खलाशांबाबत राज्यपालांशी दिगंबर कामतनी केली चर्चा

0
120

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी काल राज्यपाल सत्यपाल मलीक यांची भेट घेतली व विदेशी जहाजांवर काम करणार्‍या गोमंतकीय खलाशांना राज्यात परत आणण्याच्याबाबतीत जो विलंब होऊ लागला आहे तो प्रश्‍न दिल्ली दरबारी मांडण्याची त्यांना विनंती केली.

काल यासंबंधी माहिती देताना कामत म्हणाले की, गोमंतकीय खलाशांना घेऊन आलेली दोन विदेशी जहाजे मुंबई येथे बंदरावर आहेत. मात्र, अद्याप त्या जहाजांवरील खलाशांना खाली उतरवून घेण्यात आलेले नाही. हा विलंब का होतो आहे तेही कळू शकले नसल्याने या खलाशांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही जणांचे कुटुंबीय आपणाकडे विचारपूस करण्यासाठी तसेच मदतीच्या आशेने आले होते. त्याच पार्श्‍वभूमीवर हा प्रश्‍न राज्यपालांकडे मांडण्यासाठी आपण काल त्यांची भेट घेतल्याचे कामत यांनी सांगितले.

गोव्यात आल्यानंतर सामाजिक विलगीकरणासाठी ज्या खोल्यात रहावे लागते त्या खोल्यांसाठी सरकारने या खलाशांकडून भाडे आकारू नये, अशी विनंतीही आपण राज्यपालांकडे केल्याचे ते म्हणाले. केरळ, महाराष्ट्रासारख्या राज्यांनी विदेशी जहाजांवर काम करणार्‍या आपल्या राज्यातील खलाशांना सामाजिक विलगीकरणासाठी राहण्यास मोफत खोल्यांची सोय करून दिली असल्याचे कामत म्हणाले. गोवा सरकारनेही तसेच करावे अशी सूचना आपण राज्यपालांकडे केल्याचे कामत यांनी सांगितले.