‘गम्मत जम्मत’ तेव्हाचा सैराट चित्रपट : वर्षा

0
237
  • कालिका बापट

काळाचा महिमा न्यारा असतो, हे सध्याच्या फिल्म जगतातील घडामोडीवरून दिसते. सत्तावीस, अठ्ठावीस वर्षांपूर्वी गोव्याचा माहोलच वेगळा होता. एवढेच नव्हे तर मराठी सिनेसृष्टीतही कमालीचा बदल झाला आहे. आपण भूमिका केलेला तेव्हाचा सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘गम्मत जम्मत’ हा गाजलेला चित्रपट म्हणजे तेव्हाचा ‘सैराट’ होता, असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले.

बायोस्कोप व्हिलेजच्या ‘स्किल स्टुडिओ’त त्यांनी अभिनेत्री म्हणून घडत असतानाचा प्रवास कथन केला. यावेळी त्या पुढे म्हणाल्या, अभिनयात उतरणे हा माझा चॉईस होता. त्याप्रमाणे आपण करियर म्हणून या क्षेत्राकडे वळले. सर्वांचा समज होता की, राजकीय नेत्याची मुलगी राजकारणातच उतरणार. परंतु मला अभिनय करायचा होता. त्यामुळे जेव्हा नाटककार दामू केंकरे यांनी आपल्याला संधी दिली तेव्हा आपण त्या संधीचा लाभ घेतला. ‘कार्टी प्रेमात पडली’ हे माझे पहिलेच नाटक. त्यानंतर ब्रह्मचारी’ नाटकातील भूमिका पाहून सचिन पिळगावकर यांनी आपल्याला ‘गम्मत जम्मत’साठी घेतले. हा माझा मराठीतला पहिलाच चित्रपट. त्यानंतर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केल्यावर मी हिंदी सिनेसृष्टीत उतरले. नाना पाटेकरांची आपण पहिली सहकलाकार असे वर्षा उसगावकर यावेळी म्हणाल्या.

गोव्यातील सिनेजगतावर प्रकाशझोत टाकताना त्या म्हणाल्या की, माझ्या लहानपणी गोव्यात शुटिंग व्हायचे परंतु अभिनय क्षेत्रात जायला तशी सोय नव्हती. इथे तर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर कितीतरी वर्षाने चित्रपट यायचा. त्यामुळे फिल्मसाठी गोवा पोषक नव्हता. आज तर उलट झालेले आहे. आमचे चित्रपट सातासमुद्रापार जाऊ लागले आहेत. हाच तर काळाचा महिमा आहे. मला गोवेकर कलाकारांचे फार कौतुक वाटते. आज आपले चित्रपट कुठच्या कुठे पोहोचू लागले आहे. राजेंद्र तालक, राजेश पेडणेकर यांच्यासारखे फिल्ममेकर दर्जेदार चित्रपट निर्मिती करू लागले आहेत. नाचुया कुंपासार, ओ मारिया, के सेरा सेरा हे चित्रपट महोत्सवांमध्ये गाजू लागले आहेत. हेच तर खरे यश आहे, असे पुढे वर्षा उसगावकर म्हणाल्या.
त्यांनी आपल्या आवडत्या भूमिकांविषयी यावेळी सांगितले. सोनी टीव्हीवर एकेकाळी हेमा मालिनीची ‘झॉंसी की राणी’ मालिका यायची. हेमा मालिनीने आपल्या घरी बोलावून मला ही भूमिका ऑफर केली होती. त्यानंतर झॉंशीच्या राणीवर अनेक मालिका झाल्या. परंतु ही एकमेव अशी मालिका होती जी इतिहासावर आधारलेली होती. ही माझी अत्यंत आवडती भूमिका. आणि माझ्या या अभिनयाच्या प्रवासात नृत्यावर आधारलेली ‘पैंजण’ या चित्रपटातील माझी भूमिका माझी आवडती आहे. आतापर्यंत आपण अनेक हिंदी, मराठी चित्रपट केले. प्रेक्षक आजही भरभरून प्रेम देतात, असे त्या म्हणाल्या. प्रादशिक चित्रपटांविषयी बोलताना त्या म्हणाल्या, आपण जेव्हा चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला, तेव्हाचा काळ फारच वेगळा होता. आज काळ बदललाय तेव्हा नवीन मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा.

गोव्याचा चित्रपट सर्वांगसुंदर
आपला चित्रपट आता कुठेच मागे नसून आपला चित्रपट सर्वांगसुंदर असा असतो. गोव्यातल्या चित्रपटानेही आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपला प्रदर्शित होणारा आगामी चित्रपट कोकणी असून त्यात आपण सासुची प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रीन्स जॅकब, केव्हीन डिमेलो यांच्या यात भूमिका आहेत.