खाणप्रश्‍नी पूर्ण अभ्यासानंतरच पंतप्रधानांना भेटणार ः मुख्यमंत्री

0
113

>> तूर्त खाणींशी संबंधित सर्व घटकांशी चाललीय चर्चा

खाणींशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करण्याचे काम सध्या चालू आहे. एकदा हे काम संपले की राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग लवकरात लवकर सुरू करता यावा यासाठी कोणते पर्याय आहेत त्याचा आपण अभ्यास करणार असून नंतरच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. काल मंत्रालयात पत्रकारांनी पर्रीकर यांना त्याबाबत विचारले असता आपण खाणप्रश्‍नी घाई गडबडीत कोणताही निर्णय घेण्यास तयार नसून अभ्यासांतीच योग्य असा प्रस्ताव घेऊन मोदी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खाणप्रश्‍नी सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार आहे काय, असे पत्रकारांनी विचारले असता त्यावर थेट उत्तर देण्याचे पर्रीकर यांनी टाळले.
या घडीला आपण खाणीशी संबंधित सर्व घटकांशी चर्चा करण्याचे काम करीत आहे. ही चर्चा संपली की बंद पडलेला खाण उद्योग सुरू करता यावा यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत, कशा प्रकारे विनाविलंब खाणी सुरू करणे शक्य आहे याचा अभ्यास करण्यात येईल. नंतर दिल्लीत जाऊन तो प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ठेवण्यात येईल, असे पर्रीकर म्हणाले. सध्या राज्यात पावसाळा असून पावसाळ्यात एरवीही खाण उद्योग बंदच असते. मात्र, पावसाळ्यानंतर लवकरात लवकर खाणी सुरू व्हाव्यात यासाठी सरकारचे प्रयत्न असतील, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
कंपन्यांनी कामगारांना काढेल नाही
खाण कंपन्यांनी कामगारांना कामावरून कमी केले नसल्याचे ते यावेळी म्हणाले. सध्या खाणी बंद असल्याने कामच नसल्याने कामगार ड्युटीवर जात नाहीत, असे पर्रीकर म्हणाले. जुगार कायद्यात दुरुस्तीची शक्यता यावेळी पर्रीकर यानी फेटाळून लावली.

ऑगस्ट अखेरीस मंत्रिमंडळ
फेरबदल विचाराधीन
ऑगस्टच्या मध्यास आपण आपल्यावरील उपचारांसंबंधीच्या पाठपुराव्यासाठी अमेरिकेस सात – आठ दिवसांसाठी परत जाणार आहोत. तेथून परत आल्यानंतर सरकारमधील खातेबदलासंबंधी विचार करू असे मुख्यमंत्री श्री. पर्रीकर यांनी सांगितले. आपण सरकारमध्ये खातेपालट करायचा की नाही याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. अमेरिकेहून परतल्यानंतरच आपण त्यासंबंधी नीट विचार करून निर्णय घेऊ असे श्री. पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

गोव्याच्या समाजजीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी मूल्यशिक्षणावर भर

>> मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची ग्वाही

गोव्याच्या सामाजिक जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी शैक्षणिक आणि कौटुंबिक स्तरावर मूल्यशिक्षणाचे महत्त्व जनतेच्या मनावर बिंबवण्यासाठी आपण यापुढे कार्यरत राहू अशी ग्वाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल राज्यातील संपादकांशी अनौपचारिक संवाद साधताना दिली. एका गंभीर आजारपणावर मात करून आपण गोव्यात परतला आहात. यापुढील आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाचे आणि ‘मनोहर पर्रीकर’ या नावाचे स्मरण गोव्याच्या जनतेने कोणत्या गोष्टींसाठी ठेवावे असे आपल्याला वाटते, या प्रश्नावर त्यांनी स्वतःसमोरील हे उद्दिष्ट विशद केले.

न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असताना गोव्याकडे पाहात असताना येथील जीवनशैलीतील मूल्ये आपल्याला ठळकपणे जाणवली. ही मूल्ये जपण्याची आज गरज आहे. ती जपली गेली तर बाह्य परिस्थितीतील अनिष्ट गोष्टींकडे गोमंतकीय तरुणाई कदापि वळणार नाही, असे श्री. पर्रीकर पुढे म्हणाले. शैक्षणिक स्तरावर मूल्यशिक्षणासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून गेल्या अर्थसंकल्पामध्ये आपण गोव्याच्या जनतेच्या समाधानाचा निर्देशांक वाढवण्याचे जे वचन दिले होते, त्याच्या पूर्तीच्या दिशेने आपण प्रयत्न करू असेही श्री. पर्रीकर यांनी सांगितले.

यावेळी विचारल्या गेलेल्या विविध प्रश्नांची श्री. पर्रीकर यांनी विस्ताराने आणि मोकळेपणाने उत्तरे दिली. राज्यामध्ये चांगले नेतृत्व निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्या बाबतीत सध्या जी पोकळी जाणवते आहे, ती भविष्यात भरून काढायची असेल तर शैक्षणिक स्तरावरून चारित्र्यवान मनुष्यनिर्मितीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी आपापल्या स्तरावर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आपले सरकार त्या दिशेने निश्‍चितपणे पावले टाकील असा संकल्प श्री. पर्रीकर यांनी व्यक्त केला. आपण केवळ राजकीय नेतृत्वाबद्दल बोलत नसून एकूणच सर्व क्षेत्रांमध्ये चांगले चारित्र्यवान नेतृत्व निर्माण होण्याची आवश्यकता आपल्याला वाटत असल्याचे श्री. पर्रीकर म्हणाले.

राज्यातील जनतेच्या आरोग्यविषयक समस्यांची आपल्याला जाणीव असून आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आपले सरकार प्रयत्नशील आहे, असे श्री. पर्रीकर यांनी सांगितले. त्या दिशेने करीत असलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी यावेळी माहिती दिली.

राज्याला वेढून राहिलेल्या अमली पदार्थांच्या विषयावर यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर सरकार त्याविषयी अतिशय गंभीर असून यासंबंधी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत आपण अधिक स्पष्टीकरण देऊ असे श्री. पर्रीकर यांनी सांगितले. पिसुर्ले येथे केटामाईन प्रकरणी जी कारवाई झाली ती केंद्रीय तपास यंत्रणांनी केली होती आणि त्यात आंतरराज्य टोळी गुंतली असल्याचे स्पष्ट झालेले आहे, त्यामुळे आपले गृह खाते त्यावर काही भाष्य करू शकत नाही असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

केवळ इच्छाशक्तीच्या बळावर परतलो
आपण न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असताना आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता. तेव्हा त्यांनी आपल्याशी बोलताना एक मोलाचे वाक्य उच्चारले. ‘या आजारपणातून आपण केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर बरे होऊ शकाल’ असे मोदी आपल्याला म्हणाले होते व त्यावर आपण या आजाराला घाबरलो नसून आपली इच्छाशक्ती बळकट आहे. त्याच्या बळावर येत्या दोन महिन्यांत आपण भारतात परतून आपल्याला भेटू, असे अभिवचन आपण पंतप्रधानांना दिले होते, असे श्री. पर्रीकर यांनी यावेळी नमूद केले.