गरज शिक्षणमंदिरांचे पावित्र्य जपण्याची…

0
108
  • देवेश कु. कडकडे

जथे भावी पिढी घडवली जाते. ज्या वास्तूला आपण देशाचे भवितव्य आकारले जाणारे स्थान म्हणून अभिमानाने संबोधले जाते, तिथे तरी असे घृणास्पद प्रकार न घडण्याची खबरदारी घेण्याची गरज आहे.

मोफत शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मुलभूत अधिकार आहे. शिक्षणाचे महत्त्व ओळखून आता खेड्यापाड्यातून अनेक पालक आपल्या मुलांना ज्ञानमुल्य आणि कौशल्यासाठी शिक्षणाकडे वळवताना दिसत आहेत. खंबीर, शिक्षित आणि अधिकार संपन्नपूर्ण शिक्षणाबरोबर पालकांनी शाळेत आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची अपेक्षा ठेवणे यात काहीही गैर नाही.
आज वाढत्या लोकसंख्येमुळे शहरावर प्रचंड बोजा वाढत आहे. कामगारांच्या वाढत्या मागणीमुळे परप्रांतीयांचा लोंढा शहराकडे धाव घेत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. समाज बदलत आहे. औद्योगिक क्रांतीबरोबर दळणवळणाची साधने वाढली. आजचे युग इंटरनेट युग आहे. सोशल मीडियाने माणसाचे जग सुलभ आणि सुटसुटीत बनवले आहे. त्याचबरोबर अनेक विकृतीही त्यापाठोपाठ घुसल्या आहेत. माणसामधला सैतान जागा होऊन उग्र रूप धारण करू लागला आहे.
ज्या मुलांना देशाचे, समाजाचे आणि कुटुंबाचे भविष्य मानले जाते, त्या मुलांना पळविणार्‍या टोळ्या आज सक्रीय होऊन सार्‍या देशात हैदोस घालत आहे. लहान मुलांचे हात पाय कापून, त्यांचे डोळे फोडून त्यांना अपंग बनवून त्यांच्याकडून भीक मागण्याचा धंदा चालवला जातो. काहींना लैंगिक शोषणासाठी विदेशातही पाठविले जाते आणि त्यांचे जीवन अंधःकारमय जगात ढकलले जाते. यातील ८५% मुले कधीही आपल्या घरी परत येत नाहीत. त्यांच्या जीवनात अमानवी जगणे नशिबी येते. दरवर्षी अगणित निरागस मुलांचे मन आणि जीवन आपल्या माणसांपासून दूर होऊन यातना आणि शोषणाचा एक भाग बनून राहते.
आज सर्वांत जास्त शोषण हे अल्पवयीन मुलांचे होते, कारण असल्या घृणास्पद प्रकाराला विरोध करण्याची त्यांची हिंमत होत नाही. म्हणून त्या बाबतीत ते ‘सॉफ्ट टार्गेट’ होतात. त्यांना चॉकलेटसारखे आमीष दाखवून आणि नंतर हळूहळू त्यांचा विश्‍वास संपादन करून त्यांची शिकार केली जाते.
आज कमी वेळेत पैसे कमावण्याचा हव्यास, चैन करण्याची हौस, बेकारीने वाईट मार्गाला लागलेले काही तरुण-तरुणी अशी अघोरी कृत्ये करण्यास प्रवृत्त होतात. आपल्याबरोबर हे काय केले जाते हे देखील न करण्यासारखे ते वय असते. त्यामुळे त्यांच्या विरोधात आवाज फुटत नसतो. मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही विकृत मानसिकता आमच्या सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे, कारण मुलांना सुरक्षित वातावरण देणे ही आमची सर्वांचीच जबाबदारी आहे.
