खाणप्रश्‍नी तोडग्याचे केंद्रीय खाणमंत्र्यांचे आश्‍वासन

0
121

>> मुख्यमंत्र्यांची प्रल्हाद जोशींबरोबर चर्चा

>> केंद्रीय मंत्री अमित शहा, रमेश पोखरीयाल, स्मृती इराणींनाही भेटले

गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग लवकरात लवकर सुरू करण्यासाठी तोडगा काढण्याचे आश्‍वासन केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिले. मुख्यमंत्री सध्या दिल्ली दौर्‍यावर असून काल त्यांनी खाण प्रश्‍नावर केंद्रीय खाण मंत्र्यांची भेट घेऊन गोव्यात बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंख व खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन त्यांच्याशी राज्यासंबंधीच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा केली.
या भेटीत खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खाणीच्या मुद्यावर संसदेच्या संयुक्त अधिवेशनात चर्चा घडवून आणण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांना दिले. गोव्यातील खाणींचा प्रश्‍न सुटावा, धसास लागावा अशी आमचीही इच्छा आहे. त्यासाठी आम्हीही प्रयत्नरत आहोत, असे जोशी यांनी या भेटीत आपणाला सांगितल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. प्रल्हाद जोशी यांच्याबरोबर झालेल्या भेटीत आपण त्यांना राज्यातील खाण उद्योग बंद झाल्याने जी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याविषयीची सविस्तर माहिती त्यांना दिली. खाण उद्योग बंद पडल्याने राज्याची आर्थिक स्थिती कशी बिघडली आहे याची माहितीही आपण खाण मंत्र्यांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय खाणमंत्री जोशी यांच्याशी झालेली बोलणी ही सकारात्मक होती आणि त्यांनी शक्य तेवढ्या लवकर या प्रकरणी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्याचे सावंत म्हणाले.
आयआयटी, एनआयटी
प्रकल्पांसंदर्भातही चर्चा
मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंख यांच्याशी राज्यात होऊ घातलेल्या आयआयटी प्रकल्प व एनआयटी प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली. आयआयटी प्रकल्पासाठी ३१ जुलैपर्यंत जमीन निश्‍चित करून ती हस्तांतरित करण्याची गरज आहे. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे हा प्रकल्प हे एक स्वप्न होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पासाठी लवकरात लवकर जमीन निश्‍चित करून ती मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. एनआयटीबाबतही यावेळी चर्चा झाल्याचे सावंत म्हणाले.
गृहमंत्री अमित शहा यांचीही सावंत यांनी दिल्लीत भेट घेऊन त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.
महिला आणि बालविकास व वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांचीही सावंत यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.