खाणी सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच

0
232

>> उसगाव सभेत खाण अवलंबितांचा इशारा

>> पणजीत ४ जूनपासून धरणे आंदोलन

राज्यातील खाणी सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असून सरकारला जागे करून अध्यादेश काढण्यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या वेळी भव्य मोर्चा व दि. ४ जून पासून पणजीत आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय तिस्क – उसगाव येथील गोवा मायनिंग पीपल्स फोरमच्या जाहीर सभेत काल घेण्यात आला. वेळप्रसंगी सर्व मतभेद विसरून सर्व आमदारांनी दिल्लीत शक्तिप्रदर्शन करण्याचा सल्ला कॉंग्रेस नेत्यांनी सभेत बोलताना दिला.

जाहीर सभेला आमदार प्रतापसिंह राणे, रवी नाईक, दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, आमदार दीपक पाऊसकर, नीळकंठ हळर्णकर, नीलेश काब्राल, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, प्रतिमा कुतिन्हो, धर्मेश सगलानी, प्रशांत नाईक, जुझे फिलीप, जितेश कामत, विनायक गावस आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजपचे नाटक : राणे
लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्याने भाजपा नेते विविध आश्‍वासने देण्यात मग्न आहेत. राज्यातील खाणी सुरू न झाल्यास त्याचा फटका भाजपाला अधिक बसणार आहे. म्हणून जाहीर सभेपूर्वी भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीत जाऊन नाटक केल्याची टीका आमदार प्रतापसिंह राणे यांनी केली.

अध्यादेश काढा : रवी
आमदार रवी नाईक यांनी खाण अवलंबितांना न्याय देण्यासाठी कॉंग्रेसचा पूर्ण पाठिंबा व्यक्त करून वेळ आल्यास सर्व आमदारांना घेराव घालण्याचे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान व मुख्यमंत्री देशाबाहेर आहेत. मात्र, सरकारला इच्छा असल्यास सरकार अध्यादेश काढून खाणी सुरू करू शकतात असे आमदार नाईक यांनी सांगितले.

आंदोलन सुरूच ठेवणार : पुती
पुती गावकर यांनी सरकारने अध्यादेश काढून खाणी सुरू करण्याची मागणी केली. सरकारवर दबाव आणण्यासाठी खाणी सुरू होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. दि. ४ जून रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन व पावसाळी अधिवेशनात विधानसभेवर भव्य मोर्चा नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपने कृती करावी : गिरीष
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी भाजपने प्रत्येक निवडणुकीत खाणी सुरू करण्याची आश्‍वासने देऊन फसवणूक केल्याचा आरोप केला. मतांचे राजकारण करणार्‍या भाजपने लोकांच्या व्यवसायाशी खेळू नये. खाणी सुरू करण्याची आश्‍वासने देण्याऐवजी ठोस कृती करून दाखविण्याचे आव्हान त्यांनी भाजपला दिले.
विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी खाणी सुरू करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष पूर्णपणे खाणग्रस्तांना पाठिंबा देत आहे. केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी कॉंग्रेससह भाजपाच्या आमदारांनी दिल्लीत जाण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पीएमओ कार्यालयाचे सहकार्याचे आश्‍वासन
पीएमओ खाण प्रश्‍नावर तोडग्यासाठी दिल्लीला गेलेल्या शिष्टमंडळाने काल परत एकदा पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांची भेट घेऊन चर्चा केली असून गडकरी आणि मिश्रा यांनी सहानुभूतीपूर्वक वरील प्रश्‍नावर लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, तोडगा निघण्यास एक-दोन महिन्यांचा अवधी लागू शकतो, असे खासदार नरेंद्र सावईकर यांनी स्पष्ट केले. पीएमओ कार्यालयातील मिश्रा यांना राज्यात बंद पडलेला खाण उद्योग लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे, अशी विनंती केली असल्याचे सावईकर म्हणाले.