खोतीगाव अभयारण्यात पक्ष्यांच्या २४० प्रजाती

0
173

>> दुसर्‍या गोवा राज्य पक्षी महोत्सवाची तयारी जोरात

काणकोण तालुक्यातील खोतीगाव अभयारण्यात येत्या १२ ते १४ दरम्यान होणार्‍या दुसर्‍या पक्षी महोत्सवासाठीची तयारी सध्या जोरात सुरू असल्याची माहिती वन खात्यातील सूत्रांनी दिली. यंदाचा महोत्सव भव्य स्वरुपाचा असेल असे सांगण्यात आले. खोतीगाव अभयारण्यात पक्ष्यांच्या २४० प्रजाती असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.

खोतीगावात पक्ष्यांच्या २४० प्रजाती
पक्षी महोत्सवासाठी खोतीगाव अभयारण्याचीच निवड का करण्यात आली याविषयी माहिती देताना सूत्रांनी सांगितले की हे अभयारण्य हे पक्ष्यांच्या दृष्टीने फार समृद्ध असून तेथे पक्ष्यांच्या तब्बल २४० प्रजाती आहेत. एखाद्या अभयारण्यात पक्ष्यांच्या २४० प्रजाती असणे ही साधी गोष्ट नसून खोतीगाव अभयारण्यासाठी ही गोष्ट भूषणावह असल्याचे सूत्रांनी नमूद केले. खोतीगाव अभयारण्यात पक्ष्यांच्या किती प्रजाती आहेत त्यावर वन खात्याचे एक पथक गेली दोन वर्षे नजर ठेवून होते. या दोन वर्षांच्या काळात या पथकाला तेथे पक्ष्यांच्या तब्बल २४० प्रजाती सापडल्याने गोव्यातील हे पक्षी धन पाहण्याची जगभरातील लोकांना संधी मिळावी व पर्यायाने नंदनवन असलेल्या गोव्याचे आणखी कौतुक व्हावे हाही हा महोत्सव आयोजित करण्यामागील उद्देश आहे.

नामवंत पक्षीतज्ज्ञ उपस्थित राहणार
पक्षी महोत्सवाला पक्षी तज्ज्ञ रोहन चक्रवर्ती, शरद आपटे, डॉ. विभू प्रकाश आदी मान्यवर उपस्थिती लावणार असून ते महोत्सवातील तांत्रिक सत्रातून पक्षांविषयीची माहिती या महोत्सवाला हजर राहणार्‍यांना देणार आहेत.
शरद आपटे हे एक जगप्रसिद्ध असे पक्षी तज्ज्ञ असून त्यांनी जगभरातील पक्ष्यांच्या कुंजनांचे रेकॉर्डिंग केलेले आहे. त्यापैकी काही निवडक पक्ष्यांच्या कुंजनाचे रेकॉर्डिंगही महोत्सवाला हजर राहिलेल्या लोकांना त्यांच्याकडून ऐकायला मिळणार आहे.

डॉ. विभू प्रकाश हेही जगप्रसिद्ध असे पक्षी तज्ज्ञ असून गिधाडांचे संवर्धन कसे करायचे यावर त्यांचा अभ्यास आहे. त्यांचे त्यासंबंधीचे एक खास व्याख्यान महोत्सवात होणार आहे.
पक्षी महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील पक्षांच्या शेकडो प्रजाती पाहतानाच त्यांना या पक्षांच्या सौंदर्याबरोबरच त्यांचे कुंजन व किलबिलाट यांचाही अनुभव घेता येणार असून त्यांच्यासाठी हा एक वेगळा व अनोखा असा अनुभव ठरणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.