गर्भोत्पत्तीसाठी आवश्यक घटक

0
1375
  •  डॉ. मनाली पवार

मानवी शरीरात पुनरुत्पत्ती होणे ही अत्यंत महत्त्वाची देणगी ईश्‍वराने मानवाला दिलेली आहे. म्हणूनच लग्न झाल्यावर गर्भधारणा व्हावे, गर्भाची वाढ योग्य तर्‍हेने होऊन सर्वांगीण, परिपूर्ण असा गर्भ प्रसूत व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण काही कारणाने हे सुख प्रत्येकाला मिळतेच असे नाही. त्याची अनेक कारणे आहेत, जी आपण पूर्वी पाहिलेली आहेत. त्याचबरोबर गर्भधारणेसाठी म्हणा किंवा गर्भोत्पत्तीसाठी काही घटक आवश्यक असतात. त्याचे ज्ञान असणेही खूपच महत्त्वाचे आहे. कारणे शोधून त्यानंतर चिकित्सा घेत बसण्यापेक्षा गर्भोत्पत्तीस आवश्यक घटकांचा विचार करून त्यानुसार अवलंब केल्यास वंध्यत्वामध्ये बराच फायदा होतो.

गर्भधारणेसाठी महत्त्वाचा पुरुषार्थ म्हणजे ‘काम’. यामुळे मैथुनाची इच्छा निर्माण होते आणि स्त्री व पुरुष यांचा संयोग झाल्यानंतर तोही हा संयोग ऋतुकाली झाल्यास व शुद्ध आर्तव व शुद्ध शुक्र असल्यास मेद्र योनिसंघर्षामुळे वायूसहित उष्मा पुरुष शरीरातील सर्वांगत शुक्राचे शिथिलीकरण करून शुक्रस्राव उत्पन्न करतो आणि ते शुक्र वायूमार्फत स्त्रीच्या भगभागी विसर्जित करतो. ते शुक्रबीज गर्भाशय मुखामार्फत गर्भाशयामध्ये नेले जाते. शुक्र ज्याप्रमाणे योनिभागी संमिश्र होऊन गर्भाशयमुखामार्फत गर्भाशयामध्ये येते, ते मैथुनसमयीच्या उष्म्यामुळे फलकोषामार्फत आतील वाहिन्यांतून आलेल्या स्त्रीबीजाशी संयुक्त होते. अशाप्रकारे संयुक्त झालेल्या शुक्रार्तवात जीव प्रवेश झाल्यास गर्भधारणा होते.
गर्भत्पत्तीसाठी उपयुक्त घटकांमध्ये
– गर्भधारण योग्य वय
– गर्भधारण योग्य काळ (ऋतुकाळ)
– सर्वसामान्य मैथुनस्थिती
– सबल गर्भाशय
– शुद्ध बीज (पुंबीज व स्त्रीबीज)
– अम्बु (रसधातु)
– दोषरहीत वायू
– दोषरहीत आनंदीत मानसिक स्थिती
– गर्भाधान विधी
यांचा समावेश असतो.

१) गर्भधारणा योग्य वय
– गर्भधारणेसाठी स्त्री व पुरुष हे दोघेही निरोगी असावेत. म्हणजेच वयाचा विचार करता दोघेही पूर्ण वीर्यसंपन्न व तरुण असावेत.
– अतिबाला किंवा अतिवृद्धा म्हणजेच अठरा वर्षांच्या आधीची किंवा चाळिशीनंतरची स्त्री गर्भधारणेसाठी अयोग्य किंवा वर्ज्य समजावी.
विवाहाखेरीज गर्भधारणा भारतीय समाजात मान्य नसल्याने अठरा वर्षांच्या मुलीचा विवाह पंचवीस वर्षांच्या मुलाशी करावा. यामुळे चांगली अपत्यनिर्मिती होते. म्हणूनच हे वय गर्भधारणेसाठी योग्य समजावे.
– दोघांमध्ये अंतर कमीतकमी चार वर्षांचे असावे. पतीपत्नीतील वयाचे हे अंतर योग्य कामजीवनास मदत करते.
धावपळ, करियर, मानसिक ताण यामध्ये लग्नाचे वय लांबलेले आहे. त्यामुळे वंध्यत्वाच्या समस्याही वाढल्या आहेत.
संपूर्ण सारधातुत्व हे गर्भधारणेला आवश्यक असल्यामुळे गर्भधारणेसाठी वयाचा विचार करणे आवश्यक ठरते.

