गणेश चतुर्थी विशेष – लोकमानसाच्या हृदयातील गणपती

0
602

– सौ. पौर्णिमा केरकर
भारतीय लोकमानसाला भूमी ही केवळ अन्नधान्य पुरविणारी उपजावी जमीन वाटली नाही. तिच्यात त्यांनी भूदेवी आणि भूमातेचे रूप पाहिले. सर्जन, सुफलीकरण, संरक्षण आणि समृद्धी यांची अधिष्ठात्री देवता म्हणून भूमीकडे त्यांनी पाहिले. पावसात ही भूमी सर्वांगाने सचैल न्हाते. तिच्या अंगाखांद्यावरची माती पाण्याबरोबर वाहत खाली येते. अशा मातीत पेरलेले उगविण्याची ताकद असते. आणि यासाठी या मातीला एकत्रित करून तिच्या गोळ्यापासून गणपतीची मूर्ती तयार केली जाते.
सस्तन प्राण्यांत हत्ती हा बुद्धिवान. त्यासाठी त्याचे शीर आणि मनुष्याचे शरीर अशा समन्वयातून अज्ञात कालखंडात लोकमानसाचा गणपती जन्माला आला. नृत्य, नाट्य, गायन, वादन अशा विविध कलागुणांनी संपन्न असलेला हा गजानन त्यांच्यासाठी प्रेरणाशक्ती झाला. पार्वती म्हणजे भूमीच! आणि तिच्या मातीतून आकाराला आलेला पुत्र म्हणजे श्रीगणेश. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली नाळ या भूमीशी समरस झालेली असते. लौकिक सुखसंपदा आणि आरोग्य, भौतिक समृद्धी व प्रजनन, आयुष्यभरासाठी संवर्धन आणि संरक्षण या भूमातेच्या कृपेने लाभावे म्हणून मातीच्या गोळ्याला गजाननाचे रूप देऊन त्याचे पूजन करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत निर्माण झाली.
गणपती हा या वसुंधरेचा पुत्र. याउलट कार्तिकेय हा गिरिराज शंकराचा पुत्र. गणपती उंदरावरती स्वार, तर कार्तिकेय मोरावरती. या दोन्ही पुत्रांचा संबंध मातीशी. त्यामुळे भाद्रपदात शुक्लपक्षातील चतुर्थीला मातीला गजाननाचा आकार देऊन पूजा केली जाते, तर आश्‍विन कार्तिकात वारुळाच्या मातीला पारंपरिक फुलांनी सजवून ‘धिल्लो’ म्हणून कार्तिकेयाची पूजा करण्याची परंपरा लोकमानसात आहे.
मानवी समाजाला जगण्यासाठी आवश्यक अन्नधान्याची निर्मिती ही पार्वती रूपातील धरित्री करते आणि म्हणूनच गोव्यातल्या नानाविध जाती-जमातीत पार्वतीविषयीची कृतज्ञता गणपती आणि कार्तिकेयाला मृण्मयी रूपात पुजून व्यक्त केली जाते. गणपतीच्या उत्पत्तीविषयीच्या अनेक कथा-दंतकथा लोकगीतांतून आविष्कृत होतात.
