खाण अवलंबितांचे पणजीत बेमुदत धरणे आंदोलन

0
124

गोवा मायनिंग पीपल फ्रंटच्या झेंड्याखाली खाण अवलंबितांनी राज्यातील खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलनाला कालपासून सुरुवात केली आहे.

खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा निघेपर्यंत धरणे धरण्यात येणार आहे, अशी माहिती फ्रंटचे निमंत्रक पुती गावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सरकारने अध्यादेश जारी करून खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा न काढल्यास पणजी येथे आझाद मैदानावर ११ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा खाण अवलंबितांनी दिला होता. खाण बंदीच्या प्रश्‍नावर ७ जूनपर्यंत तोडगा काढण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु, या काळात खाण बंदीच्या प्रश्‍नावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. केंद्र व राज्य सरकार खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याबाबत गंभीर नाही. त्यामुळे खाण बंदीच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी मागील एक महिन्यापासून विविध भागात सभा घेऊन जनजागृती करण्यात आली आहे. खाण बंदीच्या प्रश्‍नी तोडगा काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही गावकर यांनी सांगितले.

सरकारने धरणे आंदोलन मागे घेण्यासाठी फ्रंटच्या समितीशी चर्चा करावी. खाण बंदी उठविण्याबाबत ठोस आश्‍वासन दिल्यास आंदोलन मागे घेण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असे गावकर यांनी सांगितले.
या धरणे आंदोलनामध्ये राज्यातील विविध भागातील ट्रकमालक, यंत्रसामग्री मालक, बार्ज मालक, व्यावसायिक व खाण व्याप्त भागातील नागरिकांनी सहभाग घेतला आहे.