खाणप्रश्‍न सोडविण्याचे नरेंद्र मोदींचे आश्‍वासन

0
228

>> पर्रीकरांनी खासदारांसह केली दिल्लीत चर्चा

खाण प्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी नवी दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी मोदी यांनी गोव्यातील खाण उद्योग लवकर सुरू व्हावा यासाठी सर्व ते प्रयत्न करण्याचे आश्‍वासन पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला दिले.
खाण उद्योग हा गोव्याचा कणा असल्याचे पर्रीकर यांनी चर्चेवेळी मोदी यांच्या लक्षात आणून दिले. राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू व्हावा यासाठी हल्लीच झालेल्या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने संमत केलेल्या ठरावाची प्रत पर्रीकर यांनी यावेळी मोदी यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी पर्रीकर व मोदी यांच्यात वरील प्रश्‍नी सविस्तर चर्चा झाली. या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी स्थापन केलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या गट समितीची भेट घेण्याची सूचना मोदी यांनी केली.

केंद्रीय गटसमितीशी चर्चा
मोदी यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात पर्रीकर यांच्यासोबत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर व राज्यसभा खासदार विनय तेंडूलकर उपस्थित होते. शिष्टमंडळाने नंतर खाण प्रश्‍नी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या गटाची भेट घेतली. या गटात भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, खाणमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचा समावेश आहे. शिष्टमंडळाने प्रधानमंत्र्याबरोबरच्या भेटीनंतर वरील मंत्र्यांच्या गटाशी चर्चा केली.
यावेळी सदर मंत्र्यांचे सचिव, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमिताब कांत ही मंडळीही हजर होती. अत्यंत सकारात्मक अशा वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत बंद पडलेला गोव्यातील खाण उद्योग सुरू करण्यासाठी कायदेशीररीत्या तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.