गरीबांना खरेच आले का ‘अच्छे दिन’?

0
214
  • राजन अ. गवस
    (उसप – दोडामार्ग)

मोदींनी भारत दौरा करून लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. प्रत्येक राज्यातील ग्रामीण भागांचा दौरा करावा म्हणजे कळेल की, खरेच आपल्या देशात जनतेची समस्या काय आहे आणि सरकार करीत असलेल्या सोयी जनतेपर्यंत पोहोचतात की नाही!

‘अच्छे दिन’ येतील या आशेवर गेली चार वर्षे जगत आहोत. पण ते दिवस कोठे गेले हे समजणे कठीण आहे, कारण इकडे सर्व स्वस्त होणार आणि आपण चांगले दिवस जगणार ही आशा मनात बाळगून होतो. पण आता मोदींची सत्ता संपत आली तरी ते दिवस येणार असल्याचे काही दिसत नाही. आम्हा भारतीयांच्या जीवनात अनेक सरकारे आली आणि गेली. किती आश्‍वासने ऐकली आणि ती हवेत विरून गेली. एखाद्या सरकारला जर आश्‍वासने द्यायची असतील तर पाच वर्षांत ती पूर्ण होतील की आपण नुसती जनतेची थट्टाच करत राहणार याचा विचार प्रत्येक पंतप्रधान किंवा राजकीय नेत्याने केला पाहिजे.

आपण कितीही जनतेला सांगितले तरी ती पूर्ण होणार नाहीत, कारण एखाद्या सरकारला पाच वर्षांत जनतेला दिलेली आश्‍वासने पूर्ण करताच येणार नाहीत. भारत देश म्हणजे हातावरचा तळ नव्हे. मग ती आश्‍वासने का द्यावीत जनतेला? पाच वर्षांचा अभ्यास करूनच त्यांची पूर्तता करावी. पाच वर्षांत सगळीच आश्‍वासने पूर्ण होतील हे साफ खोटे आहे. मग ती व्यक्ती कोणीही असो, त्याला ते जमणारच नाही. विकास म्हणजे हातातील बाहुले नव्हे. काही ठराविक भागाचा विकास झाला म्हणजे देशाचा विकास झाला असे म्हणता येणार नाही.

सभेत राजकारणी नेते किती भाषणे ठोकतात. मी गरीबांसाठी अमुक केले, मी जनतेसाठी असे केले, पण इकडे तर काहीच फरक पडलेला दिसत नाही! गरीब असो किंवा श्रीमंत असो, पूर्वीपासून जीवन जगत आहोत तेच जीवन जगत आहोत. त्यात फरक काहीच नाही. इकडे महागाई वाढत आहे. तिकडे नेते मात्र मोठमोठी पोकळ भाषणे ठोकत असतात. आज गोरगरिबांच्या नावावर सरकारने किती रुपये बँकेत ठेवले? नोटबंदी करून जे काळे धन बाहेर निघेल ते गरीबांच्या खात्यात जमा होईल असे पंतप्रधान मोदी सांगायचे. आज किती गरीबांच्या खात्यात ते जमा झाले?

शाळकरी मुलांना बँकेत खाती उघडण्यास भाग पाडले गेले. पुस्तकांऐवजी खात्यात पैसे जमा होतील असे सांगितले गेले. मग मुलांच्या खात्यात किती पैसे जमा झाले? हे केवळ पालकांना भुलवण्याचे काम सरकारने केले. असे का?

भाजपचे सरकार आले, आता सर्व स्वस्त होईल असे सांगितले गेले. कॉंग्रेसला कंटाळून जनतेने मोदींची लाट आणली, तरी जीवनात आधीचेच दिवस? लोकांना आता कळून चुकले आहे की महागाई जन्मात स्वस्त होणार नाही. अजूनही कितीतरी जण प्रतीक्षा करतात की आपल्या जीवनात चांगले दिवस येतील. आपण आपले जीवन चांगल्या प्रकारे जगू. पण नाही. उरलेल्या एका वर्षात सर्वांच्या जीवनात चांगले दिवस येतील काय?

