गरज पाकिस्तानविरुद्ध धाडसी कारवाईची

0
112
  • शैलेंद्र देवळाणकर

अमेरिकेतील सत्तांतरानंतर पाकिस्तान काहीसा बिथरला आहे. याचे कारण डोनाल्ड ट्रम्प यांची मुस्लिम राष्ट्रांसंदर्भातील भूमिका. अलीकडेच त्यांनी पाकिस्तानवर थेट नामोल्लेख करून दहशतवादाचा पाठिराखा म्हणून टीका केली आहे. इतकेच नव्हे तर जोपर्यंत पाकिस्तान हक्कानी नेटवर्क आणि अन्य दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत आर्थिक मदत स्थगित केली आहे.

गेल्या काही दिवसांत अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान काही नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यांचा आढावा घेतल्यास पाकिस्तानचे वाईट दिवस सुरु आहेत किंवा पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर येऊ लागला आहे असे म्हणावे लागेल. या सर्वांची सुरुवात झाली ती अमेरिकेतील सत्तापालटापासून. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आशिया आणि अङ्गगाणिस्तानविषयी आपले धोरण जाहीर केले तेव्हापासून. अमेरिकेच्या पूर्वीच्या धोरणांना कलाटणी देणारे अत्यंत वेगळे असे हे धोरण होते. या धोरणाची काही ठळक वैशिष्ट्ये होती. अमेरिकेच्या अङ्गगाणिस्तानविषयीच्या धोरणात पाकिस्तान सातत्याने केंद्रस्थानी असायचा; परंतु यावेळी पाकिस्तान बाजूला पडून भारत केंद्रस्थानी आला आहे.

दुसरा बदल म्हणजे अङ्गगाणिस्तानातील अस्थिरतेला तालिबान आणि हक्कानी नेटवर्क हे प्रामुख्याने जबाबदार आहेत. त्यांचा प्रशिक्षण तळ किंवा सुरक्षित स्वर्ग हा पाकिस्तानात आहे. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांसाठीचे तळ तत्काळ उद्ध्वस्त केले पाहिजेत. अन्यथा, पाकिस्तानच्या मदतीविषयी पुनर्विचार करू असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

तिसरी गोष्ट म्हणजे अङ्गगाणिस्तानातून सैन्य काढून घेण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतीही तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. ओबामांच्या काळात अङ्गगाणिस्तानातून सैन्यवापसीचा विचार सुरू झाला होता. पण ट्रम्प यांनी आता अङ्गगाणिस्तानात अतिरिक्त ३००० सैन्य पाठवण्याची घोषणा केली.
या तीन बदलांपैकी सर्वात महत्वाचा बदल होता तो पाकिस्तानविषयीचा. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर उघडपणे टीका केली. अशा प्रकारची टीका आजपर्यंतच्या राष्ट्राध्यक्षांनी केली नव्हती. परिणामी, आता पाकिस्तानवर दबाव वाढत चालला आहे. दरम्यानच्या काळात दाऊद इब्राहिमच्या इंग्लंडमधील मालमत्तेवर टाच आणण्याचा निर्णय इंग्लंडच्या थेरेसा मे यांनी घेतला. ब्रिक्स परिषदेतही जैश ए मोहम्मद आणि पाकिस्तान यांच्यावर नाव घेऊन टीका करण्यात आली होती. त्यामुळे जागतिक स्तरावर पाकिस्तान एकटा पडतो आहे.

अमेरिकेसह जागतिक समुदायाची प्रतिकूल बनत चाललेली मते लक्षात घेऊन आता पाकिस्तानने सारवासारव सुरु केली आहे. अलीकडेच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा असीङ्ग यांनी अमेरिकेच्या थींक टँकच्या कार्यक्रमात बोलताना जैश ए मोहम्मद, हाङ्गिज सईद, लष्करे तौयबा या संघटना आमच्यावर बोजा आहेत, असे एका अर्थाने नकारात्मक विधान केले होते. हे करत असताना त्यांनी थट अमेरिकेलाच लक्ष्य केल. या संघटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता दबाव वाढतो आहे. पण १९८० च्या दशकात जेव्हा अङ्गगाणिस्तानात सोव्हिएत रशियाचे सैन्य घुसले होते तेव्हा त्यांच्या विरोधात लढण्यासाठी अमेरिकेने आणि सीआयएने अनेक मुजाहिद्दीन लोकांना प्रशिक्षण दिले. या मुजाहिद्दीनांमधून पुढे जैश ए मोहम्मद आणि लष्करे तोयबा निर्माण झाले. हाङ्गीज सईद, अजहर मसूद हे सर्व अमेरिकेच्या आर्थिक समर्थनातून मोठे झाले आहेत, अशा प्रकारची मांडणी असिङ्ग यांनी केली. त्यांनी या सर्वांसाठी ‘डार्लिंग ऑङ्ग अमेरिका’ असा शब्दप्रयोग वापरला. अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये ज्यांनी मेजवान्या दिल्या गेल्या तेच लोक अमेरिकेला शिरजोर झाले आहेत, असे ते म्हणाले.

