खोट्या जाहिरातींपासून सावध रहा!

0
112

– विनोद आपटे

गुंतवणूक का करावी?… हे आपण आधी पाहिले आहे. पण गुंतवणूक करताना आपण ती कोणत्या ठिकाणी करत आहोत हे आधी समजून घेतले पाहिजे. माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव असा सांगतो की बरेचदा आपण गुंतवणूक आपल्या अगदी जवळच्या, ओळखीच्या किंवा नातेवाईक यांपैकी कोणाच्यातरी सल्ल्यावरून करत असतो. व्यक्ती चांगली परिचयाची असल्यामुळे बरेचदा मनात संशय असून किंवा त्याने दिलेला सल्ला पटला नाही तरीसुद्धा आपण त्याच्याकडे गुंतवणूक करतो. कारण आपल्या मनात भीती असते ती अशी- ‘समजा मी त्याला जास्त प्रश्‍न केले तर त्याला वाईट वाटेल किंवा तो नाराज होईल, या कारणामुळे आपल्या नात्यात दुरावा येईल!’
खरे पाहता या नात्याचा किंवा जी जवळीक असते तिचा फायदा याच्यातले बरेच अपरिपक्व सल्लागार घेत असतात. याचा परिणाम म्हणून गुंतवणुकीतून एकतर आपल्याला अपेक्षित फायदा होत नाही किंवा कधी कधी नुकसानसुद्धा होते.
अगदी जवळचे उदाहरण घ्यायचे झाल्यास जीवन विमा करणार्‍या कंपनीत नव्याने सल्लागार म्हणून नियुक्त झालेली व्यक्ती यांना महिन्याला काही पॉलिसी करण्याचे लक्ष्य दिले जाते. यातील काहीजण सुरुवात म्हणून आपल्या घरातील व्यक्ती, नातेवाईक किंवा मित्र यांना पॉलिसी विकतात. माझे एवढेच सांगणे आहे की जीवनविमा ही गुंतवणूक असू शकत नाही कारण विमा ही सुरक्षेची बाब आहे. समजा घरची कमावणारी व्यक्ती असते तिचे जर अचानक निधन झाले तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या माणसांना त्याची आर्थिक झळ बसू नये या मुख्य कारणासाठी ही पॉलिसी घ्यायची असते. मध्यंतरीच्या काळात म्हणजे २००६ ते २००८ या काळात बर्‍याच युएलआयपी (युनिट लिंक इन्श्युरन्स प्लान) पॉलिसी विकल्या गेल्या. या पॉलिसी विकताना बर्‍याच सल्लागारांनी फार मोठा परतावा मिळण्याचे सांगितले होते. पण प्रत्यक्षात २००८ मध्ये जेव्हा शेअरबाजार कोसळला, तेव्हा बर्‍याच जणांना नुकसान झाले किंवा अपेक्षित परतावा मिळाला नाही आणि पदरी पडली फक्त निराशा.
पेपरमध्ये बरेचदा जाहिराती येतात. शेअर बाजार किंवा फॉरेक्समध्ये पैसे गुंतवा व हमखास अमुक अमुक टक्के महिन्याला कमवा… हे काही खरे नाही कारण म्युच्युअल फंड कंपन्यासुद्धा तुम्हाला खात्रीलायक परतावा म्हणून सांगत नाहीत, तर एखादी व्यक्ती कशी काय सांगू शकते. तेव्हा अशा जाहिरातींपासून सावध रहा!
एवढंच कशाला, काही वर्षांपूर्वी आमच्या घरी एक बाई आल्या होत्या. येताना त्यांच्यासोबत आमच्या परिसरातील काही स्त्रियाही होत्या. तर त्या आलेल्या बाई आमच्या सौ.ला एक गुंतवणूक स्कीम दाखवत होत्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सुरुवातीला तुम्ही कमीत कमी ते दहाहजार रुपये गुंतवायचे. किंबहुना याच्यापेक्षाही जास्त गुंतवणूक करू शकता. तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला काही गुण (पॉइंट्‌स) मिळतात. जसा कंपनीचा फायदा होतो तसे हे गुण वाढत जातात. माझा अभिप्राय विचारण्यासाठी माझ्या सौ.ने मला हाक मारली व मी ही स्कीम काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला या स्कीममध्ये काही घोळ वाटल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे कंपनीच्या काही कागदपत्रांची प्रत दाखवण्याची विनंती केली. त्या बाईंनी दोन दिवसांत या सर्व प्रती घेऊन येण्याचे कबूल केले. पण आजपर्यंत आम्ही त्यांची वाटच बघत आहोत.
तात्पर्य- तुम्हाला जर गुंतवणुकीबाबत योग्य माहिती मिळाली नाही किंवा संशयास्पद वाटल्यास एखादा योग्यतेच्या सल्लागाराचा सल्ला घेऊनच मग गुंतवणूक करा.