गवरीच्या पुतरा रे तुझी उत्पत्ती कशी झाली रे
चिकट चिकट माती गे माते
थापिली पेडयेवरी गे माते
मी नावाचा गणपती गे माते
गवरीच्या पुतरा रे तुझे सोणच कसे वाकडे रे
हतया घरी गेलो गे माते
सोण से जाले वाकडे गे माते
गवरीच्या पुतरा रे तुझे पोटच कसे मोठे रे
सप्तमीचे राती चवथीचे दिवशी खायीले नेवरे
तेणे माझे पोटच जाले मोठे रे
गणपतीचे वाकडेतिकडे सोंड, मोठाले पोट या सार्‍याचा मथितार्थ आपल्या परीने काढताना लोकमानसाने आपल्या जगण्यातील संदर्भच त्याला लावलेले दिसतात. म्हणूनच गणपतीचे पोट मोठे होते, कारण त्याने भरपूर नेवर्‍या, करंज्या खाल्लेल्या असतात. गणेशचतुर्थी म्हटल्यानंतर लहान मंडळी आणि स्त्रिया यांना या उत्सवाची असीम ओढ. ‘चवथीबाई तू कधी गे येशी, पावस पडे नदीवरी येईन भागीयात’ अशी आतुरता दिसते म्हणूनच तर-
आमचो गणोबा मोकाशी
भुलोन हाडीला लोकाशी
आमचो गणोबा तिपर्‍यांनी खेळे
सोनियाचा जानिया धोनावर लोळे
कचे बाये कचे वल्लीभर कचे
आमच्या गणोबाचे सोन्याचे मोचे
गणोबा हा त्यांचा जिवाभावाचा. त्याच्यासाठीच्या सार्‍या वस्तू या किमती आणि मौल्यवान. पेडणे, सत्तरी, डिचोलीसारख्या तालुक्यांतील गावात दवली-माण वादनाची परंपरा चतुर्थीच्या दिवसांत पाहायला मिळते. घरातली स्त्री सर्व तर्‍हेची आवराआवर करण्यासाठी सकाळच्या प्रहरी उठते त्यावेळेला ती दवली घेऊन माण वाजवते. हे वादन करत असताना गणेशाचे स्तवन गाते. हे गायन व वादन जणू काही गणेशाला उठविण्यासाठीची नौबतच असते.
दवले माणीचा वाजाप
आमचो गणोबा बसलो मखरात
तेचो उंदाराचो वारू
दवले माणीचा वाजाप
असे म्हणून गणेशाला उठविण्याची परंपरा आहे. व्यक्ती, कुटुंब, समाज आणि निसर्ग यांच्याशी बांधिलकी ठेवणार्‍या गणेशोत्सवाशी निगडीत अनेक कथानकं दिसतात. गाण्यातूनच त्यांना मूर्त स्वरूप देताना लोकमानस गाते-
दवले माणीचा वाजाप
गणपती बसला मखरात
पायार हरयाळेचो भार
हातीत फुलांचो गे भार
सोनार शेंदुराचो भार
माथ्यार मुगूटाचो भार
मूर्ती दिसता सुंदर
तेचो वारू हुंदराचो
गणपती वारवार सुवार जालो
वारू चलाक लागलो
पुढे जाऊनी निसाटलो
चंद्र हसाक लागलो
गणपतीन सराप गे दिलो
चवथीचे तथये चंद्रमा
नजरे घालू नये…
अशी दंतकथा गणोबाभोवती गुंफलेली दिसते. श्रीगणेश हे लोकदैवत, त्यामुळे सर्वांनाच त्याच्याविषयी अतिव जिव्हाळा. तो आपलाच आहे, आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणेच त्याच्याकडे बघण्याची वृत्ती खास करून स्त्रियांत दिसते. त्याच्या आगमनाचे तिला अतिव वेड. कितीतरी दिवस अगोदरपासून ती त्याचे स्वागत करण्याची तयारी करीत असते. घासूनपुसून ठेवलेली देवपूजेची भांडी, सडा-सारवण, त्याशिवाय नैवेद्याची तयारी करण्यासाठी लागणारे सामान, त्यांची जमवाजमव याच्यातच तिचा वेळ कसा जातो काही कळत नाही. हा हा म्हणता चवथ जवळ येऊन ठेपते. सार्‍या कामाच्या पसार्‍यातून तिला वेळ हवा असतो. फुगडी घालण्यासाठी कितीही व्यस्त असली तरी ती फुगडी घालणारच. त्याच्या जन्माचा सोहळा अधोरेखित करणारे गीत म्हणून गणपती तिच्यासाठी भव्यदिव्य नसतो तर तो तिचा ‘गणोबा’ असतो. आपुलकीच्या जिव्हाळ्यात निर्माण झालेले हे नाते. म्हणून पार्वतीने गणोबाला जन्म दिला, त्या जन्माची कूळकथा ती गीतातून जेव्हा व्यक्त करते तेव्हा पार्वती, गणोबा, म्हादेव ही श्रद्धास्थाने सर्वसामान्य व्यक्तिमत्त्वे म्हणूनच समोर ठाकतात.
