खेडेकर कुटुंबियांचा गणेशोत्सव

0
128

जपला परंपरेचा वारसा!

– शैलेश खेडेकर (सावईवेरे)

कुठेही असले तरी चतुर्थीच्या दिवशी जुन्या घरी येऊन चतुर्थी आनंदाने साजरी करतात. पाच, सात किंवा नऊ दिवसांचा गणपती असेल तर वाड्यावरचे लोक येऊन आरत्या, भजने करतात. सर्व पै पाहुण्यांना आग्रहाचे निमंत्रण दिले जाते. घरी आलेले पाहुणे हे सर्वांचे पाहुणे असतात व त्यांचे स्वागत व आदरातिथ्य सर्व कुटुंबियांतर्फे केले जाते.

अंत्रुज महालातील सावईवेरे गावात खेडे या वाड्यावर खेडेकर कुटुंबियांचे पुरातन काळातील घर आहे जेथे पूर्ण खेडेकर कुटुंबियांतर्फे एकत्रितपणे गणेश चतुर्थी दरवर्षी साजरी केली जाते. श्री दत्तात्रेयाच्या स्थानात पावन झालेल्या या गावात खरेच त्रिदेव जन्माला आले, ते म्हणजे कै. आत्मा तिळू खेडेकर, कै. कृष्णा तिळू खेडेकर, कै. तातू तिळू खेडेकर हे तीन बंधू होत. गावात कुठेही उत्सव किंवा कुठलाही कार्यक्रम असो त्यात या तिन्ही बंधूंचा सहभाग नक्कीच असायचा. त्यांनी जे काही ठरवले ते सर्व गावकर्‍यांना मान्य असायचे एवढा त्यांचा मान गावात असायचा. हे त्रिकुट म्हणजे माझे आजोबा होत. तसेच त्यांचे चुलत बंधू कै. मोर्तो खेडेकर या चौघांच्या साथीने बांधून ठेवलेल्या कुटुंबाला त्यांच्या पुढील पिढीने या कुटुंबाचा वारसा आजही चालू ठेवला आहे, हे खरेच कौतुकास्पद म्हणावे लागेल!
खेडे म्हटले की हा वाडा खेडवळ असणार याला दुमत असायचं कारण नाही. खरं म्हणजे आमच्या वडिलोपार्जित घराकडे सुद्धा येण्या-जाण्यासाठी साधन-सुविधा नव्हती व अजूनही म्हणावी तशी नाही. परंतु वाडवडिलांपासून या वाड्यावर घुमट आरत्या, भजन व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग व नावलौकिक असायचे व अजूनही आहे.
चतुर्थीच्या तयारीला खरी सुरुवात गोकुळ अष्टमीपासून होते. मला आठवते… मी लहान असताना आमचे आजोबा अष्टमीपासून आम्हाला मांडीवर घेऊन आरत्या शिकवण्यास बसायचे. आरत्या सुरात म्हणणे, घुमट, शमेळ, टाळ वाजवताना ताल, लय यांची जाणीव सगळ्यांना समोरा समोर बसवून दिली जायची आणि आताही ती प्रथा तशीच चालू आहे. सांघिकपणे आरत्या केल्यास त्या उठावदार होतात, याचे ज्ञान आमच्या त्रिमूर्ती आजोबांनी दिले. आमच्या आजोबांना शिक्षण कमी असले तरी दशावतारी, विठोबाची, अनंताची व सत्यनारायण देवाच्या अवघड आरत्याही त्यांना तोंडपाठ असायच्या. आम्ही या आरत्या त्याच पारंपरिक पद्धतीने आताही म्हणतो.
चतुर्थी गोव्यात प्राचीन काळापासून पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. आमचे कुटुंबही त्याला अपवाद नाही. पूर्वजांपासून चालत आलेल्या रुढी परंपरा अजूनही तशाच चालू आहेत. पूर्वजांनी घालून दिलेल्या नियमांनुसार कामाची वाटणी हे आमचे वैशिष्टय. घरातील सर्वात वयस्कर व्यक्तीला कुटुंबप्रमुख मानून सर्व कामे त्यांच्या सल्ल्यानुसार सर्वांच्या सहमतीने ठरविली जातात. आजच्या घडीला सर्वात वयस्कर आमचे बापे म्हणजे अनंत खेडेकर जे चतुर्थीची सर्व जबाबदारी समर्थपणे सांभाळतात.