टीव्हीवर जाहिरात दाखवली जाते की अमुक राज्यात अमुक विकास, गरिबांसाठी अमूक केले, तमूक सोयी केल्या, पण त्या सोयी देशातील कानाकोपर्‍यात पोहोचल्यात का, याचा शहानिशा का केली जात नाही? केवळ भाषणात जनतेला ठामपणे सांगितले जाते की, सर्व सोयी जनतेपर्यंत पोहोचतात. प्रत्यक्षात मात्र असे मुळीच होत नाही.

केवळ देशातील जनतेला भुलवण्यासाठी अमुक राज्यात मी अमुक सोयी केल्या असे सांगितले जाते. इतर राज्यांत ते पोहोचतच नाही. मग त्याचा फायदा काय? प्रत्येक राज्यकर्त्यांनी विचार करून भाषणे करावीत. उगाचच मी अमूक करणार, मी तमूक करणार असे सांगण्यापेक्षा प्रथम करा, नंतरच बोला. राज्यकर्ते ज्या सोयी जनतेसाठी करतात त्या सोयी प्रत्येकाच्या घरात पोहोचतात का, याचा आढावा का घेतला जात नाही? ते पाहण्यासाठी घरोघरी दौरा काढायचे सोडून नित्य परदेशी दौरे का? अशी आर्थिक उधळपट्टी करण्यापेक्षा नेत्यांनी संपूर्ण भारत दौरा करावा म्हणजे जनतेच्या समस्या काय आहेत हे तरी कळेल. निवडणुकीच्यावेळी मोठमोठ्या जाहीर सभा घेतल्या जातात. गावागावात, राज्याराज्यात सभेचे आयोजन केले जाते. मग लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सभा का घेतल्या जात नाहीत? हा खरा प्रश्‍न आहे.

मत मागण्यासाठी दारोदारी राजकीय नेते फिरतात. मग निवडून आल्यावर प्रत्येकाच्या समस्या जाणून घेण्यासाठी का येत नाहीत? पंतप्रधानांनी आपल्या देशाचा व्यापक जरुर दौरा करावा, म्हणजे जनतेेच्या खर्‍या समस्या काय आहेत हे तरी समजेल. देशातील ग्रामीण भागातील जनता खरीच आनंदी आहे की त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे? गेली अनेक वर्षे निवडणुका झाल्या. केवळ निवडणुकांच्यावेळीच सभा घेतल्या गेल्या. पण सत्ता आल्यावर?

पंतप्रधानांच्या सभा ग्रामीण भागात का होत नाहीत? खुर्चीवर बसून भाषणे ठोकणे, जनतेला आश्‍वासने देणे यापलीकडे राजकारणी दुसरे काही करीत नाहीत. धरण जवळ असूनही पाणी मिळत नाही, अशी देशातील बहुतेक राज्यांची स्थिती आहे. ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे जीवघेणे रस्ते, ते दुरुस्त कधी होणार? अशा कितीतरी ग्रामीण भागाच्या समस्या आहेत. त्या प्रथम सोडवा व नंतरच बोला की देशाचा विकास झाला. आज देशातील गरीबी कमी झाली आहे का? महागाई वाढतच आहे. आता कांद्याच्या किंमतीत वाढ झालेली आहे. तेलाच्या किंमतीत वाढ झालेली आहे. जीएसटीमुळे बहुतेकांची कामे थंडावली आहेत. त्यामुळे लोकांना रोजगार मिळणे कमी होऊन बसलेले आहे. आज गोव्यात बहुतेक परराज्यातील कामगार आहेत. त्यांना कामे मिळत नाहीत. त्यामुळे ते बेकार आहेत, असे का?

मोदी सरकार एकेक नवा नियम काढून लोकांच्या कामात व्यत्यय आणत आहेत. त्यांना जर जनतेची काळजी आहे तर त्यांनी जनताविरोधी आदेश काढू नयेत. मोदींनी भारत दौरा करून लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. प्रत्येक राज्यातील ग्रामीण भागांचा दौरा करावा म्हणजे कळेल की, खरेच आपल्या देशात जनतेची समस्या काय आहे आणि सरकार करीत असलेल्या सोयी जनतेपर्यंत पोहोचतात की नाही! त्याचवेळी समजेल की देशाची जनता किती सुखी आणि किती दुःखी आहे ते!