पार्वती मुलाची वांझ गे तिका भुरगी नाही बाळ गे
म्हादेव गेला गे कैलासी, म्हादेवाक जाली बारा वर्सा
काढली कोमशाची निसण, लायली माळ्यावरी
पार्वतीन काढले नारळ, नारळ फोडुनी रस पिळीला
लायीला आपुल्या अंगी, आंगीच्या मळीयाचे बाहुले केले
बाहुल्याक जीवनदान दिले, पार्वती वले उमळूक गेली
तितक्यान आला गे म्हादेव देव, आगे तू माझे बाई
हे बाळ कोणाचे, ते बाळ पार्वती मायेचे
मी गेल्लय शिकारेक, तिका खयचे बाळ गे
काडीली कमरेची सुरी, तेका गे कोपा भरीलो
सुरी काडून तेणी लायली बाळाच्या उरी गे
शीर गे गेले गगनी, लुण पडले गे धरणीवरी
शंकर म्हणतात, आपण शिकारीसाठी गेलो त्याला बारा वर्षे झाली, पार्वतीला हे बाळ कोठून झाले? शंकराचा पुरुषी अहंकार जागा होतो. मागचा पुढचा विचार न करता तो सुरी काढून त्या मुलाचे शीर धडापासून वेगळे करतो. पार्वती जेव्हा हे बघते तेव्हा ती आकांत करते. माझ्या बाळाला तुम्ही कोठे पाहिले आहे काय? असे दुःखभरल्या शब्दांनी ती विचारत सुटते, पण कोणीही तिला काहीही सांगत नाही. आपले मूल हरवल्यानंतर एखाद्या सर्वसामान्य लेकुरवाळ्या स्त्रीची जशी अवस्था होईल, तशीच तिची झालेली आहे. ती सर्वांनाच आपले बाळ कोठे हरवले असे विचारत फिरते. तिचा ताण काही कमी होत नाही. पार्वती विचारते-
आगे तू सासू माझे बाई, हुमर्‍यावयले बाळ माझे खय गे
हुमर्‍यावयले बाळ गेला भोवाच्याक
पार्वती गावान भोवली, बाळ काय नजरेक पडाना
आली गे घरा नी माला, पार्वती रडूक बैसली
तोही गे पापाचा नाही, तोही गे घाताचा नाही
आंगीच्या मळीचे बाहुले केले, तो माझ्या सत्त्वाचा होय गे
असे म्हणत जिवाच्या आकांताने ती बाळाचा शोध घेते. आपले पावित्र्य सांगण्याचा प्रयत्न करते. समाजामध्ये वावरणार्‍या स्त्रीमनाची अशीच व्यथा अशा तर्‍हेच्या प्रसंगातून समोर आली असती. गणेशजन्माच्या या कथेतून ही एकूणच कौटुंबिक स्तरावर जीवन जगणार्‍या साध्यासुध्या पारंपरिक स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारी स्त्री दिसते, तर शंकर पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतीक बनून समोर येतो. त्यातही आपल्या पत्नीवर प्रेम असलेला पुरुष तिची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. शंकराचेही तसेच झाले. अनवधनाने त्याच्या हातून ही चूक घडली होती ती त्याला निस्तरायची होती. आपले पुण्य पणाला लावून पार्वतीचे स्वत्व जतन करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. पार्वतीचा आकांत ऐकून शंकर तेथे येतात-
आरे तुमी रामजी गोमजी शिपायांनो, चला नी रानी नी वनी
बाळाचा पत्ता नी नाही, वाटेर गावला बोकडाचा लुण
शिपाई पुढे सरले, वाटेर गावला हतयाचा लुण
