खाणप्रश्‍नी आज पर्वरीत होणार सर्वपक्षीय बैठक

0
227

गोव्यातील खाण लीज गैरव्यवहारांसंदर्भात अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने एका निवाड्याद्वारे दणका दिल्यानंतर येथील खाण व्यवसायावर मोठे संकट ओढवले असल्याने त्यावर तोडग्याबाबत चर्चेसाठी आज गुरुवारी पर्वरीतील सचिवालयात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निवाड्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जनतेने चिंता करण्याची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते. मात्र अचानक मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या भागातील जनतेत चिंतेचे वातावरण पसरले. या पार्श्‍वभूमीवर काल सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर व सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमेकॉत उपचारार्थ दाखल असलेल्या मुख्यमंत्री पर्रीकर यांची भेट घेतली व त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली.
या चर्चेअंती खाण समस्येवर तोडग्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आज संध्याकाळी ५ वाजता पर्वरी येथील सचिवलयात बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला मुख्यमंत्री पर्रीकर यांची मान्यता मिळाल्यानंतर सर्व संबंधितांना कळविण्यात आले आहे.

विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांना या संदर्भात विचारले असताना आजच्या बैठकीचे निमंत्रण आपल्याला मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या विषयावर केंद्र सरकारकडे बोलणी करण्यासाठी येत्या रविवारी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला जाणार असल्याचेही कवळेकर यांनी सांगितले. खाण व्यवसायावर संकट ओढवल्याने हादरलेल्या राज्यातील ट्रकमालकांनी अलीकडेच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय विधानसभा अधिवेशनादरम्यान पणजीत मोर्चा काढून जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी सत्ताधारी आमदारांसह विरोधी आमदारांनीही सभेच्या व्यासपीठावरून ट्रक मालकांना जाहीर पाठिंबा दिला होता. १५ मार्चपर्यंत राज्यातील सर्व खाण लिजेसबाबत सर्व सोपस्कार पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तोपर्यंत खाणींवर पडून असलेल्या खनिज मालाची वाहतूक विविध खाणींवरून जोरात सुरू आहे.