खाणप्रश्‍नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला रवाना

0
123

>> आज करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा

येत्या १५ मार्च रोजी राज्यातील खाण व्यवसाय बंद होऊ घातल्याच्या पार्श्‍वभूमीवर नवी दिल्लीतील नेत्यांना साकडे घालण्यासाठी काल राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ नवी दिल्लीला रवाना झाले. हे शिष्टमंडळ आज सोमवारी सकाळी १० वाजता भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन खाण प्रश्‍नावर त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

ह्या शिष्टमंडळातील सर्व सदस्य रविवारीच (काल) नवी दिल्लीकडे प्रयाण करणार असल्याचे सभापती प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. हे शिष्टमंडळ सोमवारी सकाळी १० वाजता भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन खाण प्रश्‍नी त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. खाणमंत्री नरेंद्र सिंग तोमर हे नवी दिल्लीत नाहीत. त्यामुळे शिष्टमंडळ त्यांची भेट घेऊ शकेल की नाही याबाबत प्रश्‍न चिन्ह असल्याचे सभापती म्हणाले.

रविवारी रात्रौ १० वाजता आपली फ्लाईट असून आपण त्या फ्लाईटने जाणार आहे. वेगवेगळे सदस्य वेगवेगळ्या विमानाने जात असले तरी सगळे सदस्य रविवारीच (काल) दिल्लीकडे प्रयाण करणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेस पक्षानेही ह्या शिष्टमंडळाला पाठिंबा दिलेला असून विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांनी होकार कळवला असल्याचे सभापती म्हणाले.

ह्या शिष्टमंडळात विविध पक्षांचे प्रमुख व खाणपट्ट्यातील आमदारांचा समावेश आहे. कॉंग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते ह्या नात्याने बाबू कवळेकर, मगो नेते या नात्याने मंत्री सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख या नात्याने मंत्री विजय सरदेसाई, राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्षाचे नेते या नात्याने चर्चिल आलेमांव आदी नेत्यांबरोबरच खाण परिसरातील प्रतिनिधी या नात्याने सभापती प्रमोद सावंत, आमदार नीलेश काब्राल, आमदार प्रसाद गावकर, दीपक पाऊसकर, मंत्री विश्‍वजित राणे, आमदार नीळकंठ हळर्णकर, आमदार राजेश पाटणेकर, दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, खाण संचालक प्रसन्न आचार्य व मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव पी. कृष्णमूर्ती यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे.

या शिष्टमंडळात ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचाही समावेश होता. मात्र, सर्दीमुळे त्रस्त असल्याने त्यांनी माघार घेतली. त्यामुळे त्यांच्या जागी कॉंगे्रसचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांचा समावेश करण्यात आला आहे.
आज नितीन गडकरी यांच्याबरोबर होणार असलेल्या बैठकीत हे शिष्टमंडळ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार येत्या १६ मार्च रोजीपासून राज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्यास गोव्यावर ओढवणार असलेल्या आर्थिक संकटाविषयीची माहिती गडकरी यांना देणार असून ह्या समस्येवर केंद्र सरकारच्यावतीने तोडगा काढण्याची सूचना त्यांना करणार आहे. ह्यावेळी शिष्टमंडळ राज्यातील खाण व्यवसायाविषयीची इत्यंभूत माहिती गडकरी यांना देणार आहे.