खाजगी बसमालकांचे धरणे आंदोलन मागे

0
96

आपल्या विविध मागण्यांसाठी खासगी बसमालकांनी आज सोमवारी येथील वाहतूक खात्याच्या कार्यालयासमोर धरणे धरण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला असल्याचे खासगी बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

खासगी बसमालकांना वाहतूक खात्याकडून इंधनावर अनुदान दिले जाते. प्रती कि. मी. ३ रु. एवढे हे अनुदान इंधनावर देण्यात येत असते. तसेच बसगाड्यांच्या विम्याचा जो हप्ता असतो त्याचे ५० टक्के पैसे वाहतूक खाते भरत असते. मात्र, गेल्या ५-६ महिन्यापासून खासगी बसमालकांना हे सारे मिळणे बंद झाल्याने आज सोमवारी वाहतूक खात्याच्या कार्यालयासमोर धरणे धरण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. मात्र, वाहतूक संचालक निखिल देसाई यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत इंधनावरील अनुदान तसेच विम्याच्या हप्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिल्याने आजचा धरणे धरण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे श्री. ताम्हणकर यांनी स्पष्ट केले. १५ वर्षे रस्त्यावर चालेल्या बसगाड्या भंगारात काढण्याची सूचनाही खात्याने खासगी बसमालकांना केली होती. त्याला आम्ही विरोध करून न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी सरकारने १५ ऐवजी २० वर्षे रस्त्यावर चाललेल्या जुन्या गाड्या भंगारात काढण्याचा प्रस्ताव ठेवला होता. न्यायालयात त्यावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, त्यासंबंधीची अधिसूचनाही सरकारने अजून काढलेली नसून ती काढावी अशीही खासगी बसमालकांची मागणी असल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.