२) गर्भधारणेसाठी सर्वसामान्य मैथुन स्थिती-
कामपूर्तीसाठी वात्स्यायनाने सांगितल्याप्रमाणे आसनाचा उपयोग करावा. पण बीजग्रहणासाठी मात्र ‘उताना बीजं गृहीयात|’ यामुळे दोषांची स्थिती प्राकृत राहते आणि ऋतूकाळी, तरुणवयात पूर्णकाम अशा स्त्री-पुरुषाने उत्तान स्थितीत मैथुन करून स्त्रीने बीज ग्रहण केल्यास चांगले अपत्य निर्माण होते.
– गर्भधारणेसाठी सकाळी उठल्याबरोबर मलिन अवस्थेत, जेवल्यावर लगेच, करकरीत तिन्हीसांजा, संध्याकाळी मैथुनाचा निषेध आहे.
चांगल्या अपत्यनिर्मितीसाठी रात्री दहा ते एक हा काळ योग्य आहे. यावेळी एकांत असतो, मनःशांती असते व कामाला जायची घाई नसते.
पार्श्‍वभागाकडून संभोग करू नये. अशा स्थितीत वायू अधिक बलवान होतो व योनिभागी पीडा उत्पन्न करतो. स्त्रीला वेदना होतात व गर्भधारणा होत नाही.

३) निरोगी, सबल गर्भाशय

ज्याप्रमाणे जमिनीमध्ये बीज पेरायचे असेल तर जमिनीची मशागत, नांगरणी करतात, खत घालतात, जमीन भुसभुशीत करतात हे आपण व्यवहारामध्ये बघतो. म्हणजेच चांगले पीक येण्यासाठी जमीन सुपीक पाहिजे. त्याचप्रमाणे गर्भाशयाचेही आहे. ज्याठिकाणी गर्भ स्थापन होतो, ते गर्भाशय प्राकृत हवे.
वेदना नसलेल्या, गर्भधारणाक्ष असलेल्या, अंतस्त्वचेवरील भाग प्राकृत अवस्थेत सबल गर्भाशय.
सबल, निरोगी गर्भाशयासाठी मुलगी वयात यायच्या काळापासूनच सध्या तयारी करावी लागते. त्यासाठी पौष्टिक आहाराबरोबरच गर्भाशयात बल देणारी शतावरी, अश्‍वगंधा, विदारी, आमलकी, दलां, गोक्षुर, अशोक, क्षीरकाकोथी सारख्या औषधी द्रव्यांचा वापर करावा. त्याचप्रमाणे रसायनांचा वापर करावा.

