‘खाली डोकं, वर पाय!’

0
169
  • प्रमोद ग. गणपुले (भटवाडी- कोरगाव)

हातामध्ये पेन, पेन्सील नीट पकडतां यावी यासाठी हाताची बोटं, त्यांचे स्नायू, त्यांच्या पेशी यांची पुरेशी वाढ व्हावी लागते. त्यासाठी किमान पाच वर्षे लागतात. म्हणून वयाची पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलांच्या हातांत पेन, पेन्सिल देऊ नये, असा जागतिक सिद्धांत आहे.

नंदूची आई शाळेतल्या बाईंशी मोठमोठ्याने भांडत होती. ‘‘काय हो बाई, नंदूला शाळेत पाठवून सहा महिने झाले, पण अजून त्याला एकही अक्षर काढता येत नाही. त्याची वही अजूनही कोरीच आहे. तुम्ही त्याला काहीच शिकवित नाही’’?
नंदू आता तीन वर्षांचा आहे. तो अडीच वर्षांचा झाल्यावर त्याच्या आई-बाबांनी त्याला शाळेत के.जी क्लासमध्ये पाठवला. खरं म्हणजे तो दोन-अडीच तास इतर मुलांबरोबर बसतो, आईला सोडून एवढा वेळ राहतो, मुलांबरोबर खेळतो हीच केवढीतरी मोठी गोष्ट आहे. पण नंदूच्या आईला हे कळत नाही. शिक्षण म्हणजे लेखन-वाचन असा पक्का समज तिने करून घेतला आहे. सहा महिने शाळेत जाऊनही एकही अक्षर काढतां येत नसेल तर त्या शाळेत काही अर्थ नाही असंच तिला वाटतं. नंदूची आईच काय, के.जीत मुलांना पाठवणार्‍या सार्‍याच आयांना असं वाटतं.

आपणही सहज बोलतांना लेखन- वाचन असाच शब्द वापरतो. म्हणजे लेखन आधी, वाचन नंतर असा त्याचा अर्थ होतो. परंतु हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. कोणतंही मूल आधी वाचायला लागतं आणि लिहायला नंतर सुरू करतं. त्यामुळे आपणही वाचन- लेखन असाच शब्दप्रयोग वापरला पाहिजे.

वास्तविक वाचन- लेखनाच्या आधी बरंच काही करावं लागतं. शिक्षण घेण्याच्यासुद्धा पायर्‍या ठरलेल्या आहेत. त्या क्रमानेच चढले पाहिजे. आधी पहिली, मग दुसरी, मग तिसरी आणि मग चौथी. आपण पहिल्या पायरीवरून एकदम चौथ्या पायरीवर पाऊल टाकलं तर तोल जाऊन खाली पडू. तरीसुद्धा सर्वांनाच लवकर वर चढायची घाई आहे. त्यामुळं ‘खाली डोकं, वर पाय’ अशी आपली शिक्षण व्यवस्था बनली आहे.
शिक्षण प्रक्रियेचा संबंध मुलाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढीशी निगडित आहे. कोणत्या वयाला काय करायचं ते ठरलेलं आहे. ते त्याच वेळी केलं पाहिजे. त्याच्या आधी करून चालणार नाही.
प्रत्यक्ष वाचन- लेखनापूर्वी दोन महत्त्वाच्या पायर्‍या आहेत. सोबतच्या आकृतीवरून हे चांगलं लक्षांत येईल.

आकृती….
श्रवण(२ वर्षे)- संभाषण (२ वर्षे)- वाचन(१ वर्षं)- लेखन…

शिशु शिक्षणाच्या पायर्‍या

वयाची पहिली दोन वर्षे पूर्ण होईपर्यंत मूल विविध आवाज ऐकत असते. त्याच्या पंच ज्ञानेंद्रियांपैकी श्रवणेंद्रिय म्हणजे कान सर्वप्रथम काम करू लागतात. गर्भाशयात साधारण चार महिन्यांचा गर्भ झाला की त्याला आवाजाचा बोध होतो. त्यालाही नवीन-नवीन आवाज ऐकायला आवडतात. तेच तेच आवाज ऐकून त्यालाही कंटाळा येतो. म्हणून मूल गर्भाशयांत आल्यापासून त्याच्या कानावर विविध आवाज पडतील अशी व्यवस्था केली पाहिजे. तालासुरांतली लयबद्ध गाणी, भक्तिरसप्रधान भजनं, विविध प्रकारची सुस्वर वाद्ये, त्यांचे आवाज कानावर पडतील अशी व्यवस्था केली पाहिजे. त्यामुळेच त्याच्या श्रवणशक्तीचा विकास होतो.

