खाण अवलंबितांच्या महामोर्चाला हिंसक वळण

0
139

>> दगडफेक करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार

>> आमदार नीलेश काब्राल यांच्यासह अनेकजण जखमी

राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्यासाठी गोवा सरकारने पावले उचलावीत या मागणीसाठी काल सकाळी राज्यातील खाण अवलंबितांनी पणजी शहरात काढलेल्या महामोर्चाला हिंसक वळण लाभले. हजारोंच्या संख्येने पणजीत धडक दिलेल्या राज्यभरातील खाण अवलंबितांनी कदंब बस स्थानकाजवळील क्रांती सर्कल सभोवतालच्या रस्त्यावर ठाण मांडून रस्ता अडवल्याने पूर्णपणे चक्काजाम झाला. यामुळे पणजीतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याबरोबरच उत्तर व दक्षिण गोव्यातून पणजीत येणारी शेकडो वाहने सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत खोळंबली. नंतर दुपारी ३ वाजता रस्ता मोकळा करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावातील काहीजणांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या जोरदार लाठी हल्ल्यात आमदार नीलेश काब्राल यांच्यासह पोलीस तसेच कित्येक आंदोलक जखमी झाले. या धुमश्‍चक्रीत बसची वाट पाहत कदंब बस स्थानकावर थांबलेल्या काही प्रवाशांनाही पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात मोर्चेकर्‍यांपैकी कित्येकजण रक्तबंबाळ झाले. यावेळी लाठीमार चुकवण्यासाठी पळणार्‍यांना पोलिसांनी ३० ते ४० मीटर अंतरापर्यंत पाठलाग करून लाठ्यांनी फोडून काढले. बचावासाठी परिसरातील दुकानांत घुसलेल्यांनाही यावेळी पोलिसांनी आत घुसून बदडून काढले.

काल सकाळी ८.३० वाजल्यापासूनच खाण अवलंबितांनी पणजीतील कदंब बस स्थानकावर जमण्यास सुरुवात केली होती. प्रारंभी या मोर्चेकर्‍यांनी कदंब बसस्थानकाजवळील पार्किंगच्या जागेत जमून घोषणा दिल्या. यावेळी जमावाने खाणी लवकर सुरू करा अशा घोषणा देण्याबरोबरच सरकार विरोधी व सरकारचा निषेध करणार्‍या घोषणाही दिल्या. तद्नंतर बरोबर ११ च्या दरम्यान मोर्चेकर्‍यांनी क्रांती सर्कलजवळ मोर्चा वळवीत संपूर्ण रस्ता अडवला. त्यामुळे मडगावच्या दिशेने पणजीत येणारी वाहतूक व पर्वरीच्या दिशेने पणजीत येणारी वाहतूक खोळंबली. त्यामुळे वाहतूक पोलिसांवर मडगावच्या दिशेने येणारी वाहने बांबोळी मार्गे वळवण्याची पाळी आली. तर उत्तर गोव्यातून पणजीत येणार्‍यांना फेरीबोटीतून येण्याचा सल्ला देण्यात आला.

उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन् या ११ वाजता क्रांती सर्कलवर पोचल्या. यावेळी त्यांनी मोर्चेकर्‍यांना अडवलेला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची सूचना केली. मात्र, रस्त्यावर ठाण मांडून बसलेला जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. सुमारे ५ ते ६ हजार एवढ्या जमावाच्या तुलनेत पोलीस फौजफाटाही बराच कमी होता. ११ वाजल्यापासून पुढे २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी नीला मोहनन् या क्रांती सर्कलवर उन्हात उभ्या राहून तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत होत्या. ११.३० च्या दरम्यान त्यांनी रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यासाठी प्रयत्न करून पाहिले. यावेळी त्यांना मडगावच्या दिशेने येणारी वाहने वाहतुकीसाठी मोकळी करण्यास यश आले. पण नंतर काही वेळाने जमावाने ही वाहतूक पुन्हा अडवली.

ढवळीकरांशी चर्चेस नकार

दुपारी १ वाजता मंत्री सुदिन ढवळीकर हे मोर्चेकर्‍यांशी बोलणी करण्यासाठी आले. मात्र, मोर्चेकर्‍यांनी त्यांच्याशी चर्चा करण्यास नकार देतानाच त्यांना उद्देशून अपशब्दही काढले. ढवळीकर यांनी मोर्चेकर्‍यांना तुमचे शिष्टमंडळ माझ्याकडे पाठवा, अशी सूचना केली असता तीही धुडकावून लावण्यात आली. रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करा ही ढवळीकर यांनी केलेली सूचनाही जमावाने यावेळी मान्य केली नाही. नंतर दुपारी दोनच्या सुमारास मंत्री विजय सरदेसाई हे आले असता मोर्चेकर्‍यांनी त्यांच्याशीही चर्चा करण्यास नकार दिला. तसेच त्यांना उद्देशून अपशब्द काढले. नंतर सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई व नीला मोहनन् यांची कदंब बस स्थानक इमारतीतील वाहतूक खात्याच्या कार्यालयात चर्चेसाठी बैठक झाली. आता काही तरी तोडगा निघेल असे दिसत असतानाच दुपारी २.३० च्या दरम्यान जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी जमावावर जोरदार लाठी हल्ला केला.