आपण मुलांना शाळेत पोचवले म्हणजे आपली कामगिरी संपली, आता सुरक्षिततेची काळजी शाळा व्यवस्थापनाची अशी धारणा पालकांची आहे. आज सर्व शाळांमध्ये पालक-शिक्षक संघांची स्थापना केली जाते. या संघाने मुलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य द्यायला हवे. आपण मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत खूपच गंभीर आहोत, परंतु पालक शाळेच्या सुरक्षिततेच्या मुद्यावर किती गांभीर्याने विचार करतात, हाही एक प्रश्‍नच आहे. आज अनेक सरकारी शाळेच्या इमारतीमध्ये शाळेच्या वर्गाबरोबर वाचनालय, सरकारी कर्मचारी, पतसंस्था, बालभवन इत्यादींचे कामकाज चालते. यातील अनेक इमारतींना सुरक्षित कुंपणे नाहीत, सी.सी.टी.व्ही कॅमेरे नाहीत, सुरक्षा रक्षक नाहीत. दुचाक्या सरळ शाळेच्या आवारात उभ्या केल्या जातात. कोण आला, कोण गेला याचे कुणालाही सोयरसुतक नाही. शाळेत मुलामुलींना एकच शौचालय आहे. ते किती सुरक्षित आहे हाही एक संशोधनाचा विषय आहे. काही शाळांमध्ये शौचालये नसल्यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होते. असा सर्व ‘रामभरोसे कारभार’ काही शाळांमध्ये चालला आहे.
शाळेच्या परिसरात अथवा परिसराच्या बाहेर विक्रेत्यांने फिरकता कामा नये. शिक्षकांनी मुलांना आपले घरचे काम करण्यास भाग पाडू नये, असे कडक नियम असूनही काही ठिकाणी ते धाब्यावर बसवले जातात. सर्व शिक्षा अभियानांतर्गत ‘सब पढे, सब बढे’ हा उपक्रम राबवला गेला. मुलांना शिक्षणाकडे वळविण्यासाठी माध्यान्ह आहार योजना सुरू केली गेली. मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, महिन्याच्या महिन्यास खात्यात रक्कम जमा अशा विविध योजना यशस्वीरित्या अंमलात आणल्या. त्यामुळे कष्टकरी समाजाची मुले शाळेकडे वळू लागली ही समाधानाची बाब आहे, परंतु शाळेच्या इमारतीची दुरवस्था, शिक्षकांची कमतरता यावर अजूनही सरकार गंभीर दिसत नाही.
ज्यांच्याकडे आदराने नम्र व्हावे असे शिक्षकी पेशातील काही शिक्षक मुलांचे लैंगिक शोषण करून त्या पेशाला काळीमा फासतात. ज्या बस वाहक, कंडक्टरकडे मोठ्या विश्‍वासाने आपली मुले सोपवली जातात, तेच त्यांना आपल्या विकृतीचे शिकार बनवतात आणि शाळेचे व्यवस्थापन आपल्या संस्थेची बदनामी होईल म्हणून एकतर प्रकरण दाबून तरी टाकतात अथवा त्याला वेगळे वळण लावण्याचे प्रयत्न होते. अशा रीतीने कुंपणच शेत खात असेल तर दाद कोणाकडे मागायची?
अनाथ मुले, गुन्हेगारीकडे वळणारी मुले यांना सुधारून त्यांचे जीवन सुकर बनविण्यासाठी आश्रमशाळांची स्थापना झाली, परंतु त्यांना सन्मार्गाला लावण्यापेक्षा त्यांच्याकडून, संस्थेच्या कर्मचार्‍यांकडून अंमली पदार्थांची वाहतूक करणे, त्यांना वेश्यावृत्तीला लावणे अशा प्रकारची दुष्कर्मे करून घेतली जातात आणि त्यांचे जीवन सुधारण्यापेक्षा त्यांना अधिक गुन्ह्यांच्या गर्तेत ढकलले जाते. या आश्रमशाळा म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी दुरवस्था झाली आहे.
जिथे भावी पिढी घडवली जाते. ज्या वास्तूला आपण देशाचे भवितव्य आकारले जाणारे स्थान म्हणून अभिमानाने संबोधले जाते, तिथे तरी असे घृणास्पद प्रकार न घडण्याची खबरदारी घेण्याची गरज आहे.