खाणी सुरू करण्यास सरकारला कॉंग्रेसचा पाठिंबा

0
89

येत्या १६ मार्च रोजीपासून राज्यातील खाण व्यवसाय बंद पडू नये अशी राज्य सरकारप्रमाणेच आमचीही इच्छा आहे. आणि म्हणूनच त्यासाठी राज्य सरकार जे काही प्रयत्न करू पाहत आहे त्याला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय कॉंगे्रस पक्षाने घेतला आहे, असे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी काल सांगितले. रविवारी (काल) झालेल्या बैठकीत पक्षाच्या आमदारांचे त्याबाबत एकमत झाल्याचे कवळेकर म्हणाले.

आज सोमवारी ह्या प्रश्‍नावर केंद्रीय खाण मंत्री नरेंद्र सिंग तोमर व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यासाठी जे सर्वपक्षीय शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे त्यात विरोधी पक्ष नेता ह्या नात्याने आपला व खाणपट्ट्यातील आमदार ह्या नात्याने प्रतापसिंह राणे अशा दोघा कॉंग्रेस आमदारांचा समावेश होता. मात्र, राणे हे सर्दीमुळे त्रस्त असल्याने त्यांनीमाघार घेतली. आता त्यांच्या जागी कॉंग्रेसचे प्रतिनिधी म्हणून नीळकंठ हळर्णकर यांचा समावेश करण्यात आला असल्याचे कवळेकर यांनी सांगितले. राज्यातील खाण अवलंबितांविषयी कॉंग्रेस पक्षाला पूर्ण सहानुभूती आहे. येत्या १५ मार्चनंतर जर राज्यातील खाण व्यवसाय बंद पडला तर येथील हजारो खाण अवलंबितांची स्थिती बिकट व दयनीय अशी होणार असून कॉंग्रेस पक्षाला त्याची चिंता आहे. कॉंग्रेस पक्षाने जेव्हा जेव्हा राज्यातील खाण व्यवसाय बंद पडला अथवा धोक्यात आला तेव्हा तेव्हा खाण अवलंबितांना आपला पाठिंबा दिलेला असून पक्ष पूर्ण शक्तीनिशी त्यांच्या मागे राहिलेला आहे. आता राज्यातील संपूर्ण खाण व्यवसाय बंद होण्याचा धोका निर्माण झालेला असल्याने कॉंग्रेस पक्षाने यावेळीही पूर्णपणे खाण अवलंबितांच्या मागे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे कवळेकर म्हणाले. काल झालेल्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीतही त्याबाबत एकमत झाल्याचे कवळेकर म्हणाले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला सर्वाधिक १७ जागा व भाजपला केवळ १३ जागा मिळालेल्या असताना राज्यात भाजपचे सत्तेवर आणण्यासाठी सिंहाचा वाटा उचललेल्या नितीन गडकरी यांच्याशी सर्वपक्षीय शिष्टमंडळ खाण प्रश्‍नी चर्चा करणार असल्याने कॉंग्रेस पक्षाने या शिष्टमंडळाचा भाग बनू नये, असे पक्षातील एका-दोघा आमदारांचे म्हणणे होते. पण ते केवळ त्यांचे वैयक्तिक मत होते. पक्षाचे नव्हे असे कवळेकर म्हणाले.