खाणींचा लिलाव धोकादायक

0
187

>> कॉंग्रेस ः स्थानिक उद्योजकांकडेच व्यवसाय हवा

गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख व नगर नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्या पाठोपाठ कॉंग्रेस पक्षानेही राज्यातील खाणींचा लिलाव करणे धोक्याचे ठरणार असल्याचे म्हटले असून हा लिलाव केला जाऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.
प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांना काल यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, राज्यातील खाणींचा लिलाव करण्यात आला तर देशभरातील मोठे खाण माफिया राज्यात येतील. एकदा ते राज्यात आले की त्यांना आवरता येणार नाही. त्यामुळे खाण व्यवसाय धोक्याचा ठरेल.

गोव्यातील खाण उद्योजकांच्या हातातच राज्यातील खाणी राहणे हे सर्वांच्याच हिताचे ठरणार असल्याचे नाईक यानी या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. राज्य सरकारने राज्यातील खाण उद्योगात शिस्त आणण्यासाठी अजूनही कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे नाईक म्हणाले.

नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यानी यापूर्वीच राज्यातील खाणींचा लिलाव केला जाऊ नये असे मत व्यक्त केलेले आहे. राज्यातील खाणींचा लिलाव करण्यात आला तर देशभरातील खाण माफिया गोव्यातील खाण व्यवसायात शिरकाव करतील व नंतर त्यांना आटोक्यात आणणे अथवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कुणालाही शक्य होणार असल्याचे सरदेसाई यानी स्पष्ट केले आहे.