दगडफेकीत वाहनांची नासधूस

खाण अवलंबितांनी केलेल्या दगडफेकीत कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या २ बसगाड्या, कदंब महामंडळाच्या ६ बसगाड्या, पोलीस मिनी बस, अग्निशामक दलाचा बंब, मामलेदार कार्यालयाची जीपगाडी आदी वाहनांचा समावेश आहे. तसेच आंदोलकांनी एका खासगी बॉलेरो जीप गाडीच्या चारही चाकातील हवा सोडली. अन्य एका मारुती व्हॅनची नासधूस करण्यात आली. क्रांती सर्कलच्या परिसरात अनेक दुचाकी वाहने अस्ताव्यस्त पडलेली होती.

बार्जमालकांचे आंदोलन फसले
बार्ज मालक संघटनेने आंदोलनाचा एक भाग म्हणून आपल्या बार्जेस ओळीने मांडवी नदीत आणून नांगरून मांडवीतील जलमार्ग अडवण्याची योजना आखली होती. मात्र, कॅप्टन ऑफ पोर्टने त्यांना एक नोटीस जारी करून तसे धाडस न करण्याची सूचना केल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले.

विमान प्रवाशांना फटका
खाण अवलंबितांच्या आंदोलनाचा विमान प्रवाशांना सुध्दा फटका बसला. पणजी, म्हापसा व आसपासच्या भागातील प्रवासी रास्ता रोको आंदोलनामुळे अडकल्याने विमानतळावर वेळेवर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे काही विमानांची विलंबाने उड्डाणे करावी लागली. काही प्रवाशांना विमाने चुकली. त्यांची पर्यायी व्यवस्था करावी लागली. शालेय विद्यार्थ्यांनाही रास्ता रोकोमुळे त्रास सहन करावे लागले.

तोडग्यासाठी गडकरी गोव्यात

राज्यातील खाण बंदी प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री तथा गोवा प्रभारी नितीन गडकरी यांचे काल सोमवारी रात्री गोव्यात आगमन झाले असून त्यांनी भाजपचे मंत्री, आमदार व पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. आज दिवसभरात ते स्थानिक लोकप्रतिनिधी, खाण अवलंबित, खाण मालक, ट्रक, बार्ज मालक व खाण उद्योग क्षेत्रातील विविध घटकांशी चर्चा करणार आहेत. राज्यातील खाण बंदीचा विषय गंभीर बनला असल्याने तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर मते जाणून घेण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांना पाचारण करण्यात आले आहे.

आमचे आंदोलन चालूच
राहणार ः नीळकंठ गावस

मोर्चेकर्‍यांपैकी कुणीही पोलिसांवर दगडफेक केली नव्हती, असा दावा नंतर पत्रकारांशी बोलताना अखिल गोवा ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस यांनी केला. आमचे आंदोलन दडपून टाकता यावे यासाठी कुणीतरी दगडफेक करणारी माणसे आणली असावीत, असा संशय गावस यांनी व्यक्त केला. शांततापूर्णरित्या आंदोलन करणार्‍या लोकांवर पोलिसांनी विनाकारण लाठीहल्ला केल्याचे सांगून आमचे आंदोलन चालूच राहील, असे श्री. गावस म्हणाले.

लाठीहल्ल्याचा आदेश दिला नव्हता : सुदिन

सरकारने आंदोलन करणार्‍या खाण अवलंबितांवर लाठीहल्ला करण्याचा आदेश दिला नाही. तर आंदोलक हिंसक बनल्याने तसेच त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केल्याने जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी लाठीहल्ला करावा लागला, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. आंदोलन करणार्‍या खाण अवलंबितांना रस्ता मोकळा करण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु, आंदोलकांनी सूचनेचे पालन केले नाही. उलट आंदोलक हिंसक बनले. पोलीस, वाहनांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

८ जणांना अटक; १३ जणांविरोधात गुन्हा

खाण अवलंबितांच्या महामोर्चाला काल संध्याकाळी तीन वाजता हिंसक वळण मिळाले. रस्ता अडवून बसलेल्या खाण अवलंबितांना रस्त्यावरून बाजूला काढण्याच्या वेळी झालेल्या झटापटीमुळे पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. दगडफेक व झटापटीत ५ पोलीस कर्मचारी व अनेक खाण अवलंबित जखमी झाले. पणजी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग रोखणे, सरकारी मालमत्तेची नासधूस केल्याप्रकरणी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून ८ जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या लाठीमारात आमदार नीलेश काब्राल सुध्दा किरकोळ जखमी झाले आहेत.
पणजी शहरात आंदोलन करणार्‍या खाण अवलंबितांना अटक केल्यानंतर कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर, सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी पणजी पोलीस स्टेशनवर धाव घेतली.

सुमारे चार तास रस्ता बंद करण्यात आल्याने वाहने मोठ्या प्रमाणात अडकून पडली होती. नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. त्यामुळे पोलिसांनी रस्त्यावरील आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला राहण्याची निर्वाणीचा इशारा दिला. आंदोलकांकडून सूचनेचे पालन केले जात नसल्याने आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी कडक भूमिका घ्यावी लागली. यावेळी झालेल्या झटापटीत ५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यात २ महिला पोलीस आणि ३ पुरुष पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दंडाधिकार्‍यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करून ८ जणांना अटक केली तर गुन्हा नोंद झालेल्या तिघा खाण अवलंबित जखमींवर गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.