गोमंतकीय खलाशांना घेऊन मुंबईला आलेली बोट निर्णयाविना आज निघणार

0
123

>> आज तोडगा निघण्याची शक्यता ः मुख्यमंत्री

 

राज्य सरकार खलाशांच्या प्रश्‍नाबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संपर्कात आहे. खलाशांच्या प्रश्‍नावर आज बुधवारी दुपारपर्यंत निर्णय होईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

मुंबई बंदरात असलेल्या मारेला डिस्कवरी या बोटीवरील ६५ गोमंतकीय खलाशांना उतरण्यास मान्यता देण्याचा विषय राज्यात मुख्य चर्चेला मुद्दा काल बनला होता. ही मारेला बोट बुधवार २२ एप्रिलला पुन्हा युरोपला रवाना होणार असल्याने सीफेरर संघटना, विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन खलाशांच्या प्रश्‍नाला प्राधान्य देण्याची विनंती केली.

दरम्यान, मुंबई बंदरात मागील ४० दिवस मारेला ही बोट नांगरून ठेवण्यात आली होती. या बोटीमध्ये १९० भारतीय खलाशी आहेत. त्यात गोव्यातील ६५ खलाशांचा समावेश आहे. गेले कित्येक दिवस या बोटीवरील भारतीय खलाशांना भारतात प्रवेश देण्याची मागणी केली जात आहे. परंतु, केंद्र सरकारकडून काहीच प्रयत्न होत असल्याने बोटीच्या व्यवस्थापनाने आज बुधवारी युरोपला बोट परत नेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय खलाशांत खळबळ माजली आहे. या खलाशांना भारतात प्रवेश देण्यास मान्यता दिली जात नसल्याने नाराजी व्यक्त करून बोटीवरील गोमंतकीय खलाशांनी एक व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमावर व्हायरल केला आहे. या व्हिडिओमुळे गोव्यातील खलाशांच्या कुंटुबियात खळबळ माजली आहे. केंद्र सरकारने बोटीवरील खलाशांना उतरण्यास मान्यता न दिल्यास भारतीय खलाशांना पुन्हा युरोपमध्ये नेण्यात येणार आहे.

असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी एका पत्रकार परिषदेत मारेला बोटीवरील गोमंतकीय खलाशांना प्रवेश देण्याची मागणी केली आहे. गोमंतकीय खलाशांना गोव्यात आणून त्यांचे क्वारंटाईन करावे. मुंबईमध्ये वाढलेल्या कोरोना रूग्णामुळे तेथे क्वारंटाईऩ करू नये. मुंबई बंदरातील  आणखी एक कर्णिका या बोटीवर ९३ गोमंतकीय खलाशी आहे, अशी माहिती सीफेरर संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिली.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन खलाशांच्या विषयावर चर्चा केली आहे. गोवा प्रदेश महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेऊन खलाशांच्या प्रश्‍नामध्ये तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

 

खलाशांना आणण्याची केंद्राची

कार्यप्रणाली तयार ः सावईकर

 

विदेशी जहाजांवर काम करणार्‍या गोव्यातील खलाशांना गोव्यात परत आणण्यासाठीची मानक कार्यप्रणाली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) केंद्र सरकारने जवळजवळ पूर्ण केलेली आहे. आता या लोकांना भारतात परत आणण्यासाठी केवळ गृहमंत्रालयाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. ही मान्यता मिळाली की त्यांना आणण्यासाठीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना दिली. गृहमंत्रालयाच्या मान्यतेला विलंब लागणार नसून त्यामुळे आता कोणत्याही क्षणी या गोमंतकीयांना परत आणणे शक्य होणार असल्याचे श्री. सावईकर म्हणाले