खारेबांध येथे अज्ञातांनी कारसह १३ दुचाक्या पेटवल्या

0
201

मडगाव शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती सध्या पुन्हा डोके वर काढू लागली असून काल रात्री खारेबांध येथे अज्ञातांनी १३ दुचाक्या व एका कारला आग लावल्याने सुमारे आठ लाख रुपयांची हानी झाली. गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, काल आमदार दिगंबर कामत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. किसन च्यारी यांच्या गॅरेजजवळ ७ दुचाक्या तर टॅक्सेरा इमारती समोर ६ दुचाक्या व एका कारला अज्ञातांनी आग लावली. तात्काळ मडगाव व अग्निशामक दलाला माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी आग विझविली. या आगीत सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी आग लागल्यामुळे कोणीतरी बळजबरीने आग लावल्याच्या संशयाने लोकांनी पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदविली आहे. काही दिवसांमागे पाजीफोंड येथे पाच दुचाक्यांना आग लावण्यात आली होती.