खाल्लेले पचत नाही का?

0
1104
  •  डॉ. मनाली म. पवार
    (सांतइनेज, पणजी)

सामान्यतः घेतलेल्या आहाराचे सम्यक् पचन एका दिवसांत होते. परंतु आहार अतिमात्रेत घेतला असेल किंवा अवेळी, असात्म्य आहार घेतला तर पचनास अधिक कालावधी लागतो. २४ तासांपेक्षा अधिक काळाने पचते. त्यास दिनपाकी अजीर्ण म्हणतात. अशा अजीर्णामध्ये काही काही औषधोपचार न होता फक्त लंघन करावे किंवा उपाशी रहावे.

खा-खा खातो, पी-पी पीतो! घरी असल्यावर खातो, बाहेर गेलो तरी खातो ना? कधी विचार केला का आपण? कधीतरी खरीखुरी कडकडून भूक लागल्यावर जेवून बघा. खरंच, मस्त मज्जा येते व मन-शरीर तृप्त होते. आपण कधी खाल्लेले पचायला वेळच देत नाही. सारखे वरच्यावर हे ना ते.. खाऊन पोटाचा पेटारा नुसता भरत असतो. आहारविधीचे सगळे नियम धाब्यावर! स्वतःला आवडलं म्हणून आज जास्त खाल्लं, काल इतरांच्या आग्रहाखातर खाल्लं तर कधी अगदी ‘टेम्प्टिंग’ वाटलं म्हणून खाल्लं… अशी एक ना अनेक कारणे आणि मग यातून जन्माला येतो अजीर्णाचा त्रास.
‘न जीर्यती सुखेनान्नं विकारान् कुरुतेऽपि च|
तदजीर्णमिति प्राहुस्तन्मूला विविधा रुजः ॥
घेतलेल्या आहाराचे सम्यक परिणमन न होता तो अपक्वावस्थेतच राहणे म्हणजे अजीर्ण होय. अग्निमांद्यजनित हे अजीर्ण विविध प्रकारच्या रोगांचे कारण होऊ शकते.

अजीर्णाची कारणे ः-
– आहारविधी नियमांचे कोणतेही पालन न करता सतत खात राहणे हे अजीर्णाचे मूलभूत कारण आहे.
– अति प्रमाणात पाणी पिणे. जेवून झाल्यावर भरपूर पाणी पिणे.
– वेगविधारण. मल-मूत्रादी आलेल्या वेगांचे धारण करून ठेवणे. भूक लागली असता न जेवणे किंवा भूक न लागताच भरपूर जेवणे.
– दिवास्वाप; दुपारी जेवल्यावर लगेच झोपणे व रात्री जागरण करणे.
– अतिप्रमाणात पचायला जड असे थंड, तेलकट, तळलेले, मसालेदार, चटपटीत अशा आहाराचे नित्य सेवन करणे.
– चिंता, शोक, भय, क्रोध, दुःख व ईर्ष्या आदी मानसिक कारणांनीही अजीर्णाची उत्पत्ती होऊ शकते.
– काही वेळा प्रकूपित झालेल्या पित्ताचा द्रव गुण वाढतो व हे प्रकूपित झालेले पित्त व कफाने अवरोध होऊन अन्न कोष्ठाच्या काही भागातच पडून राहते. या अन्नाचा द्रवरूप पित्ताशी जेवढा संपर्क यायला पाहिजे तितका येत नाही. वाढलेले पित्त द्रवरूप असले तरी त्यात उष्ण, तीक्ष्ण हे गुण अल्प प्रमाणात का होईना पण असतातच. त्यामुळे या गुणांनी भूक लागल्यासारखी वाटते. ही भूक खरी नव्हे. अशा वेळी आहार घेतला तर त्यामुळे साहजिकच अजीर्णाचीच उत्पत्ती होत असते. म्हणून रुग्णांना अजीर्णामध्ये लंघन किंवा हलका आहार घेण्यास सांगितले तरी ते आपल्या नेहमीचाच आहार घेतात. कारण त्यांना ती खरी भूक लागल्यासारखी वाटते. त्यामुळे त्यांना औषधांनी बरे वाटण्याऐवजी अजीर्णाचा त्रास वाढतो.

अजीर्ण झाल्यावर बरेच जण घरच्या घरीच काही ना काही उपाय करत बसतात. काही इनोचे पाकीट फोडून पाण्यात मिसळून पितात व हे इनो वरचेवर सेवन करणारे बरेच आहेत. काही जेल्युसिलसारखी अँटासीडची औषधे घेतात. पण असे हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे हानिकारक होऊ शकते. कारण बर्‍याच मोठ्या आजारांची सुरुवात अजीर्णातून होत असते. तसेच काही अजीर्णामध्ये मलावष्टंभ असते तर काहीमध्ये द्रव-मलप्रवृत्ती असते. तसेच कफ-पित्तादी दोषांच्या दूषितपणामुळे अजीर्ण हे वेगवेगळ्या प्रकारचेही असू शकते. म्हणून अजीर्णाला सामान्य आजार मानून घरच्या घरी औषधे घेत बसू नये.