काढिली कमरेची सुरी, लायीली हतयाचे उरी
घेतले हतयाचे शीर, लायीले बाळाचे वरी
बाळाला जीवनदान दिले, पार्वती संतुष्ट जाली
गणेशाची जन्मकथा वेगवेगळ्या लोकगीतांतून वैविध्यपूर्ण रूपातून प्रस्तुत होताना दिसते. प्रत्येक ठिकाणी फरक जरी जाणवत राहिला तरी स्त्रीमनात गणेशाविषयी असलेली आत्मीयताच दिसून येते. जीवन जगताना केवढे जरी कष्ट उपसावे लागले तरी त्याच्या श्रद्धेमुळेच सारे श्रम हलके होतात ही भावना आहे. म्हणून उत्साह वाढतो, अंगात ऊर्जा येते. गणेशचतुर्थीच्या दिवसांत पावित्र्य, मांगल्याचे वातावरण निर्माण होते. बुद्धी, ज्ञान, कौशल्य, नृत्य, नाट्य, संगीत अशा अनेकविध पैलूंनी विनटलेली ही देवता सर्वांनाच आपलीशी वाटते. पर्वत धारण करणारी ती पार्वती. तिच्या मळापासून म्हणजेच मातीपासून तयार केलेले बाळ म्हणजे गणोबा. मृण्मयी गणोबा व त्याची माता गवर, गौरी, पार्वती यांचे अतूट नातेच गणेशचतुर्थीच्या निमित्ताने आपल्यासमोर येते. गौरी पूजनाचा आगळावेगळा थाट, हरितालिका व्रत हे गणेशचतुर्थीचे एक अविभाज्य अंग बनून राहिलेले दृष्टीस पडते.
भौगोलिक दृष्टीने विचार करता गोवा हा जरी छोटा प्रदेश असला तरी कलेच्या माध्यमातली त्याची श्रीमंती फार मोठी आहे आणि त्यासाठी कला-संस्कृतीचा अधिष्ठात्रा गणपतीची भाद्रपदातल्या चवथीला पूजा करून त्याच्या नावाने दीड, तीन, पाच, एकवीस दिवस उत्सव साजरा करून आपल्या कुटुंबीयांना, सग्या-सोयर्‍यांना उत्साहाची पर्वणी प्रदान करणे यथोचित वाटते. गणपती हा पार्वतीपुत्र म्हणून त्याचा उत्सव भाद्रपदात, तर कार्तिकेय हा शंकराचा पुत्र म्हणून आदिवासी वेळीप जमात म्हणते, ‘आकरी पाकरी धिल्या तुझी चाकरी.’ त्याच्या नावाने लोकगीते गात धिल्याचा उत्सव साजरा होतो. फुगड्यांचा आणि धिल्यासाठी खास सादर केला जाणारा नृत्यप्रकार पेश करणे आपले कर्तव्य मानतो. भगवान शिवशंभो हा अनार्य परंपरेतील देव. सिंधू संस्कृतीत माथ्यावरती तीन शिंगे धारण केलेला देव आणि नेपाळातील काठमांडूला पशुपतीनाथाच्या रूपातील दुवे शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यातून या दैवतसंकल्पनेची प्रचिती येते.
गोव्यातील स्त्रियांनी फुगड्यांतील झिनोळी असो अथवा पहाटे उठून म्हटली जाणारी दवले-माणीची गीते असो, या सार्‍यांतून गणेशाला अभिवादन करताना माती, धरित्रीविषयीची अथांग कृतज्ञता प्रगट केलेली आहे. पेडणे ते काणकोणपर्यंत नाना जाती-जमातींत असलेल्या लोकगीतांतून गणपतीच्या स्वरूपाचे जे दर्शन होते त्यातून इथल्या एकेकाळी रूढ असलेल्या सांस्कृतिक आणि लोकधर्मात पूर्वापार रुतलेल्या श्रद्धा-परंपरा यांचे मनोज्ञ दर्शन घडते.