गडकरींचा संकल्प

0
103

निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच गोव्यात केला. गडकरी यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यापाशी विकासाची दृष्टी आहे. नेत्यापाशी जे द्रष्टेपण असावे लागते, कल्पकता असावी लागते आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे ठरवलेले काम करून घेण्याची क्षमता असावी लागते, ती गडकरींपाशी आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक मंत्रिपदाच्या कारकिर्दीत, मग ते महाराष्ट्रातील असो किंवा केंद्रातील; त्यांनी आपल्या कामाचा ठसठशीत ठसा आजवर उमटवलेला आहे. मुंबईतील उड्डाणपूल असोत वा मुंबई – पुणे महामार्ग असो, गडकरींच्या कार्यक्षमतेच्या आणि दूरदृष्टीच्या या पाऊलखुणा आहेत. गोव्याशी काही नातेसंबंध नसूनही गोव्याविषयी व गोमंतकीयांविषयी त्यांच्या मनात खास कोपरा आहे हेही आजवर वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे हे जे प्रकल्प त्यांनी गोव्यासाठी संकल्पिलेले आहेत, ते वेगाने तडीस नेतील अशी अपेक्षा आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर हे प्रकल्प सुरू करण्यामागे मतदारांना दिपवून टाकण्याची राजकीय गणिते भले असोत, परंतु गोव्याच्या दृष्टीने अत्यंत निकडीचे असे हे प्रकल्प आहेत आणि येणार्‍या निवडणुकीत राज्यात कोणाचेही सरकार येवो, या सार्‍या गोष्टी होणे गोव्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. पत्रादेवी – पोळे दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचा विषय आजवर या ना त्या कारणाने रखडत आला होता. हे रुंदीकरण प्रस्तावित असूनही महामार्गाच्या कडेने अलीकडेपर्यंत शोरूमपासून मॉलपर्यंत अनेक नवी बांधकामे उभी राहिली. त्यामुळे या मार्गाच्या चौपदरीकरणावर आपल्याला समाधान मानावे लागणार आहे. पत्रादेवी ते करासवाडा आणि करासवाडा ते वेर्णा अशा दोन टप्प्यांत हे महामार्ग रुंदीकरण होणार आहे आणि त्यानंतर वेर्णा ते पोळे रस्त्याची निविदाही निघेल. रस्ते ही कोणत्याही राज्याची भाग्यरेषा असते. गतिमान आणि सुरक्षित रस्ते ही काळाची गरज आहे आणि गोव्यासारख्या देशात सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या राज्यामध्ये वाहनांची प्रचंड वाढती संख्या लक्षात घेता रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे उत्तम दर्जाचे प्रशस्त रस्ते ही गोव्याची आत्यंतिक गरज आहे. मांडवीवर तिसरा पूल दिमाखात उभा राहात असतानाच जुवारीवरील पुलाचे कामही पुढे नेऊन गडकरींनी गोवेकरांना मोठा दिलासा दिला आहे. हा पूल केवळ पूल न ठरता पर्यटकांचेही आकर्षणस्थळ ठरावा ही त्यांची कल्पनाही प्रशंसनीय आहे. या पुलावर प्रदर्शन मनोरे, फिरते रेस्तरॉं वगैरे कल्पना गडकरींनी मांडल्या आहेत. हे सारे योग्य स्वरूपात साकारता आले, तर जुवारी नदी समुद्राला मिळत असतानाच्या सूर्यास्ताचे ते रमणीय दृश्य डोळ्यांत साठवण्यासाठी पर्यटकांची तेथे रीघ लागेल यात शंका नाही. आपल्या रूढ पारंपरिक कल्पनांच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी असेल तरच अशा भन्नाट कल्पना सुचू शकतात. आगशी व कुठ्ठाळीवासियांच्या रुंदीकरणासंदर्भात ज्या तक्रारी आहेत, त्यांचे योग्य ते निरसनही अर्थातच व्हावे लागेल. जलमार्ग सुधारणांचा संकल्पही गडकरींनी सोडला आहे. जलमार्ग राष्ट्रीयीकरणाचा प्रस्ताव काही काळापूर्वी त्यांनी मांडताच त्याला विरोधाच्या हाकाट्या सुरू झाल्या, परंतु आजवर खाणमातीच्या गाळाने या नद्या भरल्या होत्या, तेव्हा कोणी त्या नद्यांचा कैवार घ्यायला पुढे सरसावलेला नव्हता. आपल्या ताज्या दौर्‍यात मच्छीमारी जेटींपासून क्रूझ टर्मिनलपर्यंतच्या कामांचा शुभारंभ त्यांनी केला. गोव्याच्या दृष्टीने यादेखील महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या सार्‍या प्रकल्पांना साकारण्याचे गडकरींचे स्वप्न ठरलेल्या कालमर्यादेत प्रत्यक्षात यावे आणि त्यात गोव्यातील राजकीय घडामोडींची आडकाठी येऊ नये एवढीच अपेक्षा.