गळती

0
166

जहाज बुडू लागले की त्यावरचे उंदीर सुद्धा बाहेर उडी टाकू लागतात तसे सध्या कॉंग्रेस पक्षाचे झाले आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपापला विकाऊपणा सूचित करण्याची संधी अनेक कॉंग्रेसजनांनी साधली. त्याला अनुसरून आता गळ टाकले गेले आहेत आणि एकामागून एक राजीनामे देत भाजपच्या वळचणीला जाताना दिसू लागले आहेत. गुजरातमध्ये शंकरसिंह वाघेलांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला, परंतु त्यामागे वैयक्तिक कारणे होती. गुजरात विधानसभेच्या येत्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस आपल्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करायला तयार नाही हे पाहून खवळलेल्या वाघेलांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला. पूर्वी अशाच प्रकारे त्यांनी भाजपाला रामराम ठोकलेला असल्याने आता त्यांनी घरवापसी करण्याऐवजी तिसर्‍या आघाडीचा मतलबी घाट घातला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत गुजरातमध्ये राजीनाम्यांचे आणि पक्षांतराचे सत्र सुरू झाले. दोन दिवसांत सहाजणांनी कॉंग्रेसला रामराम ठोकल्याने आणि जवळजवळ अकरा आमदार संशयाच्या घेर्‍यात असल्याने कॉंग्रेसने आपल्या आमदार मंडळींना स्वतःच्या पक्षाचे सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये हवापालटासाठी रवाना केले आहे. अर्थात, येत्या आठ ऑगस्टला होणार असलेल्या गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांच्या निवडणुकांमुळे ही खबरदारी आहे. तीन जागांपैकी दोन जागांवर अमित शहा आणि स्मृती इराणींचा विजय झाल्यात जमा आहे, परंतु तिसर्‍या जागेवर सोनिया गांधींचे राजकीय सचिव अहमद पटेल यांची आणि पर्यायाने स्वतः पक्षाध्यक्ष सोनिया गांधींचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे हे आमदार स्थलांतर नाट्य रंगले आहे. परंतु पक्षांतराचे हे लोण थांबेल असे वाटत नाही. अमित शहा उत्तर प्रदेशात गेले, तर तेथील विधान परिषदेच्या काही सदस्यांनी समाजवादी पक्षाला रामराम ठोकून भाजपाचा गड गाठला. दिल्लीपासून तामीळनाडूपर्यंत अनेकजण भाजपाच्या आश्रयाला येण्यास उत्सुक आहेत आणि गोवाही त्याला अपवाद नसावा असे दिसते. नितीशकुमार यांच्यासारखा विरोधी पक्षांना संघटित ठेवू शकणारा नेता भाजपाच्या वळचणीला गेला हे बदललेल्या परिस्थितीचे द्योतक आहे. गेल्या निवडणुकांपूर्वीही अनेक बडी मंडळी आजवर आपापले पक्ष सोडून भाजपाच्या आश्रयाला गेली होती. कॉंग्रेसच्या रिटा बहुगुणा जोशी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा, आसामचे हिमंत बिस्वसर्मा, अरुणाचलचे पेमा खांडू अशी अनेक मंडळी भाजपाच्या सावळीत विसावली आहेत. महाराष्ट्रात नारायण राणे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ही सगळी परिस्थिती भाजपाने घोडाबाजार अवलंबिल्याने ओढवली असल्याचा कांगावा कॉंग्रेसने सध्या चालवलेला असला, तरी राजकारणात येणार्‍या प्रत्येकाला स्वतःच्या राजकीय भवितव्याची चिंता असते. स्वतःचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे आणि ते पुन्हा सुधारण्याची सुतराम शक्यता दिसत नसली की पक्षांतराचा मार्ग चोखाळणे ही राजकारण्यांची सहजप्रवृत्ती आहे. त्यामुळे कोणी कोणाला दोष द्यायचा? पूर्वी कॉंग्रेसची राजवट असायची तेव्हाही घोडेबाजार कसा चालायचा, सरकारे कशी वाचवली जायची हा इतिहासही विसरून चालणार नाही. त्यामुळे आज जरी घोडेबाजाराचे आरोप चालले असले, तरी ही परंपरा कोणी सुरू केली, कसकशी चालवली या इतिहासातही संबंधितांनी डोकावणे श्रेयस्कर ठरेल. विरोधी पक्षांमध्ये सध्या नेतृत्वाची फार मोठी पोकळी जाणवते आहे. हायकमांड संस्कृतीत वाढलेल्या पक्षांवर तर मोठेच संकट ओढवलेले दिसते. घोडेबाजारापेक्षा नेतृत्वहीनतेची आणि विस्कळीतपणाची ही फळे आहेत. फुटक्या जहाजाला गळती लागली की भोक बुजवायचे की आरडाओरडा करीत राहायचे हे संबंधितांनी ठरवायला हवे!