खांडेपारमधील अपघातात हायस्कूल विद्यार्थी ठार

0
63

केरये-खांडेपार येथील राष्ट्रीय महामार्गावर काल संध्याकाळी ५ वा. सुमारास कॉंक्रिट मिक्सरच्या टायरखाली डोके चिरडल्याने हेरंब सुभाष तिळवे हा युवक ठार झाला. या अपघातात स्कूटर चालक जॉलीस्टन जुझे फर्नांडिस (१५- फोंडा) व विष्णू सधू शिंदे (३१ उसगाव) जखमी झाले. हेरंब हा फोंड्याच्या आल्मेदा हायस्कूलचा दहावीचा विद्यार्थी होता.

प्राप्त माहितीनुसार हेरंब तिळवे व त्याचा मित्र जोलीस्टन फर्नांडिस जीए- ०५- के- ०२०१ क्रमांकाच्या स्कूटरने खांडेपार येथे जात होते. यावेळी केरये येथील उतरणीवर विरुध्द दिशेने येणार्‍या जीए- ०३- एन- ७६०५ क्रमांकाच्या कॉंक्रिट मिक्सर वाहनाला स्कूटरची धडक बसली. त्यानंतर स्कूटरने त्याच बाजूने जाणार्‍या जीए-०७- जे- ३०१३ क्रमांकाच्या दुसर्‍या दुचाकीला धडक देताच स्कूटरवरील दोघेहीजण उसळून रस्त्यावर पडले. यावेळी कॉंक्रिट मिक्सर वाहनाचा टायर डोक्यावरून गेल्याने हेरंब तिळवे जागीच ठार झाला. अपघातानंतर कॉंक्रिट मिक्सर चालकाने पळ काढला.
पोलीस निरीक्षक सुदेश नाईक, वाहतूक पोलीस निरीक्षक राम आसरे, उपनिरीक्षक अरुण बाक्रे अन्य पोलिसांनी पंचनामा केला. हेरंब हा आल्मेदा हायस्कूलातील विद्यार्थी असून यंदा १० वीच्या वर्गात शिकत होता.