गवाणेतील हरिजन कुटुंबे न्यायाच्या प्रतिक्षेत

0
105
वाळपई नगरपालिका कक्षात आयोजित बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी लेविन्स मार्टीन्स. सोबत प्रदीप नाईक, दशरथ गावस, विकास गावणेकर, अमीर परब, ओमप्रकाश बर्वे, संतोष गावकर, श्रीकांत पेडणेकर व अधिकारी.

वाळपई (न. प्र.)
सत्तरी तालुक्यातील खोतोडे पंचायत क्षेत्रामध्ये अठ्ठेचाळीस वर्षांपासून अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या हरिजन बांधवांच्या १४ कुटुंबांना न्यायाची प्रतिक्षा आहे. यासंदर्भात उत्तर गोवा जिल्हाधिकारी लेविन्स मार्टीन यांनी संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरत या प्रकरणी दहा दिवसांत अहवाल मागवला आहे.
गोवा मुक्त होऊन ४८ वर्षे झाली तरीही अजूनपर्यंत या कुटुंबांना आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, अशा प्रकारच्या मुलभूत समस्या असतानाही सरकारची संबंधित यंत्रणा काय करीत आहे ? अशा प्रकारचा सवाल करीत नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या संबंधित अधिकारी व पंचायत मंडळांच्या बैठकीत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित खात्यांच्या अधिकार्‍यांना दहा दिवसात याबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. बैठकीनंतर जिल्हाधिकारी व संबंधित अधिकार्‍यांनी सदर वाड्याला भेट देऊन एकूण परिस्थितीची पाहणी केली.
खोतोडा पंचायत क्षेत्रातील गवाणे हरिजन वाडा या ठिकाणी एकूण १४ कुटुंबे हलाखीचे जीवन जगत आहेत. या ठिकाणी पाणी, वीज, रस्ता, शिक्षण आदी स्वरूपाच्या समस्या असतानाही त्याकडे सरकारची कोणत्याही प्रकारची यंत्रणा गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा या कुटुंबीयांचा आरोप आहे. याबाबतची गंभीर दखल घेत राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले होते. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्याची सूचना केली होती. याची गंभीर दखल घेत उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी नगरपालिकेत याबाबतची बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी विकास गावणेकर, गोपाळ पार्सेकर उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, मामलेदार दशरथ गावस व वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी प्रामुख्याने हजर होते. यावेळी अधिकार्‍यांकडून वेगवेगळ्या समस्या संदर्भात सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न जिल्हाधिकार्‍यांनी केला.
शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करा
सदर वाड्यावर एकूण १७ मुले वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत असून काही मुलांना बससेवेची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना जवळपास तीन किलोमीटर पायी जावे लागते. याची गंभीर दखल घेत या ठिकाणी उपस्थित असलेले भाग शिक्षणाधिकारी रोहिदास गावडे यांना याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना केली. त्याचबरोबर मुलांसाठी बालरथ व्यवस्था त्वरित उपलब्ध करावी अशा प्रकारचा आदेश दिला. तसेच रस्ता विभागाच्या अधिकार्‍यांना रस्ता रुंद करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला.
दारिद्य्ररेषेखाली एकही कुटुंब नाही
या वाड्यावरील महत्त्वाची बाब अशी की या वाड्यावर १४ कुटुंबाची परिस्थिती पूर्णपणे दयनीय असूनही या भागात एकही दारिद्य्ररेषेखालील व्यक्ती कुटुंब कसे नाही याबद्दल जिल्हाधिकार्‍यांनी आश्चर्य व्यक्त केले. या भागातील कुटुंबांना बीपीएल धारक यादीमध्ये समावेश करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले.
तसेच भागांमध्ये अनेक मुले आजही अंगणवाडीच्या सुविधापासून वंचित असल्यामुळे या वाड्यावर स्वतंत्र योजना राबवून शक्य तेवढ्या लवकर अंगणवाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
जिल्हाधिकार्‍यांकडून पहाणी
यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी इतर अधिकारी यांच्या समवेत गवाणे येथील हरिजन वाड्यावर प्रत्यक्ष भेट देऊन एकूण परिस्थितीची पाहणी केली व याबाबत गंभीर लक्ष देण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले.