गंभीर आरोप

0
133

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसने गुजरातमध्ये भाजपच्या पराभवासाठी पाकिस्तानशी हातमिळवणी केली असल्याचा आरोप करून वादाचा नवा धुरळा उडवून दिला आहे. एखाद्या देशांतर्गत घडामोडीमध्ये ‘विदेशी हात’ असल्याचे सांगण्याचा प्रकार आजवरच्या इतिहासात अनेकदा घडला. विरोधकांना नामोहरम करण्याचे ते एक अमोघ अस्त्र मानले गेले. परंतु गुजरातच्या निवडणुकीत पाकिस्तानचा नामोल्लेख अशा प्रकारे होणे याला काही विशेष अर्थ आहे. या घणाघाती आरोपाला पार्श्वभूमी घडली ती दोन घटनांची. पाकिस्तानच्या एका माजी लष्कराधिकार्‍याने कॉंग्रेसचे अहमद पटेल गुजरातचे मुख्यमंत्री बनावेत ही ट्वीटरवरून व्यक्त केलेली इच्छा आणि कॉंग्रेसमधून नुकतीच हकालपट्टी झालेले मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या सन्मानार्थ आपल्या घरी आयोजित केलेली मेजवानी. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसवर अचूक शरसंधान करून पाकिस्तानची मदत या निवडणुकीत घेण्यात येत असल्याचा घणाघाती आरोप करून कॉंग्रेसला अडचणीत आणले आहे. वास्तविक ही मेजवानी खासगी स्वरुपाची होती आणि त्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी लष्कर प्रमुख यांच्यासह अनेक बड्या हस्तीं उपस्थित होत्या. त्या मेजवानीला कसुरींबरोबरच पाकिस्तानचे उच्चायुक्त वगैरेही उपस्थित होते. यावेळी गुजरात निवडणुकीचा विषय भले चर्चिला गेला नसेल, परंतु काश्मीर आणि भारत पाकिस्तान संबंधांवर चर्चा झाली असे उपस्थितांचे म्हणणे आहे. खरे तर मणिशंकर अय्यर यांना काश्मीरवर किंवा भारत – पाकिस्तान संबंधांवर अशा प्रकारची चर्चा घडवून आणण्यासाठी पुढाकार घेण्याचा मक्ता दिला कोणी? उभय देशांमधील संबंध उरी आणि पठाणकोटनंतर ताणलेले असताना त्यांना हा चोंबडेपणा करण्याची काही आवश्यकता नव्हती. भारताची बाजू मांडावी अशा कोणत्याही पदावर ते नाहीत वा तशी शक्यताही नजीकच्या भविष्यात नाही. तरीही पाकिस्तानी मंडळींना गळामिठी मारण्याचा हा खटाटोप त्यांच्या एकूण इराद्यांविषयी शंका निर्माण करतो. या मेजवानीस उपस्थित पाहुणे म्हणतात त्याप्रमाणे गुजरातच्या निवडणुकीशी अवाक्षरही त्या मेजवानीत खरोखर उच्चारले गेले नव्हते असे जरी मानले, तरीही या आरोपातून नकळत धार्मिक ध्रुवीकरणाला चालना मिळाली आहे. गुजरातमधील राजकीय निरीक्षकांच्या मते निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात ज्या अहमदाबाद, वडोदरा आदी शहरी भागांमध्ये मतदान व्हायचे आहे, तेथील मतदारांमध्ये ध्रुवीकरण करण्यासाठीच हा डाव पंतप्रधानांनी टाकला आहे. पंतप्रधानांनी कॉंग्रेसवर केलेल्या आरोपात तथ्य असो वा नसो, तो पक्ष एका क्षणार्धात बॅकफूटवर गेल्याचे मात्र दिसून आले. भाजपाने नेहमीच स्वतःला राष्ट्रहिताचा कैवारी म्हणून प्रस्तुत केलेले आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या भावनेला विविध रूपांत भाजपा आणि संघपरिवारातील संस्थांकडून हिरीरीने प्रस्तुत केले जात असते. त्या सार्‍या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नेत्यांना कॉंग्रेसजनांनी दिलेले प्रेमाचे आवतण मतदारांना निश्‍चितच रुचणार नाही. त्याचाच येत्या निवडणुकीत फायदा उठवण्याचा भाजपचा हा अत्यंत चतुर प्रयत्न आहे. अलीकडेच झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प हेच निवडून यावेत व हिलरी क्लिंटन पराभूत व्हाव्यात यासाठी रशियाने ट्रम्प यांच्या प्रचारकार्यास मदत केली होती असा आरोप झाला होता आणि त्यात बरेच तथ्यही आढळून आले आहे. ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना त्या आरोपावरून राजीनामाही द्यावा लागला. त्यामुळे एखाद्या देशाच्या राजकारणामध्ये दुसर्‍या देशाकडून – तोही शत्रूराष्ट्राकडून हस्तक्षेप होणे याचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणे असाच लावला जातो. भारत आणि पाकिस्तानचे ताणले गेलेले संबंध, त्यातील ताणतणाव, कधीही भडका उडू शकेल असे ज्वालाग्राही वातावरण हे सगळे माहीत असूनही पाकिस्तानी मंडळींसाठी पायघड्या अंथरण्याचा जो प्रयत्न अय्यर महोदयांनी केला, तो त्यांच्या वैयक्तिक स्नेहसंबंधांतून जरी केला गेलेला असला तरी त्याचा फटका मात्र आता त्यांना ज्या पक्षातून हाकलण्यात आले आहे, त्या कॉंग्रेसला बसला आहे. निवडणुकीचा प्रचार ही रणधुमाळी असते. आपल्याकडे अटीतटीने निवडणुका लढल्या जात असताना प्रचाराची पातळी सांभाळली जात नाही. सपासप वार केले जातात. आरोप – प्रत्यारोपांच्या या धुमाळीत मतदार गोंधळून जातो. त्यामुळे गुजरातमधील मतदारावर स्वतः पंतप्रधानांनी कॉंग्रेसवर पाकिस्तानी नेतृत्वाची मदत घेतल्याचा केलेला अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप काय परिणाम करतो, मतदारांचे ध्रुवीकरण घडवतो का, हे अर्थातच येणारा निकाल सांगेल, परंतु कॉंग्रेसविषयी मात्र एक साशंकता व संभ्रमाचा धूर या आरोपाने अकारण निर्माण केला आहे.