खलाशांना आणण्याबाबत केंद्राकडून आज आदेश येण्याची शक्यता ः लोबो

0
128

 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विदेशात असलेल्या गोमंतकीय खलाशांना परत आणण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न चालविले आहेत. खलाशांना परत आणण्याबाबत केंद्रीय मंत्रालयाकडून आज मंगळवारपर्यत आदेश जारी केला जाऊ शकतो, अशी माहिती बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

गोव्याची सागरी सीमा सुरक्षित आहे. गोव्याच्या सागर हद्दीत बाहेरील जहाजांना प्रवेश दिला जात नाही. देश कोरोना मुक्त झाल्यानंतर पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. पर्यटन उद्योग सुरू केल्यानंतर पर्यटकांना कोविड प्रमाणपत्राची सक्ती करण्याची गरज आहे. राज्य सरकारने जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत असल्याने कोरोना विषाणूच्या बाबतीत सुरक्षित आहे, असेही मंत्री लोबो यांनी ंमुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी भेट घेतल्यानंतर बोलताना सांगितले.

लॉकडाऊनमुळे टॅक्सी, दुकानदार व इतर व्यवसाय करणार्‍या लोकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या व्यवसायिकांना आर्थिक साहाय्य करून दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे केल्याची माहिती बंदर कप्तान मंत्री लोबो यांनी दिली.

टॅक्सी मालक, दुकानदार व इतर व्यावसायिकांनी सहकारी पतसंस्थांकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे. लॉकडाऊनमुळे कर्जाचा हप्ता भरणे कठीण बनले आहे. सहकारी पतसंस्थांच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी थोडी सवलत मिळवून देण्याची विनंती करण्यात आली आहे. कर्जाच्या हप्त्यावरील व्याजात सवलत देण्यावर विचार करण्याची विनंती केली आहे. टुरिस्ट टॅक्सी मालकांच्यावतीने एक निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले आहेत. त्यात रस्ता कर व इतर शुल्कात सवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत विविध प्रश्‍नावर सकारात्मक तोडगा काढतील, असा विश्‍वास मंत्री लोबो यांनी व्यक्त केला.

राज्यात घर दुरुस्ती, बांधकाम करण्यास मान्यता दिली जात आहे. या दुरुस्ती कामासाठी कामगार उपलब्ध आहेत. परंतु, साहित्याची दुकाने बंद असल्याने काम करण्यात अडचण येत आहे. हार्डवेअर व इतर दुकाने सुरू करण्याची गरज असल्याचेही मंत्री लोबो यांनी सांगितले.

 

केंद्रिय मंत्री मुरलीधरन यांच्याशी

श्रीपाद नाईक यांनी केली चर्चा

 

विविध देशांतील जहाजांवर अडकून पडलेल्या गोमंतकीय खलाशांना गोव्यात सुरक्षितपणे आणण्याच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केंद्रिय विदेश व्यवहार राज्यमंत्री मुरलीधरन यांची भेट घेतली. या भेटीत मुरलीधरन यांनी खलाशांना विनाविलंब परत आणण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले असल्याची माहिती श्री. नाईक यांनी दिली. या खलाशांना भारतात परत पाठवण्यासाठी संबंधित देशांच्या दूतावासांना आवश्यक ते सगळे सहकार्य करण्याची विनंती करण्यात आल्याचेही मंत्री श्री. नाईक यांनी सांगितले.