गळ आणि गळती

0
187

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि काही मंत्र्यांचे आजारपण, त्यामुळे करावा लागलेला दोन मंत्रिपदांतील बदल, त्यानंतर जाहीरपणे प्रकटलेली पक्षातील खदखद आणि कॉंग्रेसची राज्यातील वाढती सक्रियता या पार्श्वभूमीवर डळमळीत आणि कमकुवत वाटू लागलेल्या सरकारला सावरण्यासाठी अखेर भाजपाने विरोधी कॉंग्रेसमध्ये गळ टाकला. कॉंग्रेसच्या गोटातील दोन मासे पहिल्याच प्रयत्नात भाजपाच्या ह्या गळाला लागले आहेत आणि कदाचित भविष्यात आणखीही लागू शकतात अशी एकूण परिस्थिती दिसते आहे. भाजपाचे हे पाऊल नैतिकदृष्ट्या कसे आहे हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आजचा भाजप हा ‘पार्टी विथ द डिफरन्स’ राहिलेला नाही हेच कालच्या एकूण राजकीय घडामोडींतून अधिक ठळक झालेले आहे. अर्थात, आपले स्वतःचे संख्याबळ वाढवणे ही भाजपाची गरज होऊन बसली होती. सरकारचे नेतृत्वच आजारी असल्याने वरचढ ठरू लागलेल्या घटक पक्षांवर आणि सक्रिय झालेल्या विरोधकांवर वचक ठेवण्यासाठी खुद्द भाजपाची शक्ती वाढवण्याचा विचार गेल्या बर्‍याच काळापासून चालला होता. मध्यंतरी मायकल लोबो, फ्रान्सिस डिसोझा वगैरें स्वकीयांचीच टीका, कॉंग्रेसने सभापतींविरुद्ध दिलेली अविश्वासाची नोटीस, सत्ता स्थापनेसाठी चालवलेले प्रयत्न वगैरे पाहिल्यानंतर हे असेच चालू राहिले तर भाजपासाठी संख्येचे गणित खूप अडचणीचे ठरू शकते हे पक्षनेतृत्वाला उमगले होते. त्यामुळे भाजपाने कॉंग्रेस कमकुवत करण्यासाठी आपले गळ टाकले होेते. दोन मासे पहिल्याच फटक्यात त्याला लागले. त्यामागची कारणे कोणती, त्यातून त्यांना कोणते लाभ होणार आहेत वगैरे कळण्याएवढी जनता अर्थातच सुज्ञ आहे, परंतु केवळ या दोघांना भाजपामध्ये घेणे पुरेसे नाही. त्यांचे राजकीय पुनर्वसन करायचे असेल तर ते कसे केले जाणार हा खरा प्रश्न आहे. शेवटी कितीही झाले तरी जनतेच्या दारातूनच जनमताच्या कसोटीला पार करूनच ते होऊ शकते हे विसरून चालणार नाही. आमदारकीचा राजीनामा दिल्याने त्यांना पुन्हा पोटनिवडणुकीला उभे केले जाणार का आणि तसे झाल्यास ते पुन्हा निवडून येऊ शकणार का हाही आजच्या परिस्थितीत नक्कीच महत्त्वाचा मुद्दा आहे. सुभाष शिरोडकर हे ७८ पासून अगदी सरपंचपदापासून मंत्रिपदापर्यंत पोहोचलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते. ते आणि महादेव नाईक यांच्यातील राजकीय हाडवैर सर्वांना माहीत आहे. सोपटे हे तर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मतदारसंघातून त्यांना पराभूत करून निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता पार्सेकरांसारखा ज्येष्ठ नेता भाजपाला नकोसा झाला आहे का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. पक्षांतर्गत संघर्षालाही यातून तोंड फुटू शकते. शिरोडकर आणि सोपटे यांना भाजपामध्ये आणण्यामध्ये स्वतः यापूर्वी कॉंग्रेसला पहिले खिंडार पाडलेले विश्वजित राणे हे कारणीभूत आहेत. मायकल लोबो यांनी ‘किंगमेकर’ बनून सरकार घडवले होते. आता विश्वजित राणे हे मध्यस्थ बनून कॉंग्रेस कमकुवत करायला निघाले आहेत. कॉंग्रेसमध्ये असताना त्यांनी आपले वैयक्तिक समर्थन वाढवण्याच्या प्रयत्नात राजेश पाटणेकरांना कॉंग्रेसमध्ये नेले होते. पाटणेकर पुढे स्वगृही परतले, विश्वजितही भाजपात डेरेदाखल झाले. आता ते भाजपात राहून आपला प्रभाव निर्माण करण्यामागे लागले आहेत, कारण पक्षापाशी समर्थ नेतृत्वाची दुसरी फळी नाही हे त्यांना पक्के ठाऊक आहे. आता आपल्या पक्षाच्या देशातील अवनतीने स्वतःच्या राजकीय भवितव्याबाबत चिंतित झालेले कॉंग्रेसचे तमाम आमदार काय करणार आहेत हेही पाहावे लागणार आहे. खरे तर गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने कॉंग्रेसला घवघवीत यश मिळवून दिलेले होते, परंतु त्या करंट्यांना सरकार घडवता आले नाही. आता देखील संख्या असूनही दहा दिशांना दहा तोंडे करून मंडळी वावरताना दिसत होती. आता त्या संख्येलाच गळती सुरू झाल्याने अशा परिस्थितीत कॉंग्रेस आपला डेरा कसा सावरणार आणि उरलेल्या मंडळींना सोबत कसे ठेवणार हाही प्रश्न आहे. भाजपाने लोकशाहीचा गळा घोटल्याचा गळा कॉंग्रेसने काल काढला, परंतु ह्या असल्या खेळी कॉंग्रेसनेच या देशात आजवर रुजवल्या. त्याची अनंत उदाहरणे देशभरात आहेत. राज्याराज्यात कॉंग्रेसने हे खेळ खेळलेले आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचा बाजारच वानगीला पुरेसा आहे. पूर्वी ज्या भक्कम स्थितीत कॉंग्रेस असायची त्या जागी आज भाजप आहे एवढाच काय तो फरक आहे. बाकी सत्तेची लालसा, अनैतिक हालचाली, मनमानी तडजोडी आदींचा विचार करता ‘उडदामाजी काळेगोरे काय निवडावे निवडणारे’ अशीच सारी स्थिती आहे. त्यामुळे कोणी कोणाला दोष द्यायचे कारण नाही. दिल्या मापाने घ्यावे लागते ते हे असे. कॉंग्रेसची गळती सुरू झाली आहे आणि ती थांबणे न थांबणे हे येणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून राहणार आहे. हे सारे आजच्या काळातले राजकारण आहे आणि तो निव्वळ सत्तेचा खेळ आहे. तेथे नैतिकता, निरपेक्षता, नीतीमत्ता यांची अपेक्षा आपण बाळगणे म्हणजे आपण आपलीच निराशा करून घेण्यासारखे आहे!