‘गर्भाशय-मुखा’चा कर्करोग

0
255
  •  डॉ. स्वाती हे. अणवेकर

हा कर्करोग ‘गर्भाशय-मुखा’चा असून ह्याला इंग्रजीमध्ये ‘सर्व्हायकल कॅन्सर’ म्हणतात. ह्याचा प्रसार योनीच्या वरच्या भागापर्यंत असतो. सर्व कर्करोगांमध्ये हा दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात अधिक आढळणारा कर्करोग आहे. हा झाल्यावर बरेचदा अगदी भयंकर स्वरूप धारण करू शकतो कारण बर्‍याच स्त्रियांमध्ये एचपीव्ही ह्या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येते. जगभरामध्ये जवळजवळ ५००,००० स्त्रियांना दरवर्षी ‘गर्भाशय-मुखा’चा कर्करोग होतो व त्यातील अंदाजे २४०,००० स्त्रिया दरवर्षी मरण पावतात.

आपल्या भारतात दर वर्षी १२२,८४४ स्त्रियांना गर्भाशय-मुखाचा कर्करोग होतो व त्यातील ६७,४७७ स्त्रिया दरवर्षी ह्या कर्करोगाने मृत्युमुखी पडतात. ४३२.२ मिलियन स्त्रिया आपल्या भारतात १५ किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या असून त्यांना पुढील काळात गर्भाशय-मुखाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता आहे. १५-४४ ह्या वयोगटातील स्त्रियांना हा कर्करोग जास्त प्रमाणात होताना आढळतो. तरी हल्ली ‘योनी द्रव परीक्षण’ ज्याला ‘व्हजायनल पॅप स्मिअर टेस्ट’ असे म्हणतात, ती आता स्त्रियांमध्ये सर्रास केली जाते, ज्यामुळे ह्या कर्करोगाने होणारे मृत्यूचे प्रमाण बरेच कमी झाले आहे.

आता आपण एचपीव्ही विषाणू व त्यावरील लस ह्याबद्दल माहिती जाणून घेऊया. ‘एचपीव्ही’ अर्थात ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ हा ह्या कर्करोगाचे एक प्राथमिक कारण आहे. ज्या स्त्रियांना हा कर्करोग होतो त्यांना प्राथमिक स्वरुपात ह्या विषाणूची लागण होते. ह्या विषाणूचे साठ प्रकार आढळतात वा त्यातील २० प्रकार हे गर्भाशय पेशीमध्ये अनावश्यक बदल घडवून आणणे तसेच कर्करोग निर्माण करण्याची पराभूत क्षमता असणारे आहेत. त्यात देखील ‘एचपीव्ही-१६ आणि १८’ हे प्रकार हा कर्करोग होण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

बर्‍याच व्यक्ती ज्या लैंगिक संबंध ठेवण्यात सक्रीय असतात त्यांना ह्या विषाणूची बाधा होते. पुष्कळ स्त्रियांमध्ये ह्या विषाणूची बाधा झाली तरी काही उपचार न करताच त्यांना उपशय मिळतो. पण ज्या स्त्रियांमध्ये असा उपशय मिळत नाही त्यांच्यात काही महिने अथवा काही वर्षांनी गर्भाशय मुखाच्या पेशीमध्ये अनावश्यक बदल झालेले दिसून येतात ज्याला अर्वाचीन वैद्यक शास्त्र ‘डीसप्लेजिया’ असे म्हणते. असे बदल घडून येण्यासाठी आणखीन काही घटकदेखील आवश्यक ठरतात ते म्हणजे अल्प प्रमाणात आढळणारे अनुवंशिक उत्परिवर्तन तसेच दुषित अथवा अचल एपिथेलियल स्तर.

एचपीव्ही विषाणूची लागण ही प्रामुख्याने अशा स्त्रियांना होते ज्यांचे लैंगिक संबंध हे एकापेक्षा अधिक पुरुषांसोबत असतात. तसेच १५ वर्षांपेक्षा लहान वयात लैगिंक संबंध करायला सुरु केल्यासदेखील ह्या विषाणूचे संक्रमण होते. अन्य कारणांमध्ये कोणताही गुप्त रोग असणे हे देखील एक महत्वाचे कारण आहे. त्याचप्रमाणे ज्या स्त्रिया अति धुम्रपान करतात त्यांनादेखील एचपीव्हीची बाधा सहज होऊ शकते.
स्त्रियांना ह्या विषाणूची बाधा होऊ नये म्हणून शास्त्रज्ञांनी एक लस देखील संशोधन करून काढली आहे. ही लस स्त्रीला तिचे लैंगिक जीवन सुरु होण्याआधी दिली जाते. असे केल्याने त्या स्त्रीला एचपीव्ही १६ व १८ ह्या विषाणूची बाधा होण्याचा धोका कमी होतो. तरीदेखील ही लस घेतल्यावर त्या स्त्रीला ह्या विषाणूची लागण कधीच होणार नाही हे १००% खात्रीने मात्र सांगता येणार नाही. अशा स्त्रियांना देखील पॅप स्मिअर टेस्ट करून घेणे गरजेचे असते.

आता आपण ‘डिसप्लेजिया’ म्हणजे काय ते जाणून घेऊया :
ही कर्करोग होण्यापूर्वीची अवस्था असते. जर ह्या अवस्थेत रुग्णावर उपचार केले गेले नाहीत तर त्याचे रुपांतर कर्करोगात होते. एकदा का हा कर्करोग गर्भाशय-मुखाच्या पुढे पोहोचला कि त्याचा प्रसार वर गर्भाशय व खाली योनीमध्ये होण्यास वेळ लागत नाही. आणि मग तो शरीराच्या अन्य भागात देखील पसरू लागतो ज्याला ‘मेटॅस्टॅटिक कॅन्सर’ असे म्हणतात.
क्रमशः