४) ऋतू किंवा गर्भधारणेस योग्य काळ
याठिकाणी ऋतुकाळ म्हणजे गर्भधारणेस योग्य काळ रक्तस्राव सुरू झाल्यापासून रजःस्रावाचा काळ सोडल्यानंतर स्त्रीबीज व्यवस्थित पोषित होऊन अंडाशयामधून गर्भाशयात येतो तो काळ.
हा काळ स्त्रीपरेत्व, त्यांच्या पाळी येण्याच्या सवयीनुसार बदलतो. साधारणतः तीस दिवसांचे पाळीचे चक्र असल्यास दहाव्या दिवसांपासून संबंध ठेवावा. विसाव्या दिवसानंतर हेच बीज अकार्यक्षम होते व त्याकाळी संबंध आला तरी गर्भधान होत नाही. म्हणूनच वंध्यत्व तपासणीमध्ये ‘ओव्ह्युलेशन स्टडी’ हा दहाव्या दिवसांपासून करायला लावतात.
हा ऋतुकाळ विशेषतः ‘शिफ्ट’ मध्ये काम करणार्‍यांसाठी महत्त्वाचा ठरतो. बर्‍याचवेळा इतर काहीही शारीरिक किंवा मानसिक दोषस्थिती नसताना केवळ ‘ऋतुकाळी’ संभोग न केल्याने, गर्भधान होत नाही.
५) शुद्ध बीज (स्त्रीबीज व पुबीज)
स्त्रीबीज म्हणजे अतीव बीज. स्त्रीबीज हे गुणतः शुद्ध असावे. यासाठी जर लग्नाअगोदर पाळी अनियमित येत असेल, अंगावरून रक्तस्राव हा कमी किंवा अधिक जात असेल, मासिक पाळी संवेदना असेल किंवा मासिक पाळी व्यतिरिक्त अन्यवेळी अन्य कोणताही स्राव होत असल्यास त्याची चिकित्सा प्रथम करावी.
बर्‍याचवेळा संवेदना, अनियमित पाळी हे लक्षण लग्नाअगोदर किंवा पाळी सुरू झाल्यावर दुर्लक्ष करतात. बर्‍याचअंशी स्त्रियांचे मत असते की ही लक्षणे लग्नानंतर व्यवस्थित होतात. पण असे होत नसते, वारंवार अनियमित पाळी आल्याने व हे असेच बरीच वर्षे चालू राहिल्याने, स्त्रियांना ’झलेऊ’ चा सामना करावा लागतो, जे एक वंध्यत्वाचे मुख्य कारण होय.
त्यामुळे अशाप्रकारच्या लक्षणांवर वेळीच औषध उपाययोजना करावी. त्यासाठी स्त्रोतारोध दूर करावा व फलघृत, शतावरीघृत, दाडिमादिघृत सारख्या औषधांची योजना करावी.

पुंबीजः
सबल पुरुष बीज म्हणजे शुक्रबहल असणे, शुक्राणूंची स्थिती प्राकृत असते. शुक्राणूंची (मोटीवीटी) व्यवस्थित असणे. शुक्र योग्यवेळी च्युत होणे. लिंगामध्ये ताठरपणा असणे. बर्‍याचवेळा बालवयात अतिकामुकतेमुळे हस्तमैथुन करणे हा कुमारांचा न मिळणार्‍या नैसर्गिक रतिसुखाला पर्याय म्हणून स्वीकारलेला चालूच राहून पुढे अंगवळणी पडून त्याची सवय जडते व त्यामुळे पुबीज निकृष्ट तयार होऊ लागते.

६) अम्बु (रसधातू)
गर्भाशयाची वाढ होण्यासाठी सर्वव्यापी रसधातु उपस्नेहन न्यायाने त्याचे पोषण करतो आणि आहाररसामार्फत पुढे त्याचे पोषण होते.

७) दोषरहीत वायुः
‘कर्ता गर्भाकृतिनाम’ असे वायूचे कार्य सांगितलेले आहे. म्हणजे स्त्रीपुरुष संयोगाचे वेळी निर्माण होणारी उष्णता, विशिष्ट स्पर्शेच्छा निर्माण करून वायूंचे उदीरण करते. यामध्ये कामपूर्तीबरोबर च्युत झालेल्या शुक्राला योनिभागात नेऊन, आर्तवाशी संयुक्त करून गर्भाची स्थापना वायू करतो.

८) दोषरहीत आनंदित मानसिक स्थिती
गर्भधारणेसाठी तणावरहित मानसिक स्थिती असणे हे दोघांसाठीही खूपच महत्त्वाचे आहे. कारण बर्‍याच व्याधीही या तणावाने उत्पन्न होतात व त्याचा थेट परिणाम स्त्री व पुंबीजावर होतो.

गर्भधान विधीः-
चौथ्या दिवशी स्नान करून प्रथम पतीमुखाचे अवलोकन करावे. नंतर तीन-चार दिवस थांबून आठव्या-दहाव्या दिवशी तूपभात, दूध असे खाऊन पुरुषाने व तेल, उडीद असा आहार स्त्रीला खायला घालून मधुर बोलीने, आनंदाने एककमेकांनी मैथुनास उद्युक्त व्हावे आणि उत्तान अवस्थेत बीज ग्रहण करावे.