खाण अवलंबित फोरम स्थापणार

0
109

पणजी येथील खाण अवलंबितांच्या आंदोलनावेळी झालेल्या लाठीमाराला सरकार जबाबदार असून अनेक जणांविरुद्ध समन्स बजावण्यात येत आहेत. सरकारने सदर गुन्हे मागे घेऊन खाण अवलंबितांना दिलासा द्यावा अशी मागणी काल ट्रक मालकांच्या बैठकीत करण्यात आली. दयानंद नगर, धारबांदोडा येथील संजीवनी कारखान्याच्या जिमखान्यावर ही बैठक झाली. यावेळी ट्रक, बार्ज, मशीन मालक व कामगारांना एकत्रित करून फोरम स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत अखिल गोवा ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस, बार्ज मालक संघटनेचे अध्यक्ष रेमंड डिसा, धारबांदोडा ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष विनायक ऊर्फ बालाजी गावस, मशीन मालक संघटनेचे अध्यक्ष संदीप परब, वल्लभ दळवी, सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोलिसांतर्फे दरदिवशी ५-६ जणांविरुद्ध समन्स बजावण्यात येत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. सरकारने आंदोलनकर्त्यांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी आज सोमवारी सुमारे २ हजारपेक्षा अधिक खाण अवलंबित पणजी पोलीस स्थानकावर नेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मात्र, यासंबंधीचा अंतिम निर्णय आज सोमवारी सकाळीच घेण्यात येणार आहे.
नीळकंठ गावस यांनी तीन पायांवर सरकार चालत असल्याची टीका करून सरकारला खाणी सुरू झालेल्या नको असल्याचे सांगितले.