खाणप्रश्‍नी तोडग्यासाठी सत्ताधारी नेते दिल्लीत

0
178

राज्यातील सत्ताधारी गटातील नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन खाण प्रश्‍नी लवकर तोडगा काढण्याची विनंती काल केली. खाण प्रश्‍नावर राज्यात वातावरण तापू लागले असून मंत्री विजय सरदेसाई यांनी कडक वक्तव्य केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

खाणबंदी प्रश्‍नावरून गोवा मायनिंग पीपल फ्रंटने विविध भागात सभांच्या माध्यमातून आंदोलनाला सुरुवात केली आहे. मंत्री विजय सरदेसाई यांनी खाण प्रश्‍नावरून कडक विधान करून भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. तसेच कॉंग्रेस पक्षाने खाण प्रश्‍नी तोडगा सुचविण्यासाठी ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समितीची निवड केली आहे. कॉंग्रेसच्या समितीने खाण प्रश्‍नी तोडग्याबाबत ज्येष्ठ वकिलांशी चर्चेला सुरुवातही केली आहे.
खाण प्रश्‍नावर तोडगा दृष्टिपथात नसल्याने खाण व्याप्त भागातील जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाच्या एक शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीएमओ कार्यालयातील प्रधान सचिव एन. मिश्रा यांची भेट घेऊन खाण प्रश्‍न सोडविण्यावर चर्चा केली.

पीएमओ कार्यालयातील प्रधान सचिवांशी खाण प्रश्‍नी चर्चा करण्यात आली आहे. आज शुक्रवारी पुन्हा खाण प्रश्‍नी बैठक घेऊन चर्चा करून पुढील कृती निश्‍चित केली जाणार आहे. पंतप्रधानाच्या सहकार्यातून खाण प्रश्‍न सुटू शकतो, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री ढवळीकर यांनी दिली.

कॉंग्रेसला जाणीवपूर्वक डावलले : सोपटे
खाण प्रश्‍न मांडण्यासाठी दिल्लीला गेलेल्या पथकामध्ये कॉंग्रेस पक्षाचा जाणीवपूर्वक समावेश करण्यात आलेला नाही, असा आरोप कॉंग्रेसचे आमदार दयानंद सोपटे यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला. खाण प्रश्‍नी दिल्लीला गेलेल्या सर्व पक्षीय शिष्टमंडळात कॉंग्रेसचा समावेश होता. परंतु, आता शिष्टमंडळात कॉंग्रेसला स्थान देण्यात आलेले नाही. भाजपचे केंद्र आणि राज्यामध्ये सरकार आहे. तरीही तीन महिने उलटले तरी खाण प्रश्‍नावर तोडगा काढण्यास त्यांना यश आलेले नाही. आमच्याकडे खाण प्रश्‍नावर तोडगा आहे. भाजपने प्रथम तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याचे जाहीर केल्यानंतर कॉंग्रेस पक्ष तोडगा देईल, असे आमदार सोपटे यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.

कॉंग्रेसने तोडगा सुचवावा : श्रीपाद
राज्यातील खाण प्रश्‍नी कुणीही तोडगा सुचवू शकतो. कॉंग्रेस पक्ष सुद्धा तोडगा सुचवू शकतो. तोडगा योग्य असल्यास स्वीकार केला जाऊ शकतो, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. खाण प्रश्‍न सोडविण्याबाबत केंद्र सरकार गंभीर आहे. न्यायालयाच्या माध्यमातून प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दिल्लीत गेलेले शिष्टमंडळ ऍटर्नी जनरल वेणुगोपाल यांची भेट घेऊन खाण प्रश्‍नी फेरविचार याचिका दाखल करण्याबाबत विचारविनिमय करतील. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतील, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

खाणप्रश्‍नी कॉंग्रेसचे पंतप्रधान मोदींना पत्र
गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र काल पाठविले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खाणी बंद करण्याच्या निर्णयामुळे राज्यात खाण व्यवसाय ठप्प झाला असून खाण व्याप्त भागातील नागरिकांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

राज्य सरकारकडून गेल्या तीन महिन्यांपासून खाण प्रश्‍नावर तोडगा काढण्याचे केवळ आश्‍वासन मिळत आहे. प्रत्यक्ष कृती केली जात नाही. त्यामुळे खाण व्याप्त भागातील जनता हवालदिल झाली आहे. मागील शंभर दिवस मुख्यमंत्र्यांविना कारभार सुरू आहे. राज्याची अर्थव्यवस्था खाण व्यवसायावर अवलंबून आहे. २०१२ मध्ये राज्यातील खाण व्यवसाय बंद करण्यात आला होता. त्यानंतर २०१५ पासून हळूहळू पुन्हा खाण व्यवसायाला सुरुवात झाली. फेब्रुवारी २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा खाण व्यवसाय बंद पडला आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

न्यायालयाच्या निवाड्याला तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला तरी खाण प्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर कोणतीही आवश्यक कृती केली जात नाही. पावसाळ्यानंतर खाण व्यवसाय पुन्हा सुरू न झाल्यास मोठी आर्थिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाण प्रश्‍नामध्ये गंभीरपणे लक्ष घालून प्रश्‍न सोडवण्याची मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.