मुलाच्या जन्मापासून वयाची दोन वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याच्या कानावर विविध आणि अधिकाधिक शब्द पडतील असंही केलं पाहिजे. त्यासाठी आईनं मुलाशी गप्पा मारणं, त्याला गोष्टी सांगणं, निरनिराळ्या वस्तू दाखवून त्यांच्याविषयी बोलणं… असं केलं तर त्याच्या कानावर अनेक शब्द पडतील. या वयात मुलांची ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती फार तीव्र असते. त्यामुळे पुढे पहिलीत गेल्यावर त्याने जेजे शब्द वापरायचे आहेत ते सर्व शब्द पहिल्या दोन वर्षांत त्याच्या कानावर वारंवार पडले पाहिजेत. त्याला शब्दांचा अर्थ कळला नाही तरी ते ध्वनी त्याच्या स्मरणात राहतील. या शब्दसंग्रहाला विषयाचं कोणतंही बंधन नाही. इतिहास, गणित, भूगोल, विज्ञान अशा सर्व विषयांशी संबंधित शब्द त्याच्या कानावर पडले तर त्याचा शब्दसंग्रह समृद्ध होईल.
केवळ श्रवणामुळे जगातलं सर्व ज्ञान मिळवता येतं. शंभर-दीडशे वर्षांपुर्वीचे आपले अनेक पूर्वज असे होते की त्यांना लिहिता- वाचता येत नव्हतं. तरीसुद्धा ते विद्वान, ज्ञानी होतेच ना. धर्म ग्रथांतील तत्त्वज्ञान, व्यवहारज्ञान त्यांना चांगलंच अवगत होतं. बालपणापासून कथा, कीर्तनं, प्रवचन, थोरा मोठ्यांचे उपदेश यांच्या केवळ श्रवणाने ते ज्ञानसंपन्न झाले होते. भक्तीमार्गामध्येही श्रवण भक्तीच सर्वश्रेष्ठ मानली आहे.

साधारणपणे पहिल्या दोन वर्षानंतर मूल चांगलं बोलायला लागतं. पूर्वी ऐकलेले सर्व शब्द ते उच्चारू शकतं. मुलांना एकदा बोलायला यायला लागलं की ती सारखी बोलतच राहतात. त्यांच्या बोलण्याची ‘किती बडबडतोस?’ अशी अवहेलना न करता त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याला अधिकाधिक बोलतं केलं पाहिजे. त्याच उच्चार नीट होतील हेही पाहिलं पाहिजे. त्याच्याशी पूर्ण वाक्यात बोललो, स्त्रीलिंग- पुल्लिंग, एकवचन, अनेक वचन, भूतकाळ- वर्तमानकाळ- भविष्यकाळ या गोष्टीतला फरक त्याच्या लक्षात येईल अशा पद्धतीने आपण त्याच्याशी बोललो तर मुलसुद्धा व्याकरणदृष्ट्या योग्य संभाषण करू शकतं. मूल चार वर्षांचं होईपर्यंत त्याला तोंडीभाषा व्याकरणासह अवगत झाली पाहिजे. याचा अर्थ त्याला व्याकरणाचे नियम सांगितले पाहिजेत असा नव्हे. पुढे पहिली- दुसरीत गेल्यावर त्याला व्याकरणाचे नियम आपोआप कळतील.
वयाची चार वर्षे पूर्ण झाल्यावर पुढे एक वर्ष वाचन झालं पाहिजे. मोठ्या आकारातली अक्षरं, शब्द, दुकानांचे बोर्ड, वर्तमान पत्रांतील ठळक हेडलाईन्स, मोठ्या टाईपमधली पुस्तकं यांचं भरपूर वाचन झालं तरच पुढे लिहिणं सोपं. होतं.

श्रवणासाठी फक्त कान पुरेसे असतात. त्यांचा विकासही लवकर होतो. संभाषणासाठी कानाबरोबर जीभ- कंठ यांचा वापर करावा लागतो. कानाने ऐकलेल्या शद्बांचा वापर संभाषणांत होतो. वाचनासाठी कान- जीभ- कंठ आणि डोळे यांचा एकत्रित वापर करावा लागतो. लेखनासाठी मात्र कान, जीभ- कंठ, डोळे आणि हात एवढ्या अवयवांनी एकमेकांच्या समन्वयाने (को-ऑर्डिनेशन) काम करावे लागते. हा समन्वय निर्माण होण्यासाठी वयाची पाच वर्षे पूर्ण व्हावी लागतात. तोपर्यंत आई-बाबांनी थांबले पाहिजे. मुले स्वाभाविकपणे, स्वयंप्रेरणेने या सर्व गोष्टी त्या-त्या वयामध्ये आपोआप करतात. तेव्हाच त्यांना आनंद मिळतो.

हातामध्ये पेन, पेन्सील नीट पकडतां यावी यासाठी हाताची बोटं, त्यांचे स्नायू, त्यांच्या पेशी यांची पुरेशी वाढ व्हावी लागते. त्यासाठी किमान पाच वर्षे लागतात. म्हणून वयाची पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलांच्या हातांत पेन, पेन्सिल देऊ नये, असा जागतिक सिद्धांत आहे. परंतु आपल्याकडे मात्र सारंच उलट आहे. ‘खाली डोकं- वर पाय’ दुसरं काय?
नंदूच्या आईनं हे सगळी नीट समजून घेऊन शाळेतल्या बाईंना सहकार्य केलं पाहिजे तरच नंदूचं पुढचं शिक्षण व्यवस्थित होईल.