खाणप्रश्‍नी सरकारमध्ये एकमत नाही

0
67

>> कॉंग्रेसचे प्रवक्ते यतीश नाईक यांचा आरोप

खाण प्रश्‍नी सरकारमध्ये एकमत नाही असा आरोप काल कॉंग्रेस प्रवक्ते यतीश नाईक पत्रकार परिषदेतून बोलताना केला. अशा परिस्थितीत सरकार तोडगा कसा काय काढेल, असा प्रश्‍न त्यांनी केला. सरकारातील घटक पक्षाचे एक नेते असलेले मंत्री विजय सरदेसाई हे गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढण्याची गरज असल्याचे म्हणतात. त्यासाठी गोवा सरकार केंद्राला साकडे घालणार असल्याचे सांगतात.

पक्षाचे नेते असलेले सुदिन ढवळीकर हे सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचे वक्तव्य करतात. आणि भाजपचे नेते नीलेश काब्राल हे सरकार सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचे सांगतात. तिघांनीही वेगवेगळी मते व्यक्त केलेली आहेत असे सांगून सरकारमध्ये वरीलप्रश्‍नी एकमत नाही हे यावरून दिसून येत असल्याचे नाईक म्हणाले. राज्यातील प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मंत्रिमंडळ सल्लागार समिती
म्हणजे केवळ फार्स
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमेरिकेला जाण्यापूर्वी स्थापन केलेली मंत्रिमंडळ सल्लागार समिती म्हणजे केवळ फार्स आहे, असा आरोपही यावेळी नाईक यांनी केला. अशी समिती स्थापन करण्याची तरतूद घटनेत नसल्याचे ते म्हणाले. खंडित वीज व पाणीपुरवठा ही एक मोठी समस्या सध्या राज्याला भेडसावत असल्याचे ते म्हणाले. एका बिल्डरच्या सोयीसाठी पणजी व आसपासच्या गावांतील लोकांना २४ तास अंधारात ठेवण्याची किमयाही वीज खात्याने केली होती, याची त्यांनी आठवण करून दिली.

शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी अजून राज्यात पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्याचे ते म्हणाले. महिलांवरील अत्याचारांची शृंखला चालूच असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.