खाण पॅकेजला पंतप्रधानांची तत्त्वत: मान्यता : मुख्यमंत्री

0
70
पत्रकार परिषदेत माहिती देताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर.

पायाभूत सुविधांसाठी १५०० कोटी रु.चा केंद्रासमोर प्रस्ताव सादर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाण पॅकेज देण्यास तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. राज्यात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १५०० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रासमोर ठेवला असल्याचेही ते म्हणाले.राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्यामुळेच आपण हा प्रस्ताव ठेवला होता. पुढील दोन ते तीन महिन्यांत यासंबंधी केंद्राची योजना तयार होईल, असे त्यांनी सांगितले. एपीडीआरपी योजनेसही केंद्राने मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, खाण पॅकेज कशा स्वरुपाचे असेल हे आता सांगणे शक्य नाही. आपण पंतप्रधानासमोर प्रथमच मागण्या ठेवल्या आहेत. त्यांनी तत्त्वत: मान्यता दिल्याने पुढील सोपस्कारांसाठी पुन्हा बैठक घ्यावी लागेल. दरम्यान आपली दिल्ली भेट पूर्ण यशस्वी झाल्याचा दावा मुख्यमंत्री केला.
अतिरिक्त विजेसाठी प्रयत्न
डिसेंबरपर्यंत गोव्याची विजेची गरज पूर्ण करण्याची व्यवस्था केली आहे. गोव्यासाठी अतिरिक्त वीज पुरवठा मिळविण्याचा प्रयत्न चालू आहे. रामगुंडम ऐवजी कैगा प्रकल्पातून वीज वितरण केल्यास फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले. गोव्यात वीज निर्मिती प्रकल्प होत असेल तरच गोव्यासाठी कोळसा साठा मिळण्याची तरतूद आहे. परंतु गोव्यात हा प्रकल्प उभारणे शक्य नाही, असे ते म्हणाले. विजेसाठी एनटीपीसी प्रकल्पाचा गोव्यासाठी विस्तार करण्याच्या पर्यायावर एनटीपीसीकडे बोलणी सुरू केल्याचे ते म्हणाले.
दुहेरी नागरिकत्व : २ महिन्यांत तोडगा
दुहेरी नागरिकत्वाच्या प्रश्‍नावर दोन महिन्यात तोडगा काढण्याचे आश्‍वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. १९६२ च्या कायद्यानुसार गोमंतकीयांना नागरिकत्व मिळाल्याने नागरिकत्वास अन्य देशांच्या कायद्यांची बाधा होऊ नये, या मुद्यावर तोडगा निघेल, असे पर्रीकर यांनी सांगितले.