्यासाठी स्कूटरने आपल्या भावासोबत जात होती. ती दोघे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर पोहोचले असता गवारेडा मध्येच रस्त्यावर आला. गव्यारेड्याने प्रथम स्कूटरला मागून धक्का दिला. त्यामुळे पूजन व तिचा भाऊ खाली पडली. ती खाली रस्त्यावर पडली असताना गव्यारेड्याने तिच्या डोक्यावर पाय ठेवला तसेच दुसरा पाय पोटावर ठेवल्याने ती गंभीर जखमी झाली. यानंतर गवारेडा शंभर मीटराच्या अंतरावर जाऊन थांबला. अचानक झालेल्या गव्यारेड्याच्या हल्ल्याने घाबरून गेलेल्या तिच्या भावाने तिला उचलली. पण त्या ठिकाणी मोबाईलची रेंज मिळत नसल्याने त्याला रुग्णवाहिकेला बोलविता आले नाही. त्याचवेळी गावातील एक तरुण तिथे पोचला. तो तत्काळ रुग्णवाहिका बोलाविण्यासाठी गुळेली येथे गेला. दरम्यान, गावातील काही तरुणी त्या ठिकाणी आल्याने तिथे झालेली गर्दी पाहून गव्यारेड्याने पळ काढला. अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिका न आल्याने घटनास्थळी जमा झालेल्या लोकांनी जखमी पूजनला खासगी वाहनाने वाळपई इस्पितळात नेले. तिथून गोमेकॉ, बांबोळी येथे नेत असताना तिचा वाटेत मृत्यू झाला. या हल्ल्यात तिच्या भावाला किरकोळ जखम झाली. त्याला उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.

स्थानिक लोक संतप्त
गव्यारेड्याच्या हल्ल्यात पूजन या युवतीचा मृत्यू झाल्याचे समजताच शेळ मेळावली गावातील लोक संतप्त झाले. गुळेली पंचायत क्षेत्रात गेल्या दीड महिन्यात गव्यारेड्याच्या हल्ल्यात दोघांचे बळी गेले आहेत. कणकीरे येथे बागायतीत गव्यारेड्याने महिलेला ठार केल्यानंतर वन खात्याने गव्यारेड्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्‍वासन दिले होते. पण, त्यानंतर काल दुसरी घटना घडल्याने नागरिक आक्रमक झाले. जोपर्यंत वन अधिकारी लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्णय लोकांनी घेतला. उपवनपालांनी अपघात घडलेल्या ठिकाणी येऊन लेखी आश्वासन द्यावे अशी आग्रही मागणी लोकांनी केली. त्यावेळी जिल्हा पंचायत सदस्य प्रेमनाथ हजारे यांच्यासह स्थानिक पंच व गावातील पुरुष व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

उपवनपालांचे लेखी आश्‍वासन
गव्यारेड्यांचा बंदोबस्त वन खाते करणार असून यापुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून त्या भागात दोन वनरक्षक नेमण्यात येणार आहेत. तसेच पूजनच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत करण्याचे लेखी आश्वासन उपवनपाल कुलदीप शर्मा यांनी संतप्त बनलेल्या स्थानिक ग्रामस्थांना दिले. उपवनपालांच्या या लेखी आश्‍वासनानंतरच संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. त्यावेळी साहाय्यक वनपाल अनंत सामंत यांची उपस्थिती होती.

आरोग्यमंत्र्यांची तातडीने भेट
गुळेली पंचायत क्षेत्र हे वाळपई मतदारसंघात येत असून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल गव्यारेड्याच्या हल्ल्यानंतर गावातील लोकांची भेट घेऊन मयत पूजनच्या कुटुंबाला योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी दुपारी तीन वाजता शेळ मेळावली गावाला भेट दिली. त्यावेळी गावातील नागरिकांनी गव्यारेड्याचा बंदोबस्त करा अशी मागणी मंत्र्यांकडे केली. यावेळी मंत्री राणे यांनी आपण या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार असून गव्यारेड्यांचा बंदोबस्त करण्यावर उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन दिले.

आश्‍वासनानंतर स्वीकारला मृतदेह
जोपर्यंत वनअधिकारी गव्यारेड्यांच्या बंदोबस्ताबद्दल ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत पूजन हिचा मृतदेह घेण्यास तिच्या नातेवाइकांनी नकार दिला. मृतदेह गोमेकॉत शवचिकित्सा करण्यासाठी नेण्यात आला होता. पण तेथून नातेवाइकांनी तो स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, वन खात्याच्या अधिकार्‍यांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात घेतला.

पहिल्या हल्ल्यानंतरचे आश्‍वासन हवेत विरले!
कणकीरे येथील महिलेचा गव्यारेड्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर वाळपईचे आमदार व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी गव्यारेड्यांचा बंदोबस्त करणार असल्याचे आश्वासन भेटीदरम्यान दिले होते. पण दीड महिन्यानंतर पुन्हा गव्यारेड्याच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाल्याने आमदाराच्या आश्वासनाचे काय झाले? असा सवाल ग्रामस्थांनी केला. गावातील लोकांची शेतीबागायती जंगलात असून त्यावरच सर्वांचा उदरनिर्वाह चालतो. जर गवेरेडे जीव घ्यायला लागले तर शेती बागायतीत जायचे तरी कसे? असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी स्थानिक आमदार विश्‍वजित राणे यांना काल भेटीवेळी केला. आम्हांला आश्वासने नकोत, कृती हवी आहे अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

गरीब कुटुंबावर मोठा आघात
आपल्या नवर्‍याच्या अकाली मृत्यूनंतर पूजनच्या आईने तिचा व तिच्या भावाला कष्टाने मोठे केले होते. गावापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या काजू कारखान्यात काम करून पूजनच्या आईने पूजनला बारावीपर्यंत तर मुलाचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. घरातील स्थिती गरीब असताना सुध्दा दोघाही मुलांना चांगले शिकवल्याने तिचे गावात कौतुक होत असे. पूजन ही बारावीनंतर उसगाव येथे नेस्ले कंपनीत पॅकर म्हणून कंत्राटी पद्धतीवर कामाला होती तर तिचा भाऊ कॉस्मे कंपनीत कंत्राट पद्धतीवर कामाला जात होता. दोघेही बहीण – भाऊ कामाला जात होते तरी त्यांची आई अजूनही काजू कारखान्यावर कामाला जायची. माय – लेकांची गरीबी दूर करण्यासाठी धडपड सुरू होती. पूजनच्या आईने आपल्या एकुलत्या मुलीच्या लग्नाचे स्वप्नही पाहिले होते. पण, काळाने तिच्या मुलीवर क्रूर घाला घातल्याने या कष्टाळू मातेच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. काल सकाळी कामावर जाताना गव्यारेड्याच्या हल्ल्यात आपली लाडकी लेक पूजन जग सोडून गेल्याच्या धक्क्याने तिचे अवसान गळले आहे. धक्का सहन न झाल्याने तीची मनःस्थिती बिघडली आहे. पूजनच्या भावाने तर आपल्या लाडक्या बहिणीचा मृत्यू पाहिला आहे. आपल्या डोळ्यांदेखत बहिणीवर गव्यारेड्याने हल्ला केला. मात्र, आपण तिला वाचवू शकलो नसल्याने तो पार खचला आहे.