गर्भाशयाचा कर्करोग

0
1772

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

अनियमित पाळीसाठी आयुर्वेदिक औषधोपचाराचा उपयोग करावा. शक्यतो हॉर्मोन्सची चिकित्सा टाळावी. गर्भाशय निर्हरण केल्यावर हॉर्मोन्समध्ये फरक पडतो व रुग्ण मानसिक तणावातून जाऊ शकतो. अशा वेळी प्राणायाम, ध्यान, धारणा यांचा सराव करावा.

स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. हा कर्करोग बर्‍याचवेळा रजोनिवृत्ती (मेनोपॉज) काळात जास्त प्रमाणात आढळतो. बर्‍याच स्त्रिया या काळात १५-१५ दिवसांनी अंगावर जाणे, अनियमित पाळी येणे, जास्त प्रमाणात अंगावरून रक्त जाणे या गोष्टी नैसर्गिक मानतात. बहुतेक पाळी बंद व्हायची असणार… असा स्वतःच समज करून घेतात. डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. जेव्हा डॉक्टरांकडे जातात तेव्हा उशीर झालेला असतो- गर्भाशय कँसर हा तिसर्‍या स्टेजला पोहचलेला असतो. बर्‍याच वेळेला गर्भाशयाचा कर्करोग असलेल्या स्त्रियांना पूर्वेतिहास विचारल्यास साधारण वर्ष-दोन वर्षे पाळी १५-१५ दिवसांनी येत होती असाच इतिहास ऐकायला मिळतो. दर सणाला मुख्यतः हिंदू स्त्रिया ज्या पाळी मागे-पुढे जायच्या हॉर्मोन्सच्या गोळ्या घेतात, त्यांच्यासाठी ‘गर्भाशयाचा कर्करोग’ ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे सण हे दरवर्षी येतात, पण गर्भाशय दूषित झाले तर ते काढावेच लागते. ‘गर्भाशयाचा कर्करोग’ झाल्यावर गगर्भाशय काढून टाकले की प्रश्‍न मिटतो असे नाही. त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात.
प्रमुख कारणे ः-
स्त्रीच्या शरीरामध्ये गर्भाशय हा आठवा आशय आहे. सुखी कामजीवन, मनाचा आनंदीपणा, अपत्यनिर्मिती आणि सार्वदेहिक घडण ही स्त्रीशरीरामध्ये गर्भाशयावर अवलंबून असते. दर महिन्याला सारभूत आर्तव गर्भाशयाच्या अंतस्त्वचेच्या आतील स्तरात संचित केला जातो. परंतु अंतःफलामार्फत प्रेरणा मिळून बीज आल्याखेरीज गर्भधारणा होऊ शकत नाही. परंतु बीजनिर्मिती झाल्यानंतरही जर त्या महिन्यात गर्भधारणा झाली नाही तर अंतस्त्वचेमार्फत गर्भशय्येचा तयार केलेला भाग वायुमार्फत फेकला जातो. यालाच पाळी येणे म्हणतात. गर्भाशयाचा कर्करोग हा बरेचदा अंतस्त्वचेला होतो म्हणून याला एन्डोमेट्रीयम कँसर सुद्धा म्हणतात.
गर्भाशयाच्या अंतस्त्वचेमध्ये जेव्हा हार्मोन्मध्ये बिघाड येतो तेव्हा हा कॅन्सर होतो. याची कारणे…
– वय ः जसजसे वय वाढते, रजोनिवृत्तीचा काळ जवळ येतो. ज्या स्त्रियांमध्ये हा हॉर्मोन्सचा बदल मोठ्या प्रमाणात घडतो, त्या स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो.
– स्थौल्य, मधुमेह, उच्चरक्तदाब यांसारखे विकार.
– मासिक पाळीची अनियमितता. मासिक पाळीच्या वेळी ‘इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरोन’ हॉर्मोनमध्ये बीजनिर्मितीशिवाय पाळी आल्यास बिघडतो. त्यामध्ये ‘इस्ट्रोजन’चे प्रमाण वाढते व गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो.
– वंध्यत्व. कधीच गर्भधारणा झाली नसल्यास
– गंभीर यकृत विकार
– पाळी लवकर सुरू होणे व उशीरा बंद होणे. साधारण १२ ते १६ वर्षे हे पाळी सुरू होण्याचे योग्य वय आहे. तसेच पाळी ५० वर्षांनंतर बंद होणे हे धोकादायक असू शकते.
– आनुवंशिकता.
– पूर्वीचा स्तन किंवा गुदप्रदेशाचा कॅन्सरचा इतिहास.
– वंध्यत्वामध्ये सारखे वापरण्याच येणारी हॉर्मोन्सची औषधे.
– पी.सी.ओ.डी.चा त्रास

