खाजगी बसगाड्यांवर जाहिराती लावण्यास सरकारची मान्यता

0
77

बसमालक संघटनेकडून सरकारचे आभार
राज्यातील खाजगी बसगाड्यांवर वेगवेगळ्या जाहिराती लावण्यास मान्यता देण्याच्या मागणीसह अन्य महत्वाच्या मागण्या पूर्ण केल्याबद्दल अखिल गोवा बस मालक संघटनेच्या काल झालेल्या बैठकीत पर्रीकर सरकारचे आभार मानले आहे.
दुसर्‍या बस मालक संघटनेचे नेते सुदीप ताम्हणकर यांनीही सुरुवातीपासूनच जाहिराती संबंधिची मागणी सरकारकडे केली होती. पुरुषोत्तम हळर्णकर यांच्या अध्यक्षतेखालील नव्या बस मालकांच्या संघटनेने या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला. विम्याचे ५० टक्के म्हणजे कमाल २० हजार रुपये तसेच इंधनावर प्रत्येक किलोमीटरमागे ३ रुपये सबसिडी. प्रतीदिनी किमान १२० रु. ते कमाल २५० किलो मीटरपर्यंतच्या वाहतुकीसाठी देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. दहा वर्षे पूर्ण झालेल्या बसगाड्या भंगार म्हणून विकण्यास मान्यता देऊन ३१ आसन व्यवस्था असलेल्या प्रत्येक बससाठी ४ लाख २० हजार रुपये सबसिडी देण्याचीही योजनेत तरतूद केली आहे.
सरकारच्या या निर्णयाची माहिती देण्यासाठी संघटनेने बैठक बोलावली होती. संघटनेचे सल्लागार ऍड्. सुभाष सावंत यांनी सर्व बस मालकांना प्रवाशांकडे चांगले वागण्याचा आणि नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणार्‍यांवर बस मालकाने कारवाई केल्यास अशा वाहन चालकांना दुसर्‍या बसमालकाने कामावर घेऊ नये, असे आवाहन केले. विजयकुमार शेट यांनी कदंब महामंडळाने सुरू केलेली ‘पास’ योजना बंद करण्याची जोरदार मागणी केली. या योजनेमुळे खाजगी बस मालकांचा व्यवसाय धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले.