खेळाडू निडीतील सातत्याचे फळ

0
200

बंगळुरू एफसी आणि चेन्नईन एफसी यांनी इंडियन सुपर लीगच्या अंतिम फेरीत योगायोगाने प्रवेश केलेला नाही. योजनाबद्ध संघबांधणी, संघनिवड आणि पूर्वीपासून ज्यांचा खेळ माहित अशा खेळाडूंवर कायम ठेवलेला विश्वास अशा गोष्टी त्यांच्यासाठी उपयुक्त ठरल्या आहेत.

बंगळुरूने ११ खेळाडू कायम ठेवले, तर चेन्नईयीनने १० खेळाडूंना पुन्हा करारबद्ध केले. २०१५ मध्ये चेन्नईकडून खेळलेल्या मैल्सन आल्वेसचा विचार केल्यास चेन्नईचा हा आकडा सुद्धा ११ होतो. बंगळुरू एफसीने सुनील छेत्री आणि उदाता सिंग यांच्यासह निशू कुमार आणि मल्सावामझुला यांना कायम ठेवले. ड्राफ्टच्यावेली खाब्रा, लेनी रॉड्रीग्ज, लालथुआमाविया राल्टे आणि अल्विन जॉर्ज असे खेळाडू मिळविण्यावर त्यांचा भर होता. परदेशी खेळाडूंच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. सेंटर-बॅक जॉन जॉन्सन आणि जुआनन यांच्या अस्तित्वाला याचे श्रेय द्यावे लागेल. बंगळुरूच्या स्थापनेपासून जॉन्सन संघात आहे, तर जुआनन २०१६ मध्ये अल्बर्ट रोका यांच्या बरोबर आला.

चेन्नईन एफसीने सुद्धा अशाच धोरणाचा अवलंब केला. जेजे लालपेखलुआ, करणजीत सिंग, अनिरुद्ध थापा, जेरी लालरीनझुला आणि बाओरिंगदाओ बोडो यांना कायम ठेवण्यात आले. धनपाल गणेश, धनचंद्र सिंग, थोई सिंग आणि पवन कुमार हे आधीच्या वर्षांत चेन्नईकडे होते. त्यांना स्थानिक खेळाडूंच्या ड्राफ्टदरम्यान निवडण्यात आले. सातत्याच्या या आघाडीवर ब्राझिलचा मध्यरक्षक रॅफेल आगुस्टो याचा समावेश होता, जो २०१६ पासून संघाचा भाग राहिला आहे.