खाजगी एजन्सीतर्फे रुग्णांना सुविधा पुरविण्याचा विचार

0
115

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे

राज्यातील कोविड सेंटरमध्ये कोविड बाधित रुग्णांना वेळेवर साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी व्यावसायिक एजन्सीची नियुक्ती करण्यावर विचार विनिमय केला जात आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.

कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दर्जेदार जेवण व इतर विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. त्यामुळे राज्यातील कोविड केअर सेंटरना भेटी देऊन तेथील समस्या व इतर गोष्टीचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. कोविड सेंटरमधील रुग्णांना विविध सेवा उपलब्ध करण्यासाठी एक दोन खासगी एजन्सीची नियुक्ती केल्यास सरकारी अधिकार्‍यांवरील ताण कमी होऊ शकतो. सरकारी अधिकारी आपल्या कामकाजाकडे लक्ष केंद्रित करू शकतात, असेही राणे यांनी सांगितले.

राज्यात जुलै, ऑगस्ट महिन्यात कोविड रुग्णांच्या वाढीची शक्यता गृहीत धरून सरकारी यंत्रणा कार्य करीत आहे. आगामी सहा महिने काळजी घेण्याची गरज आहे. देशभरात कोविड चाचण्यांमध्ये गोवा राज्य आघाडीवर आहे. आयसीएमआरने मान्यता दिलेल्या नवीन कोविड चाचणी पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. आरोग्य सेवेसाठी आवश्यक कर्मचार्‍यांची भरती केली जात आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

‘प्लाझ्मा’ थेरपीसाठी ‘एम्स’च्या डॉक्टरांची मदत
राज्यात कोविड रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीसाठी एम्सच्या डॉक्टरांची मदत घेतली जात आहे. बांबोळी येथे इस्पितळामध्ये प्लाझ्मा बँक सुरू करण्यात आली असून दात्यांकडून प्लाझ्मा स्वीकारला जात आहे. प्लाझ्मा थेरपीसाठी आवश्यक अंतिम मान्यता मिळाल्यानंतर थेरपीला सुरुवात केली जाणार आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात वास्कोतील एका रुग्णाला दिलेल्या गैरवर्तणुकीची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. चौकशी अहवाल त्वरित सादर करण्याची सूचना करण्यात आली असून यापुढे अशाप्रकारची घटना घडणार नाही. याबाबत दक्षता घेण्याची सूचना संबंधितांना करण्यात आली आहे, असेही आरोग्य मंत्री राणे यांनी सांगितले.

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण डॉक्टर सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह होऊ लागले आहेत. गोमेकॉमध्ये येणार्‍या प्रत्येकाचे स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही राणे यांनी सांगितले.