खाणप्रश्‍नी केंद्रीय मंत्र्यांबरोबर फलदायी चर्चा

0
204

>> सभापती प्रमोद सावंत यांचा दावा

>>केंद्रीय मंत्री गडकरी व गोयल यांच्याशी बोलणी

गोव्यातील खाण प्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी नवी दिल्लीला गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काल नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व रेल्वे आणि कोळसा मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर गोव्यातील खाणप्रश्‍नी केलेली चर्चा फलदायी ठरल्याचे सभापती प्रमोद सावंत यांनी सांगितले. येत्या ८ रोजी शिष्टमंडळ पुन्हा नवी दिल्लीला जाणार असून त्यावेळी केंद्रीय खाणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.

राज्यातील खाणींचा प्रश्‍न धसास लावण्यासाठी गडकरी यांनी यावेळी शिष्टमंडळाला तीन गोष्टी करण्याचा सल्ला दिला. सरकारचे जे काही म्हणणे व मागणी आहे त्यासंबंधीचे निवेदन राज्यपालांना द्यावे. त्यासंबंधीचा ठराव मंत्रीमंडळ बैठकीत संमत करून घ्यावा. तसेच या प्रश्‍नावर विरोधकांना विश्‍वासात घेऊन त्यांचा पाठिंबा मिळवावा. कारण गोव्यातील खाणप्रश्‍नी केंद्राला जर घटना दुरुस्ती करावी लागली तर लोकसभा व राज्यसभेत विरोधकांकडून पाठिंबा मिळवण्यास त्याचा फायदा होणार असल्याचे गडकरी यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला सांगितल्याचे ते म्हणाले.

गोव्यातील खाणप्रश्‍नी तोडगा काढणे कठीण असून काही करता येणे शक्य आहे असे दिसत नसल्याचे तत्पूर्वी पियुष गोयल यांनी नमूद केले होते. मात्र, गडकरी यांच्या सूचनेनंतर त्यांचेही मत परिवर्तन झाल्याचे सावंत म्हणाले. गडकरी यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्यानुसार सगळे काही केले जाणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. येत्या ८ रोजी केंद्रीय खाणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट आम्ही घेणार असून त्यादिवशी त्यांच्याशी गोव्यातील खाण समस्येविषयी सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ८८ खाणपट्ट्यांचे नूतनीकरण रद्द केल्याने येत्या १५ मार्चपासून राज्यातील खाण व्यवसाय बंद पडणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर या खाणी बंद पडू नयेत यासाठी केंद्राने पावले उचलावीत या मागणीसाठी गोव्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काल नवी दिल्लीत मंत्री नितीन गडकरी व पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली होती.

ठोस आश्‍वासन नाही ः कॉंग्रेस
खाणप्रश्‍नी केंद्रीय मंत्र्यांकडे चर्चेसाठी गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बोलणी फलदायी झाल्याचा दावा शिष्टमंडळातील सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून करण्यात आलेला असला तरी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला असल्याने काहीही करता येण्यासारखी परिस्थिती नसल्याचे केंद्रातील मंत्र्यांचे म्हणणे असल्याचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी काल सांगितले.

केंद्रीय रेल्वे व कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्लीत चर्चेसाठी गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला फैलावर घेतले. गोव्यातील खाणप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला असून या आदेशाच्या विरोधात जाणार्‍यांवर तुरुंगात जाण्याची पाळी येऊ शकते, असा इशारा त्यांनी शिष्टमंडळाला दिल्याचे कवळेकर यांनी सांगितले. खाणींचा लिलाव केला जावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे आता लिलाव करण्यावाचून दुसरा पर्याय राहिलेला नाही. लिलावाची प्रक्रिया येत्या एक-दोन महिन्यांत सुरू करणे शक्य असल्याचेही ते म्हणाल्याचे कवळेकर यांनी सांगितले.