चतुर्थीच्या आदल्या दिवशी पूजेसाठी लागणारी पत्री, विविध प्रकारची फळे डोंगरावर जाऊन गोळा करतात. उदा. कांगला, माट्टा, बेकरे, घागर्‍या, कुड्याची फळे, कुंडळा तसेच कुळागारातील फळे म्हणजे सुपारी, तोरींग, मावळींग, केळी, आमाडे, निरफणस, नारळ इत्यादी. हे आणण्याची जबाबदारी व माटोळी बांधण्याची जबाबदारी सगळ्यांना वाटून दिलेली आहे. आंब्याच्या पानापासून सुरेख तोरण बनवण्याचे काम कै. गिरी खेडेकर नियमितपणे करायचे. त्यांच्यानंतर आता त्यांचे बंधु पांडुरंग हे करतात. लहान मुलांची किलबील आणि त्यातच युवा वर्ग सजावटीची म्हणजे लाकडाचे मखर रंगवायला, पताका लावण्यास व इतर सजावट करण्यात मग्न असतात. विष्णुदास, स्वप्निल, श्रीकांत, परेश, निखिल, प्रज्योत, प्रसाद, सतिश, श्याम, राजु, नितीन, संदीप, संदेश, अपर्णा, अंजली, राहूल यांचा मोलाचा वाटा सजावट करण्यासाठी असतो. आमची माटोळी सर्वसामान्यांसारखी नसते. साधारण सहा मीटर लांब व तीन मीटर रुंद इतकी व्याप्ती असलेली माटोळी सुरेख पद्धतीने बांधली जाते. एकमेकांची थटा मस्करी, एकमेकांची सुख-दुःख, विनोद, गुज गोष्टी चालू असतानाच घरच्या गृहिणी हळदीच्या पानात बनवलेल्या पातोळ्या करतात. गरम गरम पातोळ्या खाण्याची मज्जा काही औरच! गप्पा गोष्टी करत रात्रभर गणरायाच्या स्वागताची तयारी चालू असते.
चतुर्थीच्या दिवशी लहान मुलांना घेऊन वयस्कर मंडळी अनंत खेडेकर, मंगेश, नागेश, पांडुरंग, रामदास काका व इतर सर्वजण गणेश शाळेत जाऊन गणेशमूर्ती घरी आणतात. गणेशमूर्ती घरात घेण्यापूर्वी त्याची ओवाळणी करतात व फटाक्यांच्या गडगडाटात गणेशमूर्ती घरात आणून चौरंगावर मखरात बसवली जाते. गणेशमूर्तीची विधीवत स्थापना करुन पूजा केली जाते. ही पूजा ब्राह्मणाशिवाय केली जाते. आमच्या पूर्वजांपासून चालत आलेल्या नियमाप्रमाणे पूजा अर्चा केली जाते. घरातील सर्व मंडळी गंध-फूल घालून नमस्कार करतात.
पंचमी दिवशी केळीच्या गोब्याची पूजा बांधली जाते. सफेद रंगाच्या गोब्याचे सुरेख मखर तयार करुन त्यावर रंगीत पताका चिकटविल्या जातात. हे मखर इतके आकर्षक असते की पहातच रहावे असे वाटते. त्यानंतर आरत्या व महाप्रसाद होतो. संध्याकाळी फुगड्या व भजनाचा कार्यक्रम होतो. फुगड्या खेळण्यात महिलांबरोबर पुरुष मंडळी व भजनामध्ये महिला भाग घेतात हे आणखी एक वैशिष्ट्य. त्याच रात्री सगळी मंडळी जमल्यावर गणपती किती दिवस ठेवायचा ते ठरते व त्याप्रमाणे कामाची आखणी केली जाते.
पिढ्यानपिढ्या चालत आलेला गणेशचतुर्थीचा उत्सव आमच्या कुटुंबाला एकत्रित ठेवण्यात यशस्वी झालेला आहे. नोकरी-धंदा, व्यवसाय या निमित्ताने आमचे खेडेकर कुटुंबीय पूर्ण गोव्यात विखुरलेले आहेत. परंतु अजूनपर्यंत कोणीही आपल्या राहत्या घरात गणेशाची स्थापना करुन पूजा करत नाही. कुठेही असले तरी चतुर्थीच्या दिवशी जुन्या घरी येऊन चतुर्थी आनंदाने साजरी करतात. पाच, सात किंवा नऊ दिवसांचा गणपती असेल तर वाड्यावरचे लोक येऊन आरत्या, भजने करतात. सर्व पै पाहुण्यांना आग्रहाचे निमंत्रण दिले जाते. घरी आलेले पाहुणे हे सर्वांचे पाहुणे असतात व त्यांचे स्वागत व आदरातिथ्य सर्व कुटुंबियांतर्फे केले जाते.
चतुर्थीमुळे आमची संस्कृती, रुढी परंपरा राखल्या जाऊन त्या आमच्या कुटुंबाला एकत्रित ठेवतात. यापुढेही आमच्या कुटुंबाला असेच एकत्रित ठेवून गणपती बाप्पाने आपली सेवा करुन घ्यावी, ही गणरायाकडे प्रार्थना.