यानिमित्ताने पहिल्यांदाच पाकिस्तानच्या सरकारमधील एखाद्या या दहशतवादी नेत्यांना, संघटनांना अडगळ मानले आहे. त्याचबरोबर शासनाला त्यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. यावरुन पाकिस्तानवर वाढत चाललेला दबाव आणि या संघटनांशी असणार्‍या लागेबांध्यांपासून हात झटकण्याची पाकिस्तानी शासनाची मानसिकता स्पष्ट झाली आहे. यासंदर्भात अमेरिकेचे संरक्षण मंत्री भारतभेटीवर आले असता केलली विधाने महत्त्वाची आहेत. त्यांनी ट्रम्प यांच्याच विधानाचा पुनरुच्चार केला होता. पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले पाहिजेत आणि भारताने अङ्गगाणिस्तानात संरक्षक भूमिका पार पाडली पाहिजे असे मत नोंदवले होते. मात्र, संरक्षणमंत्री सीतारामन यांनी भारत अङ्गगाणिस्तानमध्ये विकासात्मक भूमिका पार पाडेल; कोणत्याही प्रकारे संरक्षणात्मक भूमिका पार पाडणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्री पुढे अङ्गगाणिस्तानच्या दौर्‍यावर गेले असता तेथेही त्यांनी पुन्हा पाकिस्तानवर टीका केली. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.

या सर्वांना दुजोरा देणारी घटना नुकतीच घडली आहे. २०१७ मध्ये अमेरिकेच्या अर्थसंकल्पामध्ये पाकिस्तानसाठी २५५ दशलक्ष डॉलर्स एवढ्या आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली होती. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी ही आर्थिक तरतूद पाकिस्तानला दिली जाणार नाही असे जाहीर केले आहे. आजवर अमेरिका आणि चीन हे पाकिस्तानचे दोन मुख्य पाठीराखे होते. यापैकी अमेरिकेचा पाकिस्तानवर जसजसा दबाव वाढतो आहे तसतशी पाकिस्तानची कोंडी होत आहे. मात्र अमेरिकेने आपल्या विरोधात भूमिका घेतली तरी चीन पाठीशी असल्याने आम्हाला ङ्गरक पडणार नाही, अशी पाकिस्तानची भूमिका आहे, कारण चीनबरोबरील आर्थिक परिक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानला ४२ अब्ज डॉलर्स मिळणार आहेत. मात्र ब्रिक्सच्या परिषदेत जो संयुक्त जाहीरनामा आला त्यात पाकिस्तानातील जैश मोहम्मद आणि लष्करे तोयबा या संघटनांचे नाव होते. त्यामुळे आता चीनही पाकिस्तानला कितपत उचलून धरेल याविषयी साशंकता आहे. इतकी बिकट परिस्थिती झाल्यानंतर आता तरी पाकिस्तान सुधारणार का असा प्रश्‍न उरतो. या दबावानंतरही पाकिस्तानच्या धोरणात बदल झालेला दिसत नाही, कारण हाङ्गिज सईदने त्याची संघटना जमात उद दावा या संघटनेचे रुपांतर राजकीय पक्षात केले आहे आणि पाकिस्तानमध्ये निवडणुका लढवणार असल्याचेही त्याने सांगितले आहे. हाङ्गिज सईदला राजकीय पक्ष स्थापन करण्याची परवानगी दिली जाते याचा अर्थ पाकिस्तानवर अमेरिकेच्या भूमिकेचा ङ्गारसा परिणाम झालेला नाही.

मागील काळात ट्रम्प यांनी अङ्गगाणिस्तानात तालिबानवर मदर ऑङ्ग ऑल बॉम्ब टाकून धडक कारवाई केली होती. आता तशीच कारवाई अमेरिकेने पाकिस्तानवर करण्याची गरज आहे. पाकिस्तानमध्ये हक्कानी किंवा तालिबानची जी प्रशिक्षणस्थळे आहेत ती हवाई हल्ले किंवा थेट हल्ले करून उद्ध्वस्त केले पाहिजेत. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत पाकिस्तानला जरब बसणार नाही. उत्तर कोरियाच्या उर्मट वागणुकी मागेही पाकिस्तानचा हात आहे याची अमेरिकेला कल्पना आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्यावसायिक विचारांचे आणि कडक आहेत. त्यांनी चीनलाही सुनावले आहे. आता त्यांनी पाकिस्तानातील दहशतवादाला थांबवण्यासाठी कारवाई करायला हवी, त्याशिवाय पाकिस्तानच्या वर्तणुकीत बदल होणे अशक्य आहे.