अजीर्णाची सामान्य लक्षणे ः-
– भूक न लागणे
– तोंडास चव नसणे
– पोट जड वाटणे, पोटात वारा भरल्यासारखे, फुगल्यासारखे वाटणे
– कधी पातळ तर कधी घट्ट शौचास होणे
– मळमळणे किंवा उलटी होणे
– पोटात दुखणे…. ही अजीर्णाची प्रमुख लक्षणे आहेत.
त्याचबरोबर अंग दुखणे, अंग जड होणे, डोकेदुखी, भरपूर जांभया येणे, ग्लानि, पाठीत भरल्यासारखे वाटणे… अशा प्रकारची सार्वदेहिक लक्षणेही अजीर्णात उत्पन्न होतात.
– कफ, पित्त आणि वायू यांच्या प्रकोपामुळे क्रमशः आमाजीर्ण, विदग्धाजीर्ण व विष्टब्धाजीर्ण यांची उत्पत्ती होते. तसेच रसशेषाजीर्ण, दिनपाकी अजीर्ण व प्राकृत अजीर्ण असेही काही प्रकार आयुर्वेद शास्त्रात सांगितले आहे. म्हणजेच सगळ्याच प्रकारच्या अजीर्णामध्ये ‘इनो’ चालेल का?

आमाजीर्ण ः-
आमाजीर्ण हा कफदुष्टीमुळे उत्पन्न होतो. यामध्ये क्लेदक कफ वाढतो व कफातील जलीय अंशामुळे अग्नीची तीक्ष्णता कमी होते; पर्यायाने आमाशयातील पाचक पित्ताची मात्रा कमी होते. त्यामुळे अग्निमांद्य होऊन अजीर्ण होते.
– आमाजीर्ण झाले असल्यास पोट जड वाटते.
– घेतलेला आहार वर आल्यासारखा वाटतो.
– रुग्णास अम्लरहित किंवा ज्या प्रकारचे अन्न घेतलेले आहे त्याच रस-गंध असलेल्या ढेकरा अतिप्रमाणात येतात.
– त्वचा व मल यांना स्निग्धता येते.

विष्टब्धाजीर्ण ः-
प्रकूपित झालेल्या वायूमुळे सर्व पाचक स्रावांची उत्पत्ती व उदीरण योग्य प्रकारे होत नाही व अजीर्ण उत्पन्न होते व यालाच विष्टब्धाजीर्ण असे म्हणतात.
– यामध्ये वायू व मल यांचा अवाष्टंभ होतो. वायूजनित अजीर्ण झाल्यास शौचाला घट्ट होते.
– आध्मान फार मोठ्या प्रमाणात असते. पोटात गुडगुडणे, अंग दुखणे, डोके दुखणे, कंबर-पाठ दुखणे यांसारखी लक्षणेही आढळतात.

विदग्धाजीर्ण ः-
– घशाशी आंबट, तिखट, कडवट रस येणे
– पोटात, छातीत जळजळणे
– डोळ्यांचा दाह होणे
– भरपूर घाम येणे
– सारखी तहान लागणे…. यांसारखी लक्षणे दिसतात.
याच विदग्धाजीर्णाचे रूपांतर पुढे ऍसिडिटीमध्ये होते.

रसशेषाजीर्ण ः-
– घेतलेल्या आहाराच्या बहुतांश भागाचे पचून पूर्ण झाल्यानंतरही आहारद्रव्यांचा काही भाग महास्रोतसांमध्ये अपाचित राहणे. यालाच रसशेषजीर्ण म्हणतात. पण सगळ्याच प्रकारच्या अजीर्णात अपाचिक असा आहार अंश राहतोच. पण यामध्ये आंबट- करपट ढेकर नसतात; यात ढेकर शुद्ध असतात. फक्त छातीत जड भार ठेवल्यासारखे वाटते व काहीही खाण्याची इच्छा नसते.

दिनपाकी अजीर्ण ः-
– सामान्यतः घेतलेल्या आहाराचे सम्यक् पचन एका दिवसांत होते. परंतु आहार अतिमात्रेत घेतला असेल किंवा अवेळी, असात्म्य आहार घेतला तर पचनास अधिक कालावधी लागतो. २४ तासांपेक्षा अधिक काळाने पचते. त्यास दिनपाकी अजीर्ण म्हणतात. अशा अजीर्णामध्ये काही काही औषधोपचार न होता फक्त लंघन करावे किंवा उपाशी रहावे.

प्राकृत अजीर्ण ः-
आहार घेतल्यानंतर ठरावीक काळात अन्नाचा परिपाक होतच असतो. परंतु मधल्या काळात आमाशयात अन्न हे अपरिपक्व अवस्थेत असते. त्याला प्राकृत अजीर्ण म्हणतात. या काळात तसेच आहार सेवन केल्यास अजीर्णाचा त्रास होतो.

अजीर्णामधील उपचार ः-
आमाजीर्णामध्ये लंघन, विष्टब्धाजीर्णासाठी स्वेदनोपक्रम, विदग्घाजीर्णासाठी वमन करावे तर रसशेषजीर्णासाठी उपाशीपोटी झोपावे.
अजीर्णासाठी करावयाचे उपचार हे जोपर्यंत अन्नपचन योग्य तर्‍हेने होऊन अग्नी पूर्वस्थितीत येत नाही किंवा शरीरबल पूर्ववत प्राप्त होत नाही तोपर्यंत चालू ठेवावे.
औषधी द्रव्यांमध्ये त्रिकटू, पंचकोलासव, हिंग्वाष्टक चूर्ण, शंखवटी, आमपाचक वटी, भास्कर लवण चूर्ण इ. औषधे उपयुक्त ठरतात.

पथ्यापथ्य ः-
सुरवातीला लंघन, नंतर जसजसा अग्नी वर्धमान होईल त्या प्रमाणात विविध प्रकारचे यूष, लिंबू सरबत, पेय, फळरस आणि द्रवाहार द्यावा.