प्रमुख लक्षणे ः
– मासिक स्रावाव्यतिरिक्त होणारा विकृत योनीगत रक्तस्राव.
– दुर्गंधीयुक्त श्‍वेतस्राव
– रजोनिवृत्तीनंतर होणारा योनिगत रक्तस्राव.
– उदरपरीक्षणात स्पर्शगम्य ग्रंथी आढळणे.
– रजोनिवृत्तीचा काळ जवळ आला असता मासिक पाळीव्यतिरिक्त मध्ये मध्ये पाळी येणे. अंगावरून खूप रक्त जाणे. साधारणपणे एक आठवड्याच्या वर रक्त जाणे किंवा मासिक पाळी २० दिवसांच्या आत येणे.

प्रत्येक टप्प्यांमध्ये दिसणारी लक्षणे ः
– झिरो स्टेज – यामध्ये गर्भाशयाच्या अंतस्त्वचेच्या पेशी दूषित होतात. म्हणजेच अंतस्त्वचेमध्येच फक्त वैषम्य येते.
– स्टेड पहिली – यामध्ये गर्भाशयापासून अंतस्त्वचेपर्यंत अशी ग्रंथी तयार होते. गर्भाशयाच्या बाहेर पेशींची वाढ होत नाही.
– स्टेड दुसरी – यामध्ये गर्भाशयस्थ ग्रंथीची वाढ गर्भाशय ग्रीवेपर्यंत होऊ शकते. पण कॅन्सरच्या पेशी गर्भाशयाबाहेर पसरत नाहीत.
– स्टेड तिसरी – ही कॅन्सरची चौथी स्टेड आहे. यामध्ये ग्रंथीची जास्तच वाढ होऊन ग्रंथी बाह्य योनी, लिंफ नोडस्‌पर्यंत पोचते. कर्करोगाच्या पेशी गर्भाशयाबाहेर पसरतात.
उदा. फुफ्फुस, हाडे इत्यादी.
योग्य वेळी गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान होणे खूप गरजेचे असते. म्हणूनच वयाच्या चाळीशीनंतर काही तपासण्या ह्या प्रत्येक महिलेनी करून घेतल्या पाहिजे.
– रक्त तपासणी
– पॅप स्मिअर – या तपासणीचा उपयोग स्त्रियांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाचा शोध घेण्यासाठी केला जातो. या तपासणीमध्ये स्त्रीच्या योनीामार्गातील स्राव तपासला जातो. ही तपासणी ३० वर्षांवरील स्त्रियांमध्ये ३ वर्षांतून एकदा केली जाते.
मासिक पाळीच्या पाचव्या दिवसापासून वीस दिवसांपर्यंत ही तपासणी केली जाते. या तपासणीअगोदर दोन दिवस योनिमार्गात मलम, लोशन, कुटुंबनियोजक साधने यांचा वापर टाळावा.
अल्ट्रासाउंड स्कॅन, एन्डोस्कोपी, विविध ट्यूमर मार्कर तपासण्या या गर्भाशयाच्या कर्करोगामध्ये केल्या जातात.

गर्भाशय कर्करोग चिकित्सा व उपचार –
गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्यावर गर्भाशय निर्हरण ही प्रथम चिकित्सा होय. रेडिओथेरपी किंवा किमोथेरपी सुरू केल्यावर त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आयुर्वेद चिकित्सा घ्यावी.
शोधन चिकित्सा –
१) योनीपिचू – विशेषतः योनी व योनिमुखाच्या कॅन्सरमध्ये स्थानिक व्रण, दुर्गंध, स्राव यासाठी औषधीसिद्ध तेल/तूपात भिजवलेला कापसाचा पिचू योनिप्रदेशी धारण करणे.
२) योनिधावन – औषधी काढ्यांनी योनिप्रदेशाचे धावन केले जाते.
३) अवगाह स्वेद – रुग्णाला टबमध्ये किंचित उष्ण औषधी काढा घालून त्यात बसविले जाते. यामुळे वाताचे अनुलोमन होते व स्थानिक वेदना, कडू, स्राव कमी होतात.
रसायन चिकित्सा –
कॅन्सरमध्ये रसादि सात धातू व त्यांचे अग्नी यांची विकृती असते. त्यामुळे कॅन्सरची चिकित्सा करताना व कॅन्सरचा पुनरुद्भव टाळण्यासाठी रसादि सात धातूंना बल देणारी रसायनचिकित्सा महत्त्वपूर्ण ठरते. यात दूध, तूप, साळीचा भात, यासारखा सात्त्विक रसायन आहार, शतावरी, गोक्षुर, अश्‍वगंधा, कुष्मांड, सुवर्णभस्मासारखी रसायन औषधे व मानसिक शुचिता वाढवणारे आचार, रसायनाचे आचरण करावे.
अश्‍वगंधा, शतावरी, आमलकी, अशोक, लोध्र, गुडूची, गुग्गुळसारखी औषधी द्रव्यांचा वापर करावा.
रजोनिवृत्तीच्या काळात पाळीसंबंधी काहीही अडचणी आल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लठ्ठपणा, प्रमेह व उच्चरक्तदाब या समस्या असल्यास त्याची योग्य चिकित्सा घ्यावी. वर्षानुवर्षे गर्भनिरोधक गोळ्या घेत असल्यास टाळाव्या.
– अनियमित पाळीसाठी आयुर्वेदिक औषधोपचाराचा उपयोग करावा. शक्यतो हॉर्मोन्सची चिकित्सा टाळावी. गर्भाशय निर्हरण केल्यावर हॉर्मोन्समध्ये फरक पडतो व रुग्ण मानसिक तणावातून जाऊ शकतो. अशा वेळी प्राणायाम, ध्यान, धारणा यांचा वापर करावा. शरीरशक्तीनुसार व्यायाम करावा.
पथ्यकर आहार-विहार –
तांदूळ भाजून भात – साठेसाळी मिळाल्यास उत्तम. भाताची पेज, तांदळाचे घावन, फुलका, ज्वारीची – तांदळाची भाकरी, रव्याची पेज, रव्याचा गोड शिरा, उपमा, मुगाचे वरण, मसूर डाळीचे वरण, पडवळ, कोबी, दुधी, भेंडी, दोडका, तांदूळजा यांसारख्या भाज्या, तूप, जिरे, धणे, जिरे, पदिना, आलं, लसूण यांची फोडणी दिलेल्या भाज्या किंवा भाज्यांचे सूप यांचा आहारात समावेश करावा.
गोड द्राक्षे, गोड डाळिंब, सफरचंद, पपई, मनुका, अंजीर, खजूर, जर्दाळू, अशी रक्तवर्धक, पाचक फळे विशेषतः दुपारी रुग्णास द्यावी. फळे ताजी व गोड असावीत.
फळांचे रस देण्याऐवजी अख्खी फळे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा विकार संभवत नाही.
कर्करोगतज्ज्ञांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली चिकित्सा घेत असताना आयुर्वेदोक्त हितकर आहार-विहाराचे व उपचारांचे पालन केल्यास कर्करोगावर मात करणे रुग